Will Canada Merge with America?: अमेरिका आता कॅनडाही ताब्यात घेणार का, हा मुद्दा सध्या आंतराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक चर्चेत आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाने आता अमेरिकेचा भाग व्हावे असे गेल्या डिसेंबर महिन्यात सुचवले होते. इतकंच नाही तर हल्लीच राजीनामा दिलेल्या कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना अमेरिकेत सामील होणाऱ्या कॅनडाचे गव्हर्नर करण्यात येईल, असाही उल्लेख केला. १८ डिसेंबर रोजी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य व्हावे या आशयाची पोस्ट लिहिली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, “आपण दरवर्षी १००,०००,००० डॉलर्सहून अधिक रक्कम कॅनडाला अनुदान का देतो याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही? याला काही अर्थ नाही! अनेक कॅनडियन्स असे वाटते की, कॅनडाने अमेरिकेचे ५१ वे राज्य व्हावे.” नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेने कॅनडा ताब्यात घेण्याच्या चर्चांना हवा दिल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यांनी ७ जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत कॅनडावर लष्करी मार्गाने नव्हे तर आर्थिक दबावाच्या मार्गाने ताबा मिळविण्याची भाषाही केली. ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला अमेरिकेच्या उत्तरेकडील शेजारी असलेल्या कॅनडाकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले की, “कॅनडाने अमेरिकेचे ५१ वे राज्य होण्याची कोणतीही शक्यता नाही.” असे असले तरी, अमेरिकेच्या प्रारंभिक इतिहासाकडे आणि कॅनडातील काही चळवळींकडे पाहता अमेरिकेच्या विस्तारवादाला त्यांचीच एक पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येते, त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा.

अमेरिकेचा विस्तारवाद

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची स्थापना १७७६ साली ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर झाली. १३ ब्रिटिश वसाहतींना एकत्र करून या देशाची स्थापना करण्यात आली होती. देशाचा पहिला मोठा विस्तार १८०३ साली झाला. १८०३ साली अमेरिकेने फ्रेंचांकडून लुइसियाना खरेदी केलं. त्यामुळे देशाचा भूभाग जवळपास दुपटीने वाढला. १८४५ साली दक्षिण-पूर्वेकडील सीमावादांमुळे मेक्सिकन-अमेरिकन युद्ध झाले. या युद्धात विजय मिळवत अमेरिकेने मेक्सिकोचा उत्तरेकडचा भाग जिंकला. या भागात सध्याचे कॅलिफोर्निया राज्य समाविष्ट आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

अधिक वाचा: History of Jana Gana Mana: जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?

मॅनिफेस्ट डेस्टिनी

हा कालखंड ‘मॅनिफेस्ट डेस्टिनी’ या संकल्पनेने ओळखला जातो. ही संकल्पना वृत्तपत्राचे संपादक जॉन एल ओ’सुलिव्हन यांनी मांडली होती. अमेरिकेतील राष्ट्रीय शक्ती उत्तर अमेरिकेत विस्तारत जाईल असा अमेरिकेतील पुढारी आणि नागरिक यांच्यातील असलेल्या विश्वासाचा संदर्भ या संकल्पनेमागे होता. इतकंच नाही तर जॉन एल ओ’सुलिव्हन हे गौरवर्णीय नसलेल्या वंशानी अमेरिकेवर अधिराज्य मिळवण्याच्या शक्यतेबद्दल सावध होते. त्यांचा विश्वास होता की, १९४५ साली जगाचा अंत होईल.

मॅनिफेस्ट डेस्टिनी (विकिमीडिया कॉमन्स)

इतर वंशियांची भीती

त्या काळातील मानसिकतेबद्दल लिहिताना इतिहासकार अँड्र्यू सी आयसेनबर्ग आणि थॉमस रिचर्ड्स ज्युनियर यांनी २००७ साली प्रकाशित झालेल्या ‘अल्टरनेटिव वेस्ट्स: रीथिंकिंग मॅनिफेस्ट डेस्टिनी’ या लेखात म्हटले आहे की, “ओ’सुलिव्हनच्या यांनी केलेल्या भविष्यवाणी चुकीच्या ठरल्या असतील, परंतु त्या १९ व्या शतकाच्या मध्यातील अमेरिकन मानसिकतेचे त्या प्रतिनिधित्व करतात. या कालखंडात लोकांना अमेरिकेचा विस्तार झाला तर तो कसा असेल याची स्पष्ट कल्पना नव्हती. त्याकाळी कॅनडा, ओरेगॉन, अल्टा आणि बाजा कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यू मेक्सिको, क्युबा, आणि युकातान: या प्रदेशांच्या विलीनीकरणाच्या सर्व शक्यता होत्या… किंवा अगदी नव्हत्याही.” तरीही, ओ’सुलिव्हनप्रमाणे अनेक अमेरिकन लोकांना असे वाटत होते की, देशावर गौरवर्णीयांचेच वर्चस्व असावे आणि इतरांचे वर्चस्व कधीच येऊ नये.

