नोव्हो नॉर्डिस्क या कंपनीने भारतात त्यांचा इन्सुलिन ब्रँड बंद करीत असल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे इन्सुलिन बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कंपनीने त्यांच्या जास्त नफा देणाऱ्या ओझेम्पिक आणि वेगोव्ही यांसारख्या नव्या औषधांचे जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे घडल्याचे बोलले जात आहे. बहुराष्ट्रीय कंपनी नोव्हो नॉर्डिस्क भारतातील त्यांच्या सर्वांत लोकप्रिय ब्रँड ह्युमन मिक्सटार्ड या इन्सुलिन ब्रँडची विक्री कुपीमध्ये करण्याचे थांबवणार आहे. ह्युमन मिक्सटार्ड हा देशातील सर्वाधिक विक्रीचा इन्सुलिन ब्रँड आहे. भारतात त्याची उलाढाल ८०० कोटी रुपये आहे.
एका अहवालानुसार, या निर्णयामुळे अॅक्ट्रापिड, इन्सुलाटार्ड, इन्सुलिन डेटेमिर, लेव्हेमिर व झुल्टोफी या पाच हजार कोटी रुपयांच्या इन्सुलिन बाजारपेठेतील त्यांच्या इतर ब्रँडवर परिणाम होऊ शकतो. हे प्रामुख्याने प्री-फिल्ड डिस्पोजेबल पेन आणि कार्ट्रिज स्वरूपात विकले जातात. वर्तमानपत्राने मिळविलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, कंपनीने मार्केटिंग पार्टनर अॅबॉट इंडियाला सांगितले होते की, सध्याचा साठा संपल्यानंतर उत्पादने पुन्हा बनवली जाणार नाहीत. या प्रक्रियेला सुमारे सहा महिने लागू शकतात.
दरम्यान, कंपनी ह्युमन मिक्सटार्ड, अॅक्ट्रापिड, इन्सुलाटार्डची विक्री सुरू ठेवण्याची योजना आखत आहे. नोव्हो नॉर्डिस्क टप्प्याटप्प्याने मानवी इन्सुलिन पेनचे उत्पादन बंद करीत आहे, असे औषध उत्पादक कंपनीने सांगितले आहे. कंपनीने मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “जागतिक स्तरावर कालांतराने मानवी इन्सुलिन पेन टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. मानवी इन्सुलिन फक्त कुपींमध्ये उपलब्ध असेल”, असे कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.
कंपनी असे का करतेय?
एका अहवालानुसार, कंपनी ओझेम्पिक व वेगोवीसारख्या नवीन पेटंट केलेल्या मधुमेह आणि वजन कमी करण्याच्या उपचारांना प्राधान्य देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग म्हणून असे करीत आहे.
या डॅनिश औषध निर्मात्या कंपनीने लठ्ठपणा आणि मधुमेह यांवरील नवीन औषधांच्या वाढत्या विक्रीमुळे हा निर्णय घेतला आहे. सुमारे ४८ हजार ८३७ अब्ज एवढ्या बाजारमूल्यासह ती युरोपमधील सर्वांत मौल्यवान कंपनी ठरली आहे. २०२५ मध्ये ही कंपनी औषधे भारतात आणण्याची योजनाही आखत आहे. आऊटलूकने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हो नॉर्डिस्कला पुढील काही महिन्यांत भारतात वेगोवी हे लठ्ठपणावरील औषध कमी करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी एली लिली या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून भारतात मौंजारो आणण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर नोव्होने हा निर्णय घेतला आहे. नोव्हो नॉर्डिस्क या कंपनीने म्हटले आहे की, मानवी इन्सुलिनसाठी वापरल्या जाणारे पेन त्यांच्या वजन कमी करण्याच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या जीएलपी-१ अॅगोनिस्ट वेगोवी आणि मधुमेहावरील औषध ओझेम्पिकसाठी वापरल्या जाणाऱ्या पेनांसारखे नाहीत.
