पेनसिल्वेनिया येथे झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात माजी आणि इच्छुक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही विचलित न होता ट्रम्प यांनी लढण्याचा निर्धार दाखवून दिला. अमेरिकेच्या राजकीय पटलावरील अत्यंत दुभंगलेल्या वातावरणात या घटनेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळत आहे. याचा फायदा ट्रम्प यांना मिळेल का, किती मिळेल याविषयी अमेरिकेत अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रम्प यांचा हल्लेखोर कोण?

थॉमस मॅथ्यू क्रूक्स या वीस वर्षीय हल्लेखोराने ट्रम्प यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. क्रूक्स सभास्थानापासून दूर एका इमारतीवर दडून बसला होता. ट्रम्प यांचे भाषण सुरू होताच त्याने गोळ्या झाडल्या. त्यातील एक ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. अमेरिकेच्या आजी-माजी अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी तैनातीत असणाऱ्या सिक्रेट सर्विसच्या रक्षकांनी क्रूक्सला त्वरित हेरले आणि मारले. क्रूक्सच्या गोळीने ट्रम्प यांना वेधले नाही, पण त्यात जवळच उभ्या असलेल्या एका समर्थकाचा हकनाक मृत्यू झाला. क्रूक्स हा बेथेल पार्क, पेनसिल्वेनिया येथील रहिवासी होता. तो नोंदणीकृत रिपब्लिकन मतदार होता. पण तीन वर्षांपूर्वी बायडेन यांच्या शपथविधीच्या वेळी त्याने एका पुरोगामी गटाला १५ डॉलरची देणगी दिली होती. त्यामुळे त्याचा नेमका उद्देश काय होता, यावर प्रकाश पडलेला नाही. सभास्थानाजवळ क्रूक्सच्या मोटारीत स्फोटके आढळून आल्याचेही वृत्त होते.

हेही वाचा : “भगवान जगन्नाथांनी वाचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण”; काय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि भगवान जगन्नाथ रथयात्रेचे कनेक्शन?

हेतू काय?

याविषयी स्पष्टता नाही. अमेरिकेत राजकीय हेतूने राजकीय पक्षांनी परस्परांच्या उमेदवारांचा काटा काढल्याची उदाहरणे आढळत नाहीत. बहुतेक हल्ले हे एकांड्या व्यक्तींनी राजकीय किंवा इतर कोणत्या तरी हेतूने केलेले आहेत. उदा. अब्राहम लिंकन यांची हत्या झाली त्यावेळी हल्लेखोर श्वेतवर्णीय होता आणि कृष्णवर्णियांना गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या १३व्या घटनादुरुस्तीचा विरोधक होता असे मानले जाते. अध्यक्ष जेम्स गारफील्ड यांना ठार करणाऱ्या हल्लेखोराला सरकारी नोकरी हवी होती. अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांच्यावर हल्ला करणारी महिला (फोर्ड बचावले) व्यवस्थेच्या विरोधात होती. रोनाल्ड रेगन यांच्यावर हल्ला करणाऱ्या (रेगन बचावले) एकाला त्याच्या मैत्रिणीसाठी धाडसी कृत्य करून दाखवायचे होते! जॉन केनेडी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला हल्लेखोर ली हार्वे ओसवाल्ड याने काही सांगण्यापूर्वीच त्याचाही संशयास्पदरीत्या खून झाला. त्यामुळे ट्रम्प यांच्या हल्लेखोराचा हेतू काय हे समजले नसले, तरी त्यातून फार काही हाती लागेल असे तपास यंत्रणांना वाटत नाही. मात्र यांतील बहुतेक हल्लेखोर राजकीय हेतूंनी प्रेरित नसले, तरी क्रूक्सच्या ताज्या कृत्यामुळे अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स ही दरी अधिक रुंद होण्याची शक्यता आहे.

