-ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतविजेत्या फ्रान्सला यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला होता. बॅलन डी ओर विजेता आघाडीपटू करीम बेन्झिमा दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे फ्रान्सचा संघ काहीसा चिंतेत होता. मात्र, फ्रान्सला सर्वाधिक गरज असताना पुन्हा एकदा किलियन एम्बापेने आपली चमक दाखवली. त्याने विश्वचषकातील दोन सामन्यांत तीन गोल केले आणि त्याच्या कामगिरीमुळे फ्रान्सने दोनही सामने जिंकत बाद फेरीतील स्थान निश्चित केले. लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर असल्याने एम्बापेकडे फुटबॉलचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे लहान वयातही त्याला इतर दोन दिग्गजांप्रमाणे पहिला विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा नाही. त्याने आतापर्यंत सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्याचा आजवरचा प्रवास कसा होता आणि भविष्यात त्याची वाटचाल कशी असू शकेल याचा आढावा.

एम्बापेचे सुरुवातीचे जीवन कसे होते?

वडील फुटबॉल प्रशिक्षक आणि आई हॅण्डबॉल खेळाडू. त्यामुळे खेळाचे बाळकडू एम्बापेला घरूनच मिळाले. एम्बापे हा पॅरिसच्या बॉन्डी या उपनगरात लहानाचा मोठा झाला. हे उपनगर गुन्हेगारी आणि दहशतवादाचे उगम स्थान मानले जायचे. मात्र, एम्बापे कधीही चुकीच्या मार्गावर गेला नाही. आपल्याला फुटबॉलपटू व्हायचे हे त्याने निश्चित केले होते. चेंडू पायात खेळविण्याची त्याची शैली अफलातून होती. त्याचबरोबर त्याच्याकडे इतरांपेक्षा अधिक वेग होता. तो एखाद्या धावपटूसारखा मैदानात धावतो. त्याला रोखणे किंवा त्याला गाठणे प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान असते. एएस बॉन्डी क्लबसोबत त्याने आपल्या फुटबॉलच्या कारकीर्दीला सुरुवात केली. अँटेनियो रिकार्डो हे त्याचे पहिले प्रशिक्षक होते. फ्रान्समध्ये सर्वाधिक मुले ही मैदानावर खेळताना दिसतात. तसा एम्बापे होता. अन्य तरुण फ्रेंच खेळाडूंप्रमाणे तो क्लेयरफॉन्टेन अकादमीत दाखल झाला. वयाच्या १६व्या वर्षी मोनॅकोशी करारबद्ध होण्यापूर्वी एम्बापेने रेयाल माद्रिदसह अनेक युरोपियन क्लबना प्रभावित केले.

मोनॅकोत एम्बापेने स्वतःला कसे घडवले?

युरोपातील बहुतांश बलाढ्य संघ एम्बापेविषयी नुसतीच चर्चा करत असताना मोनॅकोने त्याला तातडीने करारबद्ध केले. त्या वेळी एम्बापेचे वय केवळ १६ वर्षे ३४७ दिवस इतके होते. ट्रॉयसविरुद्धच्या ३-१ विजयात एम्बापेने पहिला गोल केला. मोनॅकोच्या इतिहासात तो गोल करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. तेव्हा त्याचे वय १७ वर्षे आणि ६२ दिवस होते. यापूर्वीचा विक्रम थिएरी ऑन्रीच्या नावावर होता. वय लहान असल्यामुळे एम्बापेची अवस्था इकडे खेळायचे की तिकडे अशी झाली होती. व्यावसायिक पातळीवर तो अजून स्थिरावलाही नव्हता, तोच फुटबॉल विश्वाने त्याची दखल घ्यायला सुरुवात केली होती.

एम्बापेसाठी कोणता हंगाम ठरला निर्णायक?

