राज्यातील गावखेड्यांसह परराज्यांतून उदरनिर्वाहासाठी मुंबईत होणाऱ्या स्थलांतराने शहरात लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली तरी गर्दीचा भार कमी होताना दिसत नाही. त्यावर उपाय म्हणून कार्यालयीन वेळांमध्ये बदलाची जुनी मागणी पुन्हा चर्चेत आहे.
कार्यालयीन वेळांबाबत मध्य रेल्वेचा निर्णय काय?
मध्य रेल्वेमार्गावरील लोकल गाड्यांमध्ये सर्वाधिक गर्दी ही सकाळी ७.३० ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत असते. या वेळेत दिवसभरातील एकूण प्रवाशांपैकी ८३ टक्के प्रवासी प्रवास करतात. वाढत्या गर्दीचा भार विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलल्या आहेत. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत आणि सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत अशा दोन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले आहे. मध्य रेल्वेने इतरही शासकीय कार्यालयांना कामाच्या वेळा बदलण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : विश्लेषण : सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना सुधारू शकेल?
कार्यालयीन वेळा बदलण्याची मागणी जुनीच?
मुंबई महानगरातील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची मागणी १५ वर्षांपासून होत आहे. मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापकांनी जुलै २००८ मध्ये वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मुंबई महानगरातील कार्यालयांच्या वेळा बदलणे, सुट्ट्यांचे नियोजन करणे आणि प्रवासीभिमुख सुविधा यांबाबत प्रवासी संघटनेने म्हणणे मांडले होते. मात्र, १५ वर्षे झाली तरी, मुंबई महानगरातील कार्यालयीन वेळा बदण्यासाठी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी करोनाच्या साथीनंतर पश्चिम रेल्वेनेही कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयोग केला होता. सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतलेल्या निर्णयाचे प्रवासी संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून इतर संस्थांनी याबाबत नियोजन करणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक मनोहर शेलार यांनी दिली.
वेळेत कोणते बदल अपेक्षित?
बहुतांश सर्व शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ यादरम्यान असते. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून लोकलमध्ये गर्दी वाढते. प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी बँका, पतपेढी आणि इतर आर्थिक बाबींशी संबंधित कार्यालये सकाळी ९ वाजता सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सकाळी १० ते १०.३० स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२ च्या दरम्यान खासगी कार्यालये सुरू केल्यास गर्दी विभाजित होणे शक्य आहे. कार्यालयांच्या वेळेतील काही तासांच्या फरकामुळे नियोजनबद्ध प्रवास होऊ शकेल, असा बदल सुचवण्यात आला आहे.
हेही वाचा : शेळीचे दूध आरोग्यासाठी चांगले, पण व्यावसायिकदृष्ट्या परवडणार का? ‘अमूल’ शेळीच्या दुधाचे ब्रँडिंग करणार?
वेळा बदलून प्रश्न सुटेल का?
मध्य रेल्वेवर दिवसभरात लोकलच्या १,८१० फेऱ्या होतात. त्यातून दररोज ३८ ते ४० लाख नागरिक प्रवास करतात. मध्य रेल्वेने त्यांच्या कर्मचाऱ्यांची कामाची वेळ बदलली असली तरी फारसा फरक पडणार नाही. फक्त दोन हजार प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेत बदल होईल. मात्र, इतर कार्यालयांनी वेळ बदलल्यास लक्षणीय फरक पडू शकेल. बहुतांश कार्यालये मुंबई शहरात आहेत. त्यामुळे सकाळी उपनगरांतून शहराकडे आणि सायंकाळी शहराकडून उपनगराकडे असा प्रवास प्रामुख्याने होतो. त्या अनुषंगाने मुंबईतील शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे विभाजन करून उपनगरांमध्ये स्थलांतर करण्याचाही उपाय यापूर्वी सुचवण्यात आला होता. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या नोकरदारांची संख्या तुलनेने कमी होईल, असे उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.