अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातल्या देशांवर आयात कर लागू केला आहे. इतर देशांप्रमाणेच भारतावर तब्बल २६ टक्के समन्यायी व्यापार कर अर्थात Reciprocal Tarriff लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के इतका कर लागू होईल. ट्रम्प यांच्या या कर प्रणालीमुळे एकंदर सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. त्याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले. आजपासून लागू केलेल्या या कर प्रणालीमुळे भारतातील सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या किमतीत ११ हजार ९८३ रुपये इतकी (७%) वाढ झाली आहे. २ मार्चला सोन्याची किंमत ८५ हजार ३२० रुपयांवरून ९१ हजार ११५ रुपयांवर पोहोचली होती.
जागतिक बाजारात २ एप्रिलला स्पॉट गोल्डने प्रति पौंड तीन हजार १३२.५३ डॉलर एवढी उसळी घेतली. अमेरिकेतील कर आणि संभाव्य आर्थिक परिणामांचा विचार करता, दिवसाच्या सुरुवातीला स्पॉट गोल्ड प्रति पौंड तीन हजार १४८.८८ डॉलर एवढे होते.
सोनं एक लाखापर्यंत पोहोचेल का?
सध्या सोन्याने एक लाखापर्यंतचा टप्पा गाठण्याकरता किमतीत नऊ हजार रुपयांची वाढ होणे बाकी आहे. सुमारे १० टक्के एवढी वाढ झाल्यास सोने एक लाखापर्यंत पोहोचेल. ट्रम्प यांच्या नव्या कर प्रणालीमुळे भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता तसंच मध्यवर्ती बँकेकडून होणारी जोरदार खरेदी हे सर्व घटक सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरतात असे स्प्रॉट अॅसेट मॅनेजमेंटचे वरिष्ठ पोर्टफोलिओ व्यवस्थापक रायन मॅकइंटायर यांनी माध्यमांना सांगितले.
“२०२५ मध्ये फेडकडून दोन वेळा दरकपात होण्याची अपेक्षा असल्याने सोने १ लाख रुपयांवर पोहोचण्याची शक्यता जास्त आहे”, असे ‘कामा ज्वेलरी’चे एम.डी. कॉलिन शाह यांनी सांगितले.
त्याशिवाय सोने हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असल्याने आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही सोन्याची मागणी वाढल्याचे शाह यांनी सांगितले.
“सोन्याच्या किमती किती वाढू शकतात यावर काही मर्यादा नाही. ते सहज प्रति पौंड चार हजार ते चार हजार ५०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. कोणताही आकडा सेट केला तर तिथपर्यंत ते पोहोचणारच”, असे मत ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे संचालक किशोर नारणे यांनी व्यक्त केले.
“सोन्याची सध्याची उसळी ही नवीन सुरुवात नसून त्याचा विस्तार आहे. २०२५ मध्ये सोन्याचा भाव एक लाखापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा ‘अबन्स फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे सीईओ चिंतन मेहता यांनी व्यक्त केली आहे. बहुतेक या तेजीचे घटक आधीचे ठरलेले आहेत. सोन्याच्या किमती वाढण्यामागे काही वेगळी कारणं असतील, असं वाटत नाही”, असेही मेहता यांनी म्हटले आहे.
२०२४ च्या आर्थिक वर्षापर्यंत सोन्याच्या दागिन्यांच्या श्रेणीत भारताच्या एकूण निर्यातीपैकी अमेरिकेचा वाटा ३० टक्के होता. सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवरील भारताचे शुल्क (२०%) हे अमेरिकेच्या आयात शुल्कापेक्षा (५.५-७%) खूपच जास्त आहे. अमेरिका कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवर कोणतेही शुल्क आकारत नाही. मात्र, भारत यावर पाच टक्के आयात शुल्क आकारतो, असे एका वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय बँकांकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली गेल्याने पिवळ्या धातूच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय चलन कमकुवत होणे हेदेखील देशांतर्गत सोन्याच्या किमती वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. तसेच चलनाचे आणखी अवमूल्यन झाल्यास सोन्याचा भाव एक लाखावर पोहोचेल.
सोन्यात गुंतवणूक करावी की नाही?
पहिल्या तिमाहीत सोन्याने १८.६४ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. १९८६ च्या तिसऱ्या तिमाहीनंतर हा दुसरी सर्वोत्तम तिमाही ठरली आहे. २०२४-२५ साठीचा परतावा ३९.७३ टक्के आहे.
“ही वाढ पाहता २०२५ च्या उर्वरित तिमाहीत अतिरिक्त १० ते १२ टक्के वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता, चलनवाढ, मध्यवर्ती बँकेची धोरणे, रूपयाचे अवमूल्यन यामुळे सोने दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे”, असे ‘मेहता इक्विटीज लिमिटेड’चे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, गुंतवणूकदारांनी महागाईपासून वाचण्यासाठी आता सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करायला हरकत नाही. अशा काळात महागाईच्या परिणामांना तोंड देण्यात सोन्याच्या गुंतवणुकीमुळे मदत होऊ शकते.
या अहवालात सोन्याच्या गुंतवणुकीचा दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गुंतवणूकदारांना त्यांनी त्यांच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये ५ ते २० टक्के सोने आणि त्याच्याशी संबंधित मालमत्ता ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून, शेअर बाजारातील अस्थिरता पाहता, इतर मालमत्तांपेक्षा सोन्याला २०२४-२५ या वर्षात अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोन्यात गुंतवणूक करणं हे कायम फायदेशीरच ठरेल, असे नाही. वेळ आणि इतर कारणं लक्षात घेता, यामध्ये गुंतवणूक करावी. दरम्यान, एप्रिल २०२५ हा महिना सोने गुंतवणुकीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.