२०१५-१६च्या फुटबॉल हंगामाच्या अखेरीस एम्बापेकडे लोकांच्या नजरा वळू लागल्या होत्या. मात्र, पुढील हंगाम (२०१६-१७) त्याच्यासाठी निर्णायक ठरला. वयाच्या १७व्या वर्षीच त्याने मोनॅकोला लीग-१चे पहिले विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या भोवतीच्या वलयाला आणि त्याच्यातील श्रेष्ठत्वाला तेथेच सुरुवात झाली. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत एकदाही सामन्याची सुरुवात करण्याची संधी मिळाली नसतानाही तो स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. उपांत्य फेरीपर्यंत त्याने मोनॅकोसाठी सहा गोल केले होते. यात मॅंचेस्टर सिटीविरुद्धच्या ६-६ या बरोबरीत सुटलेल्या सामन्याचाही समावेश होता. त्याने या हंगामात सर्व स्पर्धांत मिळून ४४ सामन्यांत २६ गोल केले.

पॅरिस सेंट-जर्मेनने किती किमतीत एम्बापेला खरेदी केले?

कुमार वयातच एम्बापे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्यामुळे पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने एम्बापेला १ कोटी ६० लाख डॉलरला करारबद्ध केले. तेव्हा तो फुटबॉल विश्वातील दुसरा महागडा खेळाडू ठरला होता. ‘पीएसजी’ने तेव्हा त्याच्यापेक्षा अधिक रक्कम केवळ नेयमारसाठी मोजली होती. ‘पीएसजी’चे व्यवस्थापक उनाई एमेरी यांनी एम्बापेची गुणवत्ता हेरून त्याला थेट संघात घेतले. एम्बापेनेही त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. एम्बापेने पदार्पणात मेट्झविरुद्ध आणि त्यानंतर चार दिवसांनी चॅम्पियन्स लीगमध्ये सेल्टिकविरुद्ध गोल केला. नेयमार, एडिन्सन कवानी आणि एम्बापे यांनी २०१७-१८च्या पूर्ण हंगामात आपला दबदबा निर्माण केला. या हंगामात ‘पीएसजी’ने देशांतर्गत तीनही स्पर्धा जिंकल्या.

विश्वचषक स्पर्धेत एम्बापेने कसा प्रभाव पाडला आहे?

एम्बापेसाठी २०१८ची विश्वचषक स्पर्धा पदार्पणाची होती. फ्रान्सला संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत सर्वाधिक पसंती होती. विश्वचषक स्पर्धेत खेळणारा एम्बापे सर्वात तरुण खेळाडू होता. मात्र, असे असतानाही विश्वचषक स्पर्धेत तो फ्रान्सचा तारणहार ठरला. वयाच्या १९व्या वर्षीच एम्बापेने विश्वचषक स्पर्धेत ४ गोल केले. यातील एक गोल क्रोएशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात होता. आता कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतही एम्बापेने प्रमुख सहकाऱ्यांच्या गैरहजेरीत फ्रान्सची धुरा सांभाळली आहे. तीन गोल करत त्याने फ्रान्सला बाद फेरीत नेले आहे.

एम्बापेने आतापर्यंच्या कारकीर्दीमध्ये किती गोल केले आहेत?

एम्बापेने ११ जून २०१९ रोजी वयाच्या २०व्या वर्षी कारकीर्दीमधील १०० गोलचा टप्पा ओलांडला. फ्रान्सने अँडोराला संघाला ४-० असे पराभूत केले, तेव्हा एम्बापेने ही मजल मारली. लहान वयात कमालीची प्रगल्भता असणाऱ्या एम्बापेचा खेळ सामन्यागणिक बहरताना दिसतो आहे. त्याच्या कामगिरीचा, गुणवत्तेचा आलेख हा सतत उंचावतच आहे. त्याने आतापर्यंत क्लब फुटबॉलमध्ये ३०९ सामन्यांत २२१ गोल, तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये फ्रान्ससाठी ६१ सामन्यांत ३१ गोल नोंदवले आहेत. वयाच्या २३व्या वर्षीच एम्बापेने अनेक विक्रम आपल्या नावे केले असून भविष्यात त्याने मेसी आणि रोनाल्डो यांचेही काही विक्रम मोडले, तर नवल वाटायला नको.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will kylian mbappe break leo messi ronaldo goal record print exp scsg