आधी अलास्का

वसाहतीकालीन कथांचे अनुकरण करत १८६७ साली अमेरिकेने रशियनांकडून अलास्का खरेदी केल्यावर साऊथ कॅरोलिनाचे सिनेटर आणि श्वेतवर्णींयांतील वर्चस्ववादी जॉन सी कॅलहौन यांनी “कोणत्याही कोकेशियन वंशाव्यतिरिक्त इतरांना संघात सामील होऊ देऊ नका” असा इशारा दिला होता. मात्र, इतिहासकार डॅनियल इम्मरवाहर यांनी हाऊ टू हाइड अॅन एम्पायर (२०१९) या पुस्तकात लिहिले आहे की, जरी स्थानिक अलास्कन लोकांना (एक्सक्विमॉक्स) समान नागरिकत्त्व देणे हा चिंतेचा विषय होता तरीही, “हा व्यवहार पूर्ण झाला कारण अखेरीस ‘एक्सक्विमॉक्स’ संख्येने खूप कमी होते आणि अलास्का खूप मोठे होते.”

ग्वानो आयलंड्स अ‍ॅक्ट

१८५६ साली ‘ग्वानो आयलंड्स अ‍ॅक्ट’ पारित झाल्यानंतर अमेरिकेने उत्तर अमेरिकेबाहेर विस्तार सुरू केला. या कायद्यानुसार वॉशिंग्टनला पॅसिफिक महासागरातील कोणत्याही निर्जन बेटांवर दावा करण्याचा अधिकार होता. अमेरिकन एम्पायर (२००३) या पुस्तकात भूगोलतज्ज्ञ नील स्मिथ यांनी या बेटांना ‘भौगोलिक तुकडे’ (geographical crumbs) म्हटले आहे. त्यावेळेस अमेरिकेची अमेरिकेबाहेरची मालमत्ता फारशी नव्हती. परंतु आज या प्रदेशांमध्ये चार दशलक्षाहून अधिक लोक राहातात. पॅसिफिकमधील बहुतेक बेटांवरील दावे अमेरिकेने प्रतिस्पर्धी शक्तींच्या विरोधामुळे सोडले होते. मात्र, १८९८ साली हवाई बेटे राखून ठेवण्यात अमेरिका यशस्वी ठरली. त्याच वर्षी अमेरिकेने सध्याचे फिलिपाइन्स देखील जिंकले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर बेटांना स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या तत्त्वांवर अमेरिकन आदर्श आधारित असला तरी सुरुवातीच्या काळात अमेरिकेची साम्राज्यवादी भूमिका होती आणि त्यांनी कॅनडावर हल्ला करण्याची धमकीही अनेक वेळा दिली होती.

अमेरिकेचा कॅनडावर दावा करण्याचा प्रयत्न

१७७५ च्या रिव्होल्यूशनरी युद्धाच्या काळातच अमेरिकन बंडखोरांनी ब्रिटिशांच्या ताब्यात असणाऱ्या मॉन्ट्रियल आणि क्युबेक या प्रांतांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर अमेरिकेतील मूळ ‘आर्टिकल्स ऑफ कॉन्फेडरेशन’ मध्ये क्युबेकला नव्या देशाचा सदस्यत्वासाठी आधीच मान्यता देण्यात आली होती. अमेरिकन लोकांचा असा समज होता की, या प्रांतांतील नागरिक त्यांच्या ब्रिटिश वसाहतवाद्यांविरुद्ध सहज शस्त्र उचलतील. मात्र, त्यांचा हा समज लवकरच खोटा ठरला.

अधिक वाचा: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?

