अनिकेत साठे
नौदलातील हुद्द्यांचे (रँक) भारतीय संस्कृतीनुसार नामकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिन सोहळ्यात केली. हे नामकरण अधिकारी आणि बिगर अधिकारी या दोन्ही गटांचे होईल की एकाच, याबाबत स्पष्टता नाही. पहिल्या टप्प्यात बिगर अधिकारी गटाच्या नामकरणाची शक्यता वर्तविली जाते. ती संकल्पना प्रत्यक्षात कशी येईल, यावर भारतीय नौदलाकडून लवकरच माहिती दिली जाणार आहे. आता ज्या हुद्द्यांचे नामकरण होईल, त्यांची भारतीय नावे काय असू शकतील, यावर नौदल वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नौदल दिन सोहळ्यात कोणती घोषणा झाली?
नौदल दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडे विजय, शौर्य, ज्ञान, विज्ञान, कौशल्य आणि आपल्या नौदल सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास असल्याकडे लक्ष वेधले होते. भारतीय नौदल आपल्या विविध हुद्द्यांचे भारतीय परंपरेनुसार नामकरण करणार असल्याचे मोदी यांनी जाहीर केले. मध्यंतरी नौदलाने बिगर अधिकारी पदांची नावे बदलण्याचा विचार केल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांच्या घोषणेमुळे अधिकारी आणि बिगर अधिकारी या दोन्ही गटातील हुद्द्यांची नावे बदलली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. नौदल पदांच्या नामकरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यावर काम करेल. त्यानंतर कोणत्या पदांचे नामकरण होईल, याचा खुलासा केला जाईल, असे अधिकारी सांगतात.
नौदलातील सध्याचे हुद्दे कोणते आहेत ?
नौदलात राजदिष्ट (कमिशन्ड) अधिकारी, अराजदिष्ट (नॉन कमिशन्ड) अधिकारी आणि इतर या गटात हुद्द्यांची विभागणी केलेली आहे. दल ते तुकडीपर्यंतचे नेतृत्व राजदिष्ट अधिकारी करतात. नौदलात राजदिष्ट अधिकारी गटात ॲडमिरल अर्थात नौदल प्रमुख, व्हाइस ॲडमिरल, रिअर ॲडमिरल, कमोडोर, कॅप्टन, कमांडर, लेफ्टनंट कमांडर, लेफ्टनंट, सब लेफ्टनंट असे हुद्दे आहेत. अराजदिष्ट गटात मास्टर चीफ पेटी ऑफिसर (प्रथम श्रेणी), मास्टर चीफ पेटी ऑफिसर (द्वितीय श्रेणी), चीफ पेटी ऑफिसर आणि पेटी ऑफिसर तर इतर गटात लिडिंग रेट, नाविक (प्रथम श्रेणी) आणि नाविक (द्वितीय श्रेणी) अशा सात हुद्द्यांचा समावेश आहे. नौदलात पदांची नावे वेगवेगळी असली तरी त्यांची विभागणी लष्कराच्या धर्तीवर आहे.
सर्वोच्च हुद्द्यापासून नौदल दूर राहिले का?
भारतीय लष्करात फील्ड मार्शल हा सर्वोच्च हुद्दा मानला जातो. पाच तारांकित असणारा हा हुद्दा सन्मानार्थीच दिला जातो. आतापर्यंत फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांंना हा गौरव प्राप्त झाला आहे. हवाई दलातील एकमेव पंचतारांकित अधिकारी म्हणजे मार्शल ऑफ दि एअरफोर्स अर्जनसिंग. नौदलात पंचतारांकित हुद्द्याचा बहुमान आजवर कुणालाही मिळालेला नाही. या हुद्द्याला ‘ॲडमिरल ऑफ द फ्लीट’ असे संबोधले जाते. भारताने फील्ड मार्शल आणि नार्शल ऑफ द एअरफोर्स पाहिले, पण आजवर ॲडमिरल ऑफ द फ्लीट पाहिलेला नाही. याचे एक कारण म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रमुख नौदल लढाया फारशा झालेल्या नाहीत, हे असू शकते. भारतीय नौदलाचे प्रमुख हे पद हवाई दल प्रमुख व लष्करप्रमुखांशी समकक्ष आहे.