१९६८ आणि २०२४…

राजकीय दुभंगलेल्या आणि अस्थिर अशा सध्याच्या अमेरिकेतील वातावरणाशी तुलना तेथील विश्लेषक १९६८ सालाशी करतात. त्या काळात वंशभेदविरोधी आणि व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळींनी अमेरिकेत धुमाकूळ घातला होता. त्याच वर्षी कृष्णवर्णियांचे नेते रेव्हरंड मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची हत्या झाली. दिवंगत अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे बंधू आणि अध्यक्षपदासाठीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे इच्छुक रॉबर्ट केनेडी यांचीही हत्या झाली. व्हिएतनाम प्रश्नावरून जनमत तीव्र झाल्यामुळे तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी अध्यक्षीय लढतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अनेक विश्लेषकांच्या मते आताही तसेच दुभंगलेले वातावरण असले, तरी त्यावेळेसारखा हिंसाचार दिसून आला नव्हता. मात्र ट्रम्प यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानुळे दोन्ही सालांमध्ये फारसा फरक राहिलेला नाही, याकडे राजकीय विश्लेषक लक्ष वेधतात.

हेही वाचा : ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा शूटर थॉमस मॅथ्यू क्रुक्स कोण होता? त्याने हा हल्ला कसा केला? या हल्ल्यामागचे कारण काय?

डेमोक्रॅटिक समर्थकांचे म्हणणे काय?

डेमोक्रॅटिक पक्षाने आणि अध्यक्ष जो बायडेन यांनी आतापर्यंत तरी ट्रम्प यांच्याप्रति पूर्ण सहानुभूती व्यक्त करण्याचे राजकीय शहाणपण दाखवले आहे. मात्र, हिंसाचारास उद्युक्त करण्याचे ट्रम्प यांचे धोरण त्यांच्या अंगलट आल्याचे डेमोक्रॅटिक समर्थकांचे म्हणणे आहे. ट्रम्प हे अमेरिकेतील बंदूक धोरणाचे खंदे समर्थक आहेत. बंदुकांच्या सुळसुळाटामुळे अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही देशातही जनसामान्यांचे जीवित कसे धोक्यात आले आहे, याच्या रोजच्या कहाण्या आपण ऐकत आहोत. शाळा, शिशुविहार, महाविद्यालये, नाट्य व संगीतगृहे, मद्यालये येथून राजरोस गोळीबाराच्या घटना घडत आहेत. ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या बंदूक समर्थनामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे म्हणणे आहे. आज ही चूक ट्रम्प यांच्यावरच उलटल्याचे डेमोक्रॅटिक माध्यमे आणि समर्थक थेट बोलू लागले आहेत.

रिपब्लिकन समर्थकांचे म्हणणे काय?

रिपब्लिकन पक्षाने अद्याप बायडेन प्रशासनावर थेट आरोप केलेला नसला, तरी इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेत त्रुटी राहतेच कशी असा प्रश्न त्या पक्षाकडून विचारला जाऊ लागला आहे. तसेच, बायडेन यांनी वारंवार ट्रम्प यांच्यावर विखारी टीका केल्यामुळे, त्यांना फॅसिस्ट असे संबोधल्यामुळे एखाद्या माथेफिरूकडून अशा प्रकारचे कृत्य अपेक्षित होते, असे रिपब्लिकन पक्ष धुरिणांचे म्हणणे पडले.

हेही वाचा : वाढते वजन कमी करणार्‍या औषधाला भारतात मंजूरी; लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे औषध कसे कार्य करते?

ट्रम्प यांना फायदा होईल का?

डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनपर्यंत तरी या घटनचे फार मोठे भांडवल केलेले नाही. पण त्यांचा स्वभाव पाहता ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. हल्ल्यातून आपण कसे बचावलो, आपला लढा किती जीवघेणा आणि जोखीमपूर्ण आहे अशा मुद्द्यांवर नाट्यमय भाषणे ते करतील. यामुळे त्यांचा निष्ठावान मतदार तर अधिक जोमाने त्यांना मते देईलच. पण बायडेन यांच्याविषयी साशंक असलेला कुंपणावरील मतदार ट्रम्प यांच्याकडे खेचला जाईल अशी शक्यता आहे. बायडेन यांच्या अडखळतेपणातून चाचपडणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाची स्थिती त्यामुळे अधिकच अवघडल्यासारखी होईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will donald trump get benefit of sympathy he received after the deadly attack print exp css