आशियाई क्रीडा स्पर्धेला चीनमधील हांगझो येथे सुरुवात झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनचे कायमच वर्चस्व राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताने क्रीडाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पातळ्यांवर भारतीय खेळाडू ठसा उमटवत आहेत. तरी आशियाई स्पर्धेतील पहिल्या तिनांत स्थान मिळवण्याच्या उद्दिष्टापासून भारत अजून खूप दूर आहे. या वेळी भारताने पदकांच्या शतकपूर्तीचे ध्येय बाळगले आहे. स्पर्धेत भारताचे आव्हान कसे आहे, कोणत्या खेळाडूंकडून सर्वाधिक आशा आहेत, याचा आढावा.
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत आजवर किती पदके मिळवली आहेत?
१९५१ मध्ये भारतातूनच आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत १८ स्पर्धा झाल्या असून, भारताने १५५ सुवर्ण, २०१ रौप्य, ३१६ कांस्य अशी एकूण ६७२ पदके पदके मिळवली आहेत. इंडोनेशियात २०१८ मध्ये झालेल्या गेल्या स्पर्धेत भारताने ७० पदकांची कमाई केली होती. यामध्ये १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांचा समावेश होता. पदकांच्या आघाडीवर भारताची ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.
हेही वाचा – वडिलांच्या पावलावर पाऊल? ट्रुडो पिता-पुत्रांचे भारताबरोबरचे संबंध नेहमीच वादग्रस्त का?
आशियाई स्पर्धेत भारताने कधी सर्वोत्तम स्थान मिळवले होते?
भारतीय खेळाडूंनी वेळोवेळी आपल्या सर्वोत्तम कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत भारत कधीही पहिल्या तीनमध्ये येऊ शकलेला नाही, अपवाद केवळ पहिल्या स्पर्धेचा. १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, १६ रौप्य, २० कांस्य अशी ५१ पदके मिळवली होती. त्यावेळी भारताचा दुसरा क्रमांक होता. हीच भारताची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताला १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेसह मनिला (१९५४), बँकॉक (१९६६ आणि १९७०), सोल (१९८६) अशा एकूण पाच स्पर्धांत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अगदी गतस्पर्धेत ७० पदकांची कमाई करूनही भारत आठव्या स्थानी राहिला.
भारताला पहिले सुवर्णपदक कोणी मिळवून दिले?
आशियाई क्रीडा स्पर्धेत जलतरण प्रकारात आज भारत खूप मागे असला, तरी भारताचे पहिले सुवर्णपदक याच क्रीडा प्रकारातूनच आले होते. बनारसच्या सचिन नाग यांनी ते मिळवले होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धावत जाऊन नाग यांना मिठी मारली होती. याखेरीज नाग यांनी ४ बाय १०० मीटर फ्री-स्टाईल रिले आणि ३ बाय १०० मीटर मिडले रिले शर्यतीत कांस्यपदकही पटकावले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानंतर एकाच स्पर्धेत जलतरणात तीन पदके कुणीही मिळवलेली नाहीत.
भारताच्या पदकांत आतापर्यंत कोणत्या क्रीडा प्रकारांचा मोठा वाटा राहिला आहे?
आतापर्यंत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात भारताने सर्वाधिक २५४ पदके मिळवली असून, यात ७९ सुवर्ण, ८८ रौप्य, ८७ कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यानंतर कुस्तीमध्ये भारताने (११ सुवर्ण, १४ रौप्य, ३४ कांस्य) एकूण ५९ पदके मिळवली आहेत. पाठोपाठ नेमबाजीत (९ सुवर्ण, २१ रौप्य, २८ कांस्य) ५७ आणि बॉक्सिंगमध्ये (९ सुवर्ण, १६ रौप्य, ३२ कांस्य) ५७, टेनिसमध्ये (९ सुवर्ण, ६ रौप्य, १७ कांस्य) ४२ पदके मिळवली आहेत. ही सर्व पदके वैयक्तिक क्रीडा प्रकारातील होती. या खेरीज पारंपरिक कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात भारताने ९ सुवर्ण, प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्य अशी ११ पदके मिळवली आहेत. गेल्या स्पर्धेत भारताला इराणने धक्का दिला होता. हॉकीमध्ये भारताने चार सुवर्ण, ११ रौप्य आणि सहा कांस्य अशी २१ पदके जिंकली आहेत.
या वेळी भारताचे पथक किती खेळाडूंचे आहे?
यंदा भारताने सर्वाधिक ६५५ खेळाडूंचे पथक पाठवले आहे. भारत स्पर्धेतील एकूण ४० पैकी ३९ क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहे. या वर्षीच्या संघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, लवलिना बोरगोहेन, मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू अशा पाच ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंचा यात समावेश आहे.
भारताला अद्याप कोणत्या प्रकारात सुवर्णपदक मिळालेले नाही?
भारताला आजपर्यंतच्या १८ आशियाई स्पर्धांमधून वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक या खेळांमध्ये एकही सुवर्णपदक मिळालेले नाही.
हेही वाचा – गणेशोत्सव साजरा करण्यामागे टिळकांचा उद्देश काय होता? जाणून घ्या…
या वेळी पदकांचे शतक गाठताना भारताच्या आशा कोणावर आहेत?
या वेळी सहाजिकच भारताला सर्वाधिक आशा ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडून आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याची त्याला संधी आहे. ॲथलेटिक्समध्येच अविनाश साबळे, मुरली श्रीशंकर, बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, वेटलिफ्टिंग खेळाडू मीराबाई चानू, कुस्तीगीर अंतिम पंघाल, तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम आणि आदिती स्वामी, बॉक्सिंगपटू निकहत झरीन, टेनिसपटू रोहन बोपण्णा-युकी भाम्ब्री (दुहेरी), पुरुष-महिला क्रिकेट संघ, पुरुष-महिला हॉकी संघ आणि पुरुष-महिला कबड्डी संघांकडून, तसेच बुद्धिबळपटूंकडून सुवर्णयशाची अपेक्षा आहे.
शंभर पदकांचे उद्दिष्ट साधले जाणार का?
भारताला आतापर्यंत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातच कायम सर्वाधिक पदके मिळवता आली आहेत. स्पर्धेत ॲथलेटिक्समध्येच सर्वाधिक पदके दिली जातात. त्या खालोखाल नेमबाजी, जलतरण, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारात सर्वाधिक पदके दिली जातात. इंडोनेशियात ॲथलेटिक्समध्ये भारताला २० पदके मिळाली होती. जलतरण प्रकारात भारताचे खेळाडू फारसे प्रभाव पाडू शकत नाहीत. त्यामुळे पदकांची शंभरी गाठण्यासाठी पुन्हा एकदा ॲथलेटिक्सवर अवलंबून राहावे लागणार आहे. या वेळी ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू २५ पदकांची कमाई करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमबाजांनाही आपले लक्ष्य अचूक साधावे लागेल. त्याचबरोबर बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, रोईंग, हॉकी, कबड्डी, क्रिकेट अशा खेळांत भारताला पदकांसाठी दावेदार मानले जात आहे. मात्र, भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील कामगिरी उंचावावी लागणार आहे. तसे झाले तरच भारताला शंभर पदकांचा आकडा गाठता येईल.