१८१२ साली पुन्हा एकदा अमेरिकेने कॅनडावर आक्रमण करण्याचे धाडस केले. नॅशनल पार्क सर्व्हिसच्या एका लेखात म्हटले आहे की, अमेरिकेत अनेकांचा असा समज होता की, कॅनडातील लोक अमेरिकन सैन्यांचे स्वागत करतील. मात्र, त्या काळी ब्रिटिश वसाहत असलेल्या कॅनडाने दक्षिणेकडील शेजाऱ्यांच्या या आक्रमणाचा पुन्हा एकदा प्रतिकार केला. कॅनडा फर्स्ट चळवळीचे सह-संस्थापक डब्ल्यू ए फॉस्टर लिहितात, हत्यारांचा आवाज देशभर येत होता. तलाव, नद्या, जंगलाच्या आतपर्यन्त शस्त्रे पोहोचली होती. तिथल्या तरुणांच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले असतील म्हणूनच त्यांनी आपली विश्वासू बंदूक उचलली असेल. त्याचाच परिणाम म्हणून १८१४ साली ब्रिटिशांनी व्हाइट हाऊसला आग लावली. दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा कुणीही केला नाही, तसंच पराभवही कोणी मान्य केला नाही. हीच शेवटची वेळ होती जेव्हा अमेरिकेने कॅनडावर बळाने दावा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही एकदा १८६६ साली अमेरिकेने कॅनडाला अमेरिकेत विलिन होण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला होता.

कॅनडाचे काल्पनिक सामीलीकरण दर्शविणारा हा मोठा नकाशा (नॅशनल आर्काइव्हज)

१८६६ चे अॅनेक्सेशन बिल आणि कॅनडाच्या विलिनीकरणाचा प्रयत्न

मॅसॅच्युसेट्सचे काँग्रेसमन नॅथॅनियल प्रेंटिस बँक्स यांनी मांडलेले १८६६ चे अॅनेक्सेशन बिल ब्रिटिशांप्रति वैरभाव ठेवणाऱ्या आयरिश अमेरिकन लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने होते. ब्रिटिशांच्या वसाहती ताब्यात घेण्याचे अधिकार या अॅनेक्सेशन बिलाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिले होते. त्यानुसार, नोवा स्कॉटिया, न्यूब्रुन्सविक, कॅनडा ईस्ट- वेस्ट, सेलकिर्क, सास्कात्चेवान आणि कोलंबियाचा समावेश अमेरिकत करण्यात येणार होता.

खरं तर, या विधेयकाद्वारे कॅनडा देश म्हणून स्थापन होण्यापूर्वी कॅनडाचे विलिनीकरण केले गेले असते, मात्र तसे झाले नाही. अखेरीस, १८६७ साली सध्याच्या कॅनडातील प्रांतांनी स्वतंत्र राज्यांचे महासंघ तयार करण्यासाठी मतदान केले. हा महासंघ अमेरिकेपासून स्वतंत्र होता. तरीही, कॅनडामध्ये विलिनीकरणाच्या चर्चाही सुरूच होत्या.

विलिनीकरणाच्या मागणीदरम्यान कॅनडाची स्थापना

अमेरिकेबरोबर एकत्रिकरण हवे असे मानणारे कॅनेडियन हे अपर आणि लोअर कॅनडातील बंडखोर होते, जे १८३८ साली ब्रिटिश सैन्यांपासून पळून अमेरिकेत गेले. अमेरिकन रिपब्लिकनिझम अ‍ॅट अ क्रॉसरोड्स (२०२०) या लेखात इतिहासकार जुलियन मॉडिट लिहितात की, “जेव्हा त्यांनी बंड केले तेव्हा लोअर आणि अपर कॅनडातील रिपब्लिकन किंवा देशभक्तांनी अमेरिकन युनियनच्या आत सार्वभौम राज्ये निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते.”

प्रारंभीचा पाठिंबा आणि कॅनडाच्या विलिनीकरणाचा प्रश्न

सुरुवातीला कॅनडातील बंडखोरांना विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये मोठा पाठिंबा मिळाला. वृत्तपत्रांनी त्यांच्या बाजूने लेख प्रकाशित केले. स्थानिकांनी त्यांच्या उद्दिष्टांसाठी जाहीर सभा घेतल्या आणि हजारो लोकांनी गुप्तपणे सामील होऊन कॅनडाला ब्रिटिश साम्राज्यवादापासून मुक्त करण्याची शपथ घेतली. अनेकांसाठी हे बंड अमेरिकन क्रांती पूर्ण करण्याची आणि उत्तर अमेरिका ब्रिटिशांपासून मुक्त करण्याची संधी होती.

