संदीप नलावडे
हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांच्याविरोधात सध्या खटला चालू आहे. अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यासाठी हा खटला सुरू असला तरी असांज आजारपणामुळे न्यायालयात उपस्थित राहू न शकल्याने याबाबत अद्याप निकाल लागलेला नाही. त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने केली जात असली तरी त्यांची सुटका होण्याची शक्यता कमी आहे. असांज यांच्या प्रत्यार्पण सुनावणीला ‘शेवटची सुरुवात’ असे म्हटले गेले आहे. असांज यांच्यावर पुढील कारवाई काय असेल, याविषयी…
ज्युलियन असांज कोण आहेत? त्यांच्यावर काय आरोप आहेत?
ज्युलियन असांज यांनी २०१० मध्ये जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. मूळचे ऑस्ट्रेलियाचे असलेल्या या संगणकतज्ज्ञाने त्यांचे संकेतस्थळ ‘विकिलिक्स’च्या माध्यमातून अमेरिकी सरकारची हजारो गोपनीय कागदपत्रे उघड केली. अमेरिकेच्या जगभरातील दूतावासांनी पाठवलेले संदेश, पत्रे, लष्कराचे अहवाल आदी गोपनीय कागदपत्रांचा त्यात समावेश होता. विशेष म्हणजे इराक आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या युद्धांवरील संवेदनशील लष्करी माहिती त्यांनी चव्हाट्यावर आणली. अमेरिकी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून बगदादमध्ये बेछूट गोळीबार केला जात असून त्यात इराकी नागरिक व काही युद्ध पत्रकार ठार झाल्याची चित्रफीतही त्यांनी प्रसिद्ध केली. त्यामुळे अमेरिकेचा दुटप्पीपणा उघडकीस आला. अमेरिकेने असांजवर हेरगिरीचा आरोप केला आणि हेरगिरी कायद्यानुसार १७ आणि संगणकाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली १८ गुन्हे नोंदवले.
हेही वाचा >>>विश्लेषण : सीबीएसईकडून प्रायोगिक तत्वावर ‘ओपन बुक परीक्षा’ घेण्याचा निर्णय, ही संकल्पना नेमकी काय? वाचा सविस्तर…
असांजवर कोणत्या प्रकरणात खटला सुरू आहे?
ज्युलियन असांज यांच्यावर अमेरिकेने गुन्हे नोंदविल्यानंतर त्यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यासाठी ब्रिटनमध्ये खटला सुरू आहे. अमेरिकेत हेरगिरीच्या आरोपांना सामोरे जावे लागू नये म्हणून गेल्या सात वर्षांपासून असांज हे कायदेशीर लढाई लढत आहेत. ब्रिटनमधील इक्वेडोरच्या दूतावासात ‘बंदीवान’ असलेल्या आणि पाच वर्षांचा तुरुंगवास भोगणाऱ्या असांज यांनी अमेरिकेत प्रत्यार्पण होऊ नये यासाठी लंडनमधील न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. असांज यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात दोन दिवस युक्तिवाद होणार होता. मात्र आजारपणामुळे असांज सुनावणीस उपस्थित राहू शकले नाहीत. कोठडीत असताना असांज यांची प्रकृती खालावल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. २०१९पासून ब्रिटनमध्ये कारावासात असलेले असांज यांची प्रकृती ढासळत असून, त्यांचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण झाल्याचे त्यांच्या पत्नी स्टेला असांज यांनी म्हटले आहे. न्यायालयाने असांज यांची याचिका मान्य न केल्यास त्यांचे प्रत्यार्पण निश्चित मानले जात आहे.
असांजचे अमेरिकेत प्रत्यार्पण झाल्यास काय होऊ शकते?
हेरगिरीप्रकरणी असांज यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण झाल्यास अमेरिकेतील न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला चालवला जाईल. लष्करी आणि राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित वर्गीकृत दस्तावेज प्राप्त करणे व उघड करणे, हेरगिरी कायद्याचे उल्लंघन करणे या प्रकरणात १८ आरोपांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. अमेरिकेत हेरगिरी हा मोठा गुन्हा मानला जातो. त्यामुळे जर असांज यांच्यावर हेरगिरीचा आरोप सिद्ध झाल्यास त्यांना १७५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. असांज यांना कुख्यात गुन्हेगार, दहशतवाद्यांसाठीच्या कारागृहात ठेवणार नाही, असे आश्वासन अमेरिकेने दिले असले तरी अमेरिकी तुरंगात असांज यांच्या जिवाला धोका असल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
हेही वाचा >>>‘ओरिजिन’च्या निमित्ताने: भारतीय सिनेसृष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रण केव्हा व कुणी केले?
असांज यांच्या समर्थनार्थ निदर्शने का करण्यात आली?
हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या असांज यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आवाज उठविला जात आहे. असांज यांनी अमेरिकेचा दुटप्पीपणा उघडकीस केला असून या देशाच्या अमानवी व क्रूर कृत्याविरोधात आवाज उठविला असल्याने असांज यांना अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. असांज यांच्याविरोधात लंडनच्या ज्या न्यायालयात खटला सुरू आहे, त्या न्यायालयासमोर काही दिवसांपूर्वी असांज यांच्या समर्थकांनी निदर्शने केली. असांज यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण केले जाऊ नये, अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. असांज यांची प्रकृती ढासळत असून त्यांना तुरुंगात शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आराेप त्यांच्या पत्नीने केला आहे. असांज यांना अमेरिकेत न्याय मिळणार नाही. रशियाच्या तुरुंगात नुकताच पुतीन यांचा कट्टर विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाला. हा धागा पकडून असांज यांची पत्नी स्टेला यांनी असांज यांच्या जिवाला अमेरिकेत धोका असू शकतो, असा आरोप केला आहे.
sandeep.nalawade@expressindia.com