आणखी वाचा-विश्लेषण : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कोणाला, किती लाभ?
पदांना बहुप्रांतीय, बहुभाषिक वारसा कसा आहे?
सध्या नौदलातील हुद्दे ब्रिटीशकालीन शाही नौदल परंपरेतील आहेत. भारतीय लष्कर व हवाई दलातील पदांनाही तोच वारसा आहे. जगातील विविध राष्ट्रांच्या नौदलात प्रमुख हुद्द्यांची बहुतांशी तीच नावे आहेत. या प्रत्येक हुद्द्याची स्वतंत्र ओळख आहे. विशिष्ट हुद्दा अधोरेखित केल्यावर संबंधित अधिकारी कोण व त्याची जबाबदारी लक्षात येते. त्यांना ब्रिटिशांचा वारसा असला तरी अनेक पदांचे मूळ अरबी, लॅटिन, फ्रेंच वा अन्य परकीय भाषांमध्ये आहे. ॲडमिरल या हुद्द्याचे मूळ अरबी भाषेतील ‘अमीर अल बहर’ म्हणजे समुद्राचा सेनापती यात सापडते. १४व्या शतकात डचांनी ‘ॲडमायरल’ आणि १६व्या शतकात इंग्रजांनी तो ‘ॲडमिरल’मध्ये बदलला. कमोडोर हा हुद्दा डचांनी तयार केल्याचे मानले जाते. जहाजांच्या तुकडीची काळजी घेईल, असे पद त्यांना तयार करायचे होते. या शब्दाचा उगम डच कमांडर शब्दापासून झाला. तो जुन्या फ्रेंच अथवा स्पॅनिश कमांडरकडून घेतला गेला असावा, असे अभ्यासक मानतात. कॅप्टन हा लॅटीन भाषेतील डोके या शब्दापासून आल्याचे सांगितले जाते. लष्करी तुकडीच्या प्रमुखासाठी कॅपिटॅनियस हा लॅटीन शब्द होता. फ्रेंचमध्ये त्याला कॅपिटन म्हटले जायचे तर इंग्रजीत तो कॅप्टन बनल्याचे मानले जाते. कमांडर हुद्दा लॅटीन भाषेतील कमांडरेतून तर लेफ्टनंटचे मूळ फ्रेंच भाषेत असल्याचा दाखला दिला जातो.
मराठा, मुघल काळातील हुद्दे कसे होते?
छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळ व घोडदळाप्रमाणेच मराठ्यांच्या आरमाराकडे लक्ष देऊन ते सुसज्ज केले. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेत जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली, नवीन किल्ले बांधले. प्रत्येक किल्ल्यावर हवालदार नेमले. तेथील जबाबदारी सांभाळण्यासाठी वेगळ्या अधिकाऱ्यांची रचना केली. या ठिकाणी पायदळ आणि घोडदळ असे दोन प्रकारचे सैन्य असे. पायदळात दहा माणसांचा दाहिजा (समूह) असून हवालदार, जुम्लेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत. घोडदळात बारगीर व शिलेदार हे दोन प्रकार होते. २५ बारगीर वा शिलेदारावर एक हवालदार असत. पुढे त्याचप्रमाणे जुमलेदार, सुभेदार, पंचहजारी, सरनोबत असे अधिकारी असत. आरमार, तोफखाना व गुप्तहेर खात्यातही कौशल्य जोखून जबाबदारी दिली जात असे. मराठा साम्राज्यात सेनेचे प्रमुख सेनापती अर्थात सरसेनापती हे पदही अस्तित्वात होते. मुघलकाळात दारुगोळ्याचा स्वतंत्र विभाग सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याला ‘दरोगा ए तोफखाना’ म्हटले जायचे. मुघलांच्या तोफांची नावे शेरदहाड, फतहलष्कर, धुमधाम, जमजमा अशी लक्षवेधक असायची. तोफांच्या कार्याचे निरीक्षण करणारा अधिकारी मीर-आतिश तर तोफ चालवणाऱ्याची गोलंदाज अशी ओळख होती.