मात्र, जानेवारी १८३८ साली ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या हद्दीत प्रवेश करून ‘कॅरोलीन’ नावाचे जहाज ताब्यात घेतले. यामुळे अनेकांना ब्रिटनबरोबर युद्ध अपरिहार्य वाटले. त्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष मार्टिन व्हॅन ब्युरेन यांनी तटस्थतेचे सार्वजनिक आवाहन केले. क्रांतीनंतरच्या अर्ध्या शतकात अमेरिका ब्रिटिश व्यापारावर अवलंबून होती. हा व्यापार अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्ताराला चालना देत होता. व्हॅन ब्युरेन आणि अनेक प्रमुख राजकारणी आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांना भीती होती की बंडखोरांबरोबर उभे राहिल्याने ब्रिटनबरोबर युद्ध होईल आणि त्यातून अमेरिकेला तिचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार गमवावा लागेल. त्यामुळे व्हॅन ब्युरेन यांनी सैन्य पाठवून सीमावर्ती भागांमध्ये सैन्याचे बंड रोखले आणि बंडखोरीची चळवळ झपाट्याने विझली.

१८६० साली कॅनडाच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू

१८६० साली कॅनडाच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. त्या वर्षी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव विल्यम सिवर्ड यांनी भाकीत केले की ब्रिटिशांच्या ताब्यातील उत्तर अमेरिका (त्यावेळी कॅनडा अद्याप देश म्हणून अस्तित्त्वात आलेला नव्हता) अमेरिकेत सामील होईल. १८६७ मध्ये तीन प्रदेश कॅनडाचा प्रांत (सध्याचे ओंटारिओ आणि क्युबेक), न्यू ब्रन्सविक आणि नोव्हा स्कॉशिया एकत्र येऊन कॅनडाची स्थापन करण्यात आली. मात्र, एक प्रदेश अजूनही साशंकतेच्या भोवऱ्यात होता.

ब्रिटिश कोलंबियाचा अमेरिकेत विलीन होण्याचा विचार

ब्रिटिश कोलंबियातील रहिवाशांना अमेरिकेने त्यांना वेढून टाकण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत विलीन होण्याची मागणी केली. १८६७ साली महासंघाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाल्यावर अमेरिकेत सामील होण्याच्या बाजूने याचिका फिरवण्यात आल्या. पहिली याचिका १८६७ साली राणी व्हिक्टोरियाला पाठवण्यात आली होती. यामध्ये ब्रिटिश सरकारने या वसाहतीचे अमेरिकेवरील कर्ज (जे त्यावेळी खूप होते) स्वीकारावे आणि स्टीमर ट्रेन लिंक स्थापन करावी किंवा वसाहतीला अमेरिकेत विलीन होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. १८६९ साली दुसरी याचिका तयार करण्यात आली. ज्यात अमेरिकेचे अध्यक्ष युलिसिस ग्रँट यांना ब्रिटनच्या वसाहतींच्या अमेरिकेतील विलिनीकरणासाठी वाटाघाटी करण्यास सांगण्यात आले होते. स्थानिक पातळीवर या कल्पनांना पाठिंबा मिळाला असला तरी या मुद्द्यांना व्यापक लोकप्रियता मिळाली नाही. अखेरीस १८७१ साली ब्रिटिश कोलंबियाला कॅनडाचा प्रांत म्हणून सामावून घेतले गेले.

