पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे कारण पुढे करत माथेरानमध्ये वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या युगात माथेरानमध्ये घोडे आणि गुलामगिरीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातरिक्षांचा वापर सुरू होता. याची मोठी किंमत माथेरानकरांना भोगावी लागत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अखेर माथेरानमध्ये ई-रिक्षाचा वापर सुरू झाला आहे. पाच ई-रिक्षा माथेरानकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माथेरानमध्ये वाहन बंदी का होती?

ब्रिटिश जिल्हाधिकारी ह्यू मॅलेट यांनी २१ मे १८५०मध्ये माथेरानचा शोध लावला होता. तेव्हापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान जागतिक नकाशावर नावारूपास आले. मुंबईजवळ असलेले, सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर, हिरव्यागार सदाहरित वनांच्या घनदाट जंगलात वसलेले असल्याने निसर्गसंपन्न ठिकाण म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पण पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील ठिकाण असल्याचे कारण देत येथे वाहने वापरण्यात बंदी घालण्यात आली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने सोडली तर माथेरानमध्ये इतर वाहनांच्या वापरावर निर्बंध आहेत. त्यामुळे आजही घोडे आणि माणसांद्वारे ओढल्या जाणाऱ्या रिक्षा या कालबाह्य वाहतूक साधनांचा वापर माथेरानमध्ये केला जात आहे.

वाहतूक साधनांची आजची स्थिती काय?

माथेरानमध्ये जवळपास ४०० प्रवासी वाहतूक करणारे तर २०० मालवाहतूक करणारे घोडे आहेत. याशिवाय माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या ९२ रिक्षा कार्यरत आहेत. ब्रिटिश राजवटीत या रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. कालांतराने या रिक्षा येथील वाहतुकीचे साधन म्हणून कायम राहिल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही माथेरानमध्ये माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षांची अमानुष प्रथा कायम राहिली. निमित्त ठरले ते माथेरानमध्ये घालण्यात आलेल्या वाहनबंदीचे. एक चालक आणि एक ते दोन सहकारी यांच्या मदतीने आजही माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षांची प्रथा कायम आहे. घोडे आणि माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा ही माथेरानच्या दळणवळणाची प्रमुख संसाधने म्हणून आहेत. यांत्रिकीकरणानंतर ही वाहतूक साधने इतरत्र कालबाह्य झाली. तरीही माथेरानमध्ये त्यांचा वापर सुरूच आहे.

ई-रिक्षांची मागणी कशासाठी?

माणसाकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा या गुलामगिरीचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे देशभरात या रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा सुरु करण्याची मागणी केली जात होती. याशिवाय वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची लीद-मूत्र माथेरानसाठी मोठी समस्या बनली आहे. घोडे उधळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवाश्यांचे जीव धोक्यात येऊ लागले आहेत. या दुर्घटनामंध्ये पर्यटकांचे जीवही गेले आहेत.

सर्वोच्च न्यायालायचे निर्देश काय?

गेली अनेक वर्ष माथेरानकर ई-रिक्षांसाठी पाठपुरावा करत होते. मात्र वारंवार मागणी करूनही पर्यावरण विभाग या मागणीला दाद देत नसल्याने, माथेरान येथील निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ‘२०२२ सालात मानवाकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा कशा चालू राहू शकतात’, असे म्हणत राज्य सरकारला फटकारले होते. तीन महिन्यात ई-रिक्षांची चाचणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर नगरविकास विभाग, माथेरान मॉनिटरींग कमिटी आणि रायगड जिल्हाधिकारी यांनी ई-रिक्षा मान्यता घेऊन गेल्या महिन्यात ई-रिक्षाची चाचणी घडवून आणली. ती यशस्वीरित्या पार पडली. यानंतर ५ डिसेंबरपासून पाच ई-रिक्षा माथेरानकरांच्या सेवेत दाखल झाल्या.

ई-रिक्षांचा फायदा काय?

वाहतुकीची चांगली साधने उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची माथेरानमध्ये मोठी कुचंबणा होत होती. दररोज त्यांना पायपीट करावी लागत होती. ई-रिक्षांमुळे प्रदूषणमुक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे. याचा फायदा पर्यटकांनाही होऊ शकतो. गेली दहा वर्षे ई-रिक्षा सुरू व्हाव्यात, हे स्वप्न माथेरानकर पाहत होते. ते प्रत्यक्षात साकार झाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will e rickshaws be viable transport option in matheran print exp rmm
Show comments