कंपनीने गेल्या वर्षी म्हटले होते की, वेगोवीचा व्यापक वापर केल्याने दीर्घकालीन टाईप-२ मधुमेह असलेल्या लोकांना इन्सुलिन घेण्याची आवश्यकता कमी होऊ शकते. नोव्हो नॉर्डिस्कने हे बऱ्याच वर्षांपासून बनवले आहे. असे असताना या निर्णयामुळे रुग्णांसाठी संभाव्य समस्या निर्माण होऊ शकतात. यूएससारख्या श्रीमंत देशांमध्ये मधुमेहाने ग्रस्त लोक आता मानवी इन्सुलिन नाही, तर आधुनिक किंवा अॅनलॉग इन्सुलिन वापरतात. कारण- हे रक्तातील साखरेचे नियंत्रण अधिक सक्षमपणे करते. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अॅनलॉग इन्सुलिनपेक्षा मानवी इन्सुलिन अधिक वापरले जाते. ते अधिक महाग आणि उत्पादनासही अवघड आहे. दि गार्डियनच्या मते, इन्सुलिनचे शोधक त्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ते एका डॉलरला विकत असूनही आज फक्त तीन कंपन्या ९० टक्क्यांहून अधिक इन्सुलिन बनवतात. मधुमेहाने ग्रस्त असलेले लोक असेही म्हणतात की, ते काचेच्या कुपी आणि इंजेक्शनपेक्षा डिस्पोजेबल पेन वापरणे जास्त पसंत करतात. इन्सुलिन इंजेक्शन देण्यासाठी इंजेक्शनपेक्षा पेन वापरणे सोपे आणि अधिक अचूक आहे. मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्स आणि टी १ इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणानुसार, टाईप-१ मधुमेह असलेले ८२ टक्के लोक इंजेक्शन आणि कुपीऐवजी पेन वापरणे पसंत करतात. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमधील बाजारपेठांसाठी कंपनी अॅनलॉग इन्सुलिन पेन बनवीत असल्याने मधुमेह रुग्णांना इन्सुलिन पेन उत्पादन थांबविण्याचा त्रास होणार नाही.
याचा परिणाम काय?
दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांना अजूनही इन्सुलिनच्या कुपी आणि इंजेक्शन वापरत आहेत. इथल्या ३१ वर्षीय लेक्रेटिया रॉबर्ट्स यांनी एका वृत्तपत्राला सांगितले, “इन्सुलिन अजूनही बाटल्यांमध्ये वापरावे लागत असल्याने मला राग येतो. त्यांना हे समजत नाही की, ते आपले आयुष्य किती कठीण बनवत आहे”. “कंपनी आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांपेक्षा वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी गोष्टी अधिक सोईस्कर का बनवीत आहेत? मी लहान असताना ते आव्हानात्मक होते. मला इंजेक्शन आवडत नव्हते. कधी कधी मी ते जमिनीवर वाया घालवले आहे. कारण- मला सुई टोचून घ्यायला आवडत नव्हते. जर तुमची कुपी फुटली, तर ती नवीन घेतल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही; मात्र ग्रामीण भागातील लोकांना ते परवडत नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील काही मधुमेह रुग्णांनी या वर्षी कंपनीच्या इन्सुलिन लेव्हमिरची विक्री थांबविण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. हे एक अॅनलॉग इन्सुलिन आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या हालचालींमुळे त्यांना उपचार बदलण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गुरुवारी जोहान्सबर्गमधील नोव्हो नॉर्डिस्कच्या कार्यालयाबाहेर शेकडो लोकांनी एकत्र येत मानवी इन्सुलिन पेन बंद केल्याचा निषेध केला, असे एमएसएफने सांगितले.
एमएसएफच्या अॅक्सेस कॅम्पेनच्या सल्लागार कँडिम सेहोमा यांनी म्हटले, “श्रीमंत देशांना नवीन, अधिक महागडे इन्सुलिन आणि सेमाग्लुटाइड पेन (ओझेम्पिक आणि वेगोवी) यांचा पुरवठा करून महामंडळ प्रचंड नफा मिळवीत आहे. असे असताना मानवी इन्सुलिन पेन बंद करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे मर्यादित संसाधनांच्या परिस्थितीत इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेह रुग्णांना पुन्हा कुपी आणि इंजेक्शन वापरण्यास भाग पाडले जाऊ शकते. दुसरीकडे उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आता जवळपास कोणीही कुपी किंवा इंजेक्शन वापरत नाही.”
शतकांहून अधिक काळ उपलब्ध असलेल्या या औषधावरील नफेखोरी आता थांबली पाहिजे असेही सेहोमा म्हणाले. “आमच्या निर्णयांचा दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांवर परिणाम होत आहे आणि त्यामुळे पसरलेली निराशा आम्हाला समजत आहे”, असे नोव्हो नार्डिस्कने एका निवेदनात म्हटले आहे. मधुमेहाच्या रुग्णांना उपचारांची सुविधा उपलब्ध राहावी यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.