विलिनीकरणाच्या मागण्या थांबल्या नाहीत

१८८० आणि १८९० च्या दशकात कॅनडातील प्रयोगावरील नाराजीमुळे क्युबेकमध्ये जन्मलेले फिजिशियन प्रोस्पर बेंडर हे बोस्टनला गेले. विलिनीकरणाचे प्रखर समर्थक असलेल्या बेंडर यांनी १८८३ मध्ये नॉर्थ अमेरिकन रिव्ह्यूसाठी एक लेख लिहिला. ज्यात त्यांनी म्हटले की, अनेक कॅनडियन लोकांचा विश्वास होता की, “सध्याच्या कालखंडात किंवा कदाचित लवकरच कॅनडा अमेरिकेत विलिनीकरण होईल. त्यांचे तर्क होते की, कॅनडाच्या लोकसंख्येच्या चौथ्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे आयरिश कॅथलिक ब्रिटिशांविरुद्ध बंड करतील. कारण ब्रिटिशांनी आयर्लंडचा ताबा घेतला होता. शिवाय त्यांनी असे नमूद केले की, तरुण पिढीला अमेरिका ही संधींची भूमी वाटते. ते बंडखोरांमध्ये सामील होतील. हा धोका कधीही सत्यात उतरला नाही. तरी हा मुद्दा पूर्णपणे संपला नाही. बेंडर त्यांच्या १८८३ मधील ‘ए कॅनेडियन व्ह्यू ऑफ अॅनेक्सेशन’ या लेखात लिहितात की, जरी हा मुद्दा विभाजनाच्या दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा वाटत नसला तरी हा असा एक प्रमुख मुद्दा आहे, जो कधीही पूर्णपणे दुर्लक्षित राहू शकत नाही.

अधिक वाचा: अमेरिकेतील हिंदूंनी भोगलेला धर्मद्वेषाचा इतिहास काय सांगतो?

१९८० आणि १९९० च्या दशकात कॅनडातील काही लहान राजकीय पक्षांनी कॅनडाने अमेरिकेत सामील व्हावे अशी मागणी केली. मात्र, यापैकी कोणताही पक्ष निवडणुक लढला नाही. गेल्या काही शतकातील प्यू संशोधनानुसार, जरी कॅनेडियन लोक अमेरिकेबद्दल नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत असले तरी २००४ च्या लेगर मार्केटिंग सर्वेक्षणानुसार फक्त ७ टक्के लोक विलिनीकरणाला पाठिंबा देण्यास तयार होते.

ट्रम्प यांच्या विधानांमागील अर्थ

या आकडेवारीवरून ट्रम्प यांनी केलेली वक्तव्ये फक्त विनोद किंवा बडेजावाचे प्रदर्शन वाटू शकतात. पण, विशेषतः कॅनडा आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांसारखे घटक हे समीकरण अधिक क्लिष्ट करतात.

शुल्कांचा धोका

अमेरिकेच्या आर्थिक प्रभावाने यापूर्वीही विलिनीकरण चळवळींना चालना दिली आहे. १८९३ साली साखर आणि अननस उत्पादन करणाऱ्या काही उद्योजकांनी, अमेरिकेच्या हवाईतील राजदूताच्या मदतीने, हवाईच्या राणीला पदच्युत केले आणि १.७५ दशलक्ष एकर राजमालमत्ता वॉशिंग्टनच्या ताब्यात घेतली. आज, कॅनडा तशाच प्रकारच्या आर्थिक दबावाला सामोरे जात आहे. कारण ट्रम्प यांनी ओटावावर २५ टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. याबाबत बिझनेस कौन्सिल ऑफ अल्बर्टाचे स्कॉट क्रॉकट यांनी या आठवड्यात दिलेल्या निवेदनात म्हटले की, “व्यवसायिक आता अत्यंत तीव्र शुल्कांच्या शक्यतेसाठी तयारी करत आहेत. शुल्काचा दर २५ टक्क्यांपर्यंत गेला, तर ते आर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरेल.”

जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा दिल्यापासून ट्रम्प यांनी त्यांच्या धमक्या अधिक तीव्र केल्या आहेत. अध्यक्षपदी निवडून आलेल्या ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले की, कॅनडा अमेरिकेला योग्य प्रकारे वागवत नाही त्यामुळेच त्यांनी कॅनडाला सहकार्य करण्यासाठी किंवा विलिनीकरणासाठी आर्थिक निर्बंध लावण्याची धमकी दिली आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले, “ती कृत्रिम रेषा काढून टाका आणि बघा काय दिसते. ते राष्ट्रीय सुरक्षेसाठीही अधिक चांगले ठरेल. ते छान आहेत, पण आम्ही त्यांचे संरक्षण करण्यासाठी येथे शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करत आहोत.”

अमेरिकेचा विस्तारवाद

अमेरिकेच्या विस्तारवादाची संकल्पना नवीन नाही. देशाने १७७६ साली १३ राज्यांपासून सुरुवात करून आज ५० राज्ये तयार केली आहेत. जर ट्रम्प यांनी त्यांच्या विधानांवर अंमलबजावणी केली तर कॅनडा ५१ वे राज्य ठरू शकते.

Story img Loader