Gold Prices in india : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ८७ हजारांवर गेला आहे. एका बाजूला पिवळ्या धातूच्या किमती वाढत असताना दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयादेखील कमकुवत होत आहे. भविष्यात सोन्याला आणखीच झळाळी येऊ शकते, असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सोन्याच्या दरवाढीची नेमकी कारणं काय? पिवळ्या धातूची किंमत एक लाख रुपयांवर उसळी घेईल का? याबाबत जाणून घेऊ.

सोन्याचे दर गगनाला का भिडले?

आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचे साठे वाढवल्याने पिवळ्या धातूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अमेरिकेतील अलीकडील आर्थिक आकडेवारीवरून असे दिसून येते की, जानेवारीमध्ये उत्पादक किमतींचा निर्देशांक लक्षणीयरित्या वाढला आहे. मागील १८ महिन्यांत त्यात जलदगतीने वाढ नोंदवली गेली आहे, ज्यामुळे महागाई वाढण्याचे संकेत मिळत आहे. त्यातच यूएस फेडरल रिझर्व्ह या वर्षाच्या उत्तरार्धापर्यंत सध्याच्या व्याज दरांना कायम ठेवेल, अशी अटकळ बांधली जात आहे. या सर्व घटकांच्या परिणामी, सोन्याच्या भावात वाढ होत आहे.

सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे कल

महागाई कायम राहिल्याने सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतासह आशियाई देशांमध्ये सोन्याकडे मालमत्ता म्हणून पाहिलं जातं. परंतु, इतर देशांमध्ये सोनं ही गुंतवणूक मानली जाते. सध्या परदेशी लोक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत आहेत. सोने ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचं सिद्ध झालं आहे, त्यामुळे अनेक जण मौल्यवान धातूच्या खरेदीवर भर देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या व्याजदरामुळे सोन्याचा भाव किंचित कमी होऊ शकतो. कारण सुरक्षित गुंतवणूक असल्यामुळे सोन्यावर कोणतेही व्याज मिळत नाही.

आणखी वाचा : Chatgpt Health Advice : चॅट-जीपीटीवरील वैद्यकीय माहिती अचूक असते का? सर्वेक्षणातून काय समोर आलं?

लग्नसराईत खरेदीदारांनी घेतला आखडता हात

गोल्डमॅन सॅक्सच्या मते, केंद्रीय मध्यवर्ती बँकांकडून सध्या अपेक्षेपेक्षा जास्त सोन्याची खरेदी केली जात आहे, ज्यामुळे मागणी वाढल्याने पिवळ्या धातूच्या किमतीला झळाळी आली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन बँकांनीदेखील सोने खरेदीवर अधिक भर दिला आहे. हेदेखील सोन्याचा भाव वाढण्याचं मोठं कारण मानलं जात आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने भारतातील लग्नसराईच्या हंगामात दागिन्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. सोने खरेदी करताना ग्राहक आखडता हात घेत आहेत. दुसरीकडे चीनमधील सराफा विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोन्यावर विशेष सूट देत आहेत.

सोन्याचा भाव गाठू शकतो नवा उच्चांक

सोन्याच्या दरवाढीमागे भू-राजकीय अनिश्चितता आणि महागाईची भीती हे महत्त्वाचे घटक आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांच्या धमक्यांमुळे महागाईची चिंता वाढली आहे, अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संस्थापक कॉलिन शाह यांनी फायनान्शियल एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, “ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे आर्थिक अनिश्चितता वाढली आहे, ज्यामुळे सोन्याला अधिक भाव मिळतोय. भू-राजकीय तणाव, संभाव्य अमेरिकन शुल्क आणि आर्थिक मंदीच्या चिंतेमुळे २०२५ मध्ये सोने नवीन उच्चांक गाठू शकते.”

गेल्या दशकभरात सोन्याचे भाव कसे वाढले?

आयसीआयसीआय सिक्युरिटीनुसार, जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतेने पुन्हा उचल खाल्ली आहे. कारण चीनने अमेरिकेवर कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय चीनच्या केंद्रीय बँकांनीदेखील सलग दुसऱ्या महिन्यात सोन्याचे साठे वाढवले आहेत, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दशकभरापासून भारतामध्ये सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्ट २०११ मध्ये भारतात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा २५ हजार रुपये होता.

जुलै २०२० पर्यंत तो दुप्पटीने वाढून प्रतितोळा ५० हजारांवर गेला. २५ हजारांवरून ५० हजारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोन्याला १०८ महिन्यांचा कालावधी लागला. पण, ५० हजारांवरून ७५,००० पर्यंतचा प्रवास करण्यासाठी सोन्याला फक्त ४८ महिनेच लागले. सप्टेंबर २०२४ मध्ये सोन्याची किंमत रु ७५,००० वर पोहोचली, आज २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर एक ग्रॅमसाठी आठ हजार सातशे रुपये इतका आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, भारतात सोन्याच्या किमती लवकरच प्रतितोळा एक लाख रुपयांच्या घरात पोहोचू शकतात. पण प्रश्न हा आहे की, २०२५ च्या मध्यांत किंवा अखेरीस सोन्याचा भाव खरंच एक लाख रुपयांचा टप्पा पार करेल का?

हेही वाचा : अमेरिकेने माघार घेतल्यास नाणेनिधी आणि जागतिक बँकेवर काय परिणाम होतील?

सोनं खरेदीला प्राधान्य कधी दिलं जातं?

तज्ज्ञांच्या मते, हे भविष्यातील घडामोडींवर अवलंबून आहे. सोन्याला अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित आश्रयस्थान मानले जाते. कारण आर्थिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोने खरेदीला प्राधान्य देतात, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी सोने खरेदीला पसंती दिली होती. २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाच्या सुरुवातीलाही अनेकांनी सोने खरेदी केले होते. करोना महामारीच्या काळातही गुंतवणूकदारांनी सोने खरेदीला प्राधान्य दिलं होतं. सहसा सोन्याच्या सुरक्षित आश्रयाचा परिणाम अल्पकाळ टिकतो, ज्यामुळे अनेकदा १५ दिवसांनी सोन्याच्या किमतीत घसरण होते, असे द कॉन्व्हर्सेशनने म्हटले आहे.

सोन्याचे भाव आणखी वाढणार का?

केंद्रीय बँकांकडून सातत्याने वाढत असलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत ९% पर्यंत वाढ होऊ शकते, असे गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषक लीना थॉमस यांनी सांगितले. फेडरल रिझर्व्ह यावर्षी दोनदा व्याजदर कमी करेल, अशी आशाही गोल्डमन सॅक्सच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास सोन्याच्या दरात आणखीच वाढ होऊ शकते. कारण व्याजदर कमी झाल्याने अनेक जण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देऊ शकतात. परंतु, जर फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली तर मात्र सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. दरम्यान, अमेरिकेत महागाई वाढली तर फेडरल व्याजदर वाढवू शकते, ज्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलर आणखी मजबूत होईल आणि सोन्याच्या किमतीवर दबाव वाढेल.

Story img Loader