कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी डिजी यात्रा अॅप्लिकेशनचा वापर केला जाईल, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केल्यानंतर, केंद्राने स्पष्टीकरण जारी केले आहे. दावे फेटाळताना आयकर विभागाने सांगितले की, विभागाची सरकारी अॅपचा वापर करण्याची कोणतीही योजना नाही. डिजी यात्रा ॲप हा एक प्रवास उपक्रम आहे, जो हवाई प्रवाश्यांची ओळख निर्धारित करण्यासाठी आणि त्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा त्यासाठी फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान (एफआरटी) वापरतो. प्रवाशांच्या डेटाच्या गैरवापराविषयी काही दावे केले जात आहेत; ज्यात प्रवाश्यांची वैयक्तिक माहिती आयकर विभागाद्वारे वापरली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, डिजी यात्राने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. नेमका हा प्रकार काय? खरंच कर चोरांना पकडण्यासाठी या अॅपचा वापर केला जात आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.
खरंच प्राप्तिकर करचोरी करणाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी डिजी यात्राचा वापर करणार?
‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या अलीकडील वृत्तात सूत्रांचा हवाला देऊन असा दावा करण्यात आला आहे की, आयकर विभागाने डिजी यात्रा ॲपवरील प्रवाशांच्या वैयक्तिक डेटाचे नियंत्रण मिळवले आहे. सूत्रांनी कथितपणे ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, या डेटाच्या आधारे प्राप्तिकर विभाग २०२५ मध्ये नोटीस जारी करण्यास सुरुवात करेल. वृत्तात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, कर विभाग प्रथम कर परतावा न भरणाऱ्यांना लक्ष्य करेल. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने सांगितले की, प्राप्तिकर विभाग आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही प्रवाशांचे डेटा परीक्षण करत आहे.
हेही वाचा : अब्जावधी वर्षांचं काम मिनिटांत होणार? ‘Google Willow’ चिप काय आहे?
ह
केंद्राची भूमिका काय?
प्राप्तिकर विभाग आणि नागरी उड्डयान मंत्रालयाने डिजी यात्रा डेटाचा वापर कर न चुकवणाऱ्यांना पकडण्यासाठी केला जाणार असल्याचा दावा फेटाळला आहे. “डिजी यात्राचाचा डेटा कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वापरला जाईल असे वृत्त दिसले आहे. या संदर्भात हे स्पष्ट केले आहे की, आजपर्यंत विभागाकडून अशी कोणतीही हालचाल केली गेली नाही,” असे प्राप्तिकर विभागाने सोमवारी (३० डिसेंबर) ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, भविष्यात असे करण्याची योजना आहे का? यावर नागरी उड्डाण मंत्रालयाने मीडिया रिपोर्टला निराधार आणि चुकीचे म्हटले आहे.
“भारतीय कर अधिकाऱ्यांबरोबर डिजी यात्रा प्रवाशांचा डेटा शेअर केला जात नाही. डिजी यात्रा ॲप सेल्फ सोवेरेन आयडेंटिटी (एसएसआय) मॉडेलचे अनुसरण करते, जिथे वैयक्तिक माहिती आणि प्रवास क्रेडेन्शियल्स केवळ वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर संग्रहित केले जातात. त्याशिवाय जर एखाद्या वापरकर्त्याने डिजी यात्रा ॲप अनइन्स्टॉल केले तर डेटा पूर्णपणे हटविला जाईल,” असे मंत्रालयाने सोमवारी ट्विट केले. त्यांनी सांगितले की, विमानतळ प्रणाली फ्लाइटच्या प्रस्थानाच्या २४ तासांच्या आत प्रवाशांचा डेटा स्वयंचलितपणे हटविते. हे लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे की, डिजी यात्रा ही केवळ देशांतर्गत प्रवाशांसाठी डिझाइन केलेले अॅप आहे आणि ते आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू होत नाही.
डिजी यात्राची भूमिका काय?
डिजी यात्रेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही मीडियाच्या वृत्ताचे खंडन केले आहे. डिजी यात्रा फाउंडेशनचे सीईओ सुरेश खडकभावी म्हणाले की, ते अज्ञात स्त्रोतांवर आधारित निराधार दावे आहेत. “डिजी यात्रा प्रवाशांची कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करत नाही किंवा कोणत्या विभागाला पाठवत नाही. हे सुनिश्चित करते की वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी या अॅपमध्ये माहिती गमावणे किंवा लीक करणे यासाठी कोणताही डेटाबेस नाही,” असे त्यांनी लिंक्डइनवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, विभाग आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या डेटाचा पाठपुरावा करत असल्याचा हा दावा चुकीचा आहे.
“डिजी यात्रा सध्या फक्त देशांतर्गत विमान प्रवासासाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय डेटाबेसशिवाय, कोणत्याही विभागाद्वारे कोणताही डेटा प्रवेशयोग्य नाही. २०२४ च्या अखेरीस, डिजी यात्रेने नऊ दशलक्ष (९० लाख) सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा गाठला; ज्यामुळे देशांतर्गत प्रवाशांमध्ये व्यापक विश्वास दिसून येतो असे ते म्हणाले. डिजी यात्रा ही एक स्वयंसेवी सेवा आहे, ज्याचा लाभ हवाई प्रवाशांना विमानतळांवर संपर्करहित अनुभवासाठी घेता येतो. ॲप डाउनलोड केल्यानंतर, वापरकर्त्याला त्यांचे आधार तपशील द्यावे लागतात आणि पडताळणीसाठी सेल्फी क्लिक करावा लागतो. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते ॲपवर त्यांचे बोर्डिंग पास अपलोड करू शकतात आणि प्रवाशांची माहिती विमानतळासह सामायिक केली जाते.
हेही वाचा : भारतीय नर्सला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा का देण्यात आली? फाशी रद्द होण्यासाठी पर्याय काय?
विमानतळ ॲपचे संचालन करणारी डिजी यात्रा फाउंडेशनची स्थापना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम आठ अंतर्गत २०१९ मध्ये संयुक्त उद्यम कंपनी म्हणून करण्यात आली. या कंपनीचे भागधारक भारतीय विमानतळ प्राधिकरण (२६ टक्के) आणि इतर पाच विमानतळ आहेत, ज्यात हैदराबाद, कोची, बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली यांचा समावेश आहे. प्रवाश्यांनी यापूर्वी ॲपवरील बायोमेट्रिक डेटाच्या संभाव्य गैरवापराबद्दल गोपनीयतेची चिंता दर्शविली आहे. परंतु, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वापरकर्त्यांद्वारे सामायिक केलेला डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित केला जातो, हा डेटा कोणत्याही केंद्रीय भांडारावर नाही तर वापरकर्त्याच्या फोनवर प्रदान केला जातो.