फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटावर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम विकावे लागण्याची वेळ आल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये सुरू असलेल्या एका खटल्यात मेटा कंपनी अडकली आहे. कंपनीविरोधात अँटीस्ट्रीट खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी कंपनीचे दोन सर्वांत मोठे प्लॅटफॉर्म आहेत. ते म्हणजे इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी)ने आरोप केला आहे की, बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणण्यासाठी मेटाने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप खरेदी केले आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? त्यामुळे खरेच मेटाला इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप विकावे लागू शकते का? त्याविषयी जाणून घेऊ.
मेटावर आरोप काय?
‘एफटीसी’ने आरोप केला आहे की, सोशल अॅप्सशी प्रभावीपणे स्पर्धा करण्यात अपयशी ठरल्यानंतर, मेटाने धोके दूर करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ‘एफटीसी’ने तक्रारीत असा दावा केला आहे की, मेटाने बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणण्यासाठी, तसेच स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म खरेदी केले. मेटाला देण्यात आलेले आव्हान इतिहासातील सर्वांत उच्च-प्रोफाइल अँटीट्रस्ट आव्हानांपैकी एक आहे. ‘एफटीसी’ने केलेले आरोप खरे ठरल्यास मेटाला इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप विकावे लागू शकतात. हे दोन प्लॅटफॉर्म केवळ मेटाच्या व्यवसाय मॉडेलसाठीच नव्हे, तर जागतिक संप्रेषणासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मेटाकडून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची खरेदी
२०१२ मध्ये फेसबुकने इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मची खरेदी केली. त्यावेळी इन्स्टाग्राम बाजारात नवीन होते. हे प्लॅटफॉर्म केवळ फोटो शेअरिंगसाठी वापरले जायचे, त्यावर कोणतीही जाहिरात नव्हती आणि फॉलोअर्सचे प्रमाणदेखील कमी होते. फेसबुकने इन्स्टाग्राम एक अब्ज डॉलर्स रोख आणि स्टॉकमध्ये खरेदी केले. फेसबुकने इन्स्टाग्राम ही पहिली कंपनी विकत घेतली. दोन वर्षांनंतर २०१४ मध्ये कंपनीने मेसेजिंग सेवा असलेल्या व्हॉट्सअॅपची खरेदी केली. तब्बल २२ अब्ज डॉलर्स मोजून व्हॉट्सअॅप कंपनीची खरेदी करण्यात आली.
या खरेदीनंतर फेसबुक डेस्कटॉप-केंद्रित मॉडेलवरून मोबाईल-फर्स्ट प्लॅटफॉर्मकडे वळले. तरुण वापरकर्त्यांमध्ये याची लोकप्रियता वाढली. एफटीसीने आरोप केला आहे की, २००८ मध्ये मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केलेल्या धोरणाचा अवलंब मेटाने केला. झुकरबर्ग यांनी स्पर्धेपेक्षा खरेदी करणे योग्य, असे म्हटले होते. त्यांच्या सूत्रानुसार, फेसबुकने बाजारातील स्पर्धात्मक कंपन्यांची खरेदी केली आहे, असा ‘एफटीसी’चा आरोप आहे.
मार्क झुकरबर्ग यांची प्रतिक्रिया काय?
खटल्याच्या पहिल्या दिवशी एफटीसीचे वकील डॅनियल मॅथेसन यांनी झुकरबर्ग यांना प्रश्न विचारला असता, त्यावर ते म्हणाले, “लोकांना त्यांच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करता याव्यात, इतरांबद्दलच्या गोष्टी जाणून घेता याव्यात यासाठी आम्ही फेसबुकवर २००६ मध्ये न्यूज फीड हे फीचर सुरू केले. तसेच मी इन्स्टाग्राम हे अॅप त्यांच्या सोशल नेटवर्कमुळे नव्हे, फोटोशी संबंधित फीचर्समुळे विकत घेतले.” मेटाने जाणूनबुजून फेसबुकच्या बाजूने इन्स्टाग्रामकडे दुर्लक्ष केले का, असा प्रश्न झुकरबर्ग यांना विचारला असता, झुकरबर्ग यांनी असहमती दर्शविली. “प्रत्यक्षात, आम्ही खरेदी केल्यानंतर त्यात खूप गुंतवणूक केली,” असे त्यांनी सांगितले.
फेडरल ट्रेड कमिशनचे म्हणणे काय?
एफटीसीचा असा विश्वास आहे की, मित्र आणि कुटुंबासह सामग्री (फोटो, व्हिडीओ, संदेश) सामायिक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोशल प्लॅटफॉर्मच्या विशिष्ट बाजारपेठेत मेटाची मक्तेदारी आहे. त्यात टिकटॉक, यूट्यूब, अॅपल व एक्ससारख्या प्लॅटफॉर्मचा सहभाग नाही. एफटीसीचे वकील डॅनियल मॅथेसन यांचा असा युक्तिवाद आहे की, मेटाने बाजारातील स्पर्धा कमी करून, त्यांचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप खरेदी केले. या खटल्यात असाही दावा करण्यात आला आहे की, या खरेदीनंतर वापरकर्त्यांच्या पसंतीवर मर्यादा आणण्यात आली आहे.
मेटा कंपनीने एका निवेदनात असा युक्तिवाद केला आहे, “खटल्यातील पुरावे हे दर्शवतात की, इन्स्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअॅप चिनी मालकीच्या टिकटॉक, यूट्यूब, एक्स, आयमेसेज आणि इतर अनेकांशी स्पर्धा करतात. ही गोष्ट जगातील प्रत्येक १७ वर्षांच्या मुलाला माहीत आहे. एफटीसीने आमच्या खरेदीचा आढावा घेतल्यानंतर आणि त्यांना मंजुरी दिल्यानंतर १० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मेटाने पुढे असा युक्तिवाद केला की, इन्स्टाग्राम खरेदी केल्यानंतर त्यांच्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारला आहे.
मेटाच्या मुख्य कायदेशीर अधिकारी जेनिफर न्यूस्टेड यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये पुढे लिहिलेय, “मेटाचे प्रशासन चिनी मालकीच्या टिकटॉक प्लॅटफॉर्मला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे एफटीसी एका मोठ्या अमेरिकन कंपनीला तोडण्याचा प्रयत्न करीत आहे, हा निव्वळ मूर्खपणा आहे.”
इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपशिवाय मेटाचे काय होणार?
संशोधन फर्म ‘ईमार्केटर’नुसार, इन्स्टाग्राम २०२५ मध्ये ३७.१३ अब्ज डॉलर्स उत्पन्न मिळवील, अशी शक्यता आहे. “इन्स्टाग्राम आता अमेरिकेत मेटाचा पैशांचा सर्वांत मोठा स्रोत आहे आणि मेटाची सर्वांत फायदेशीर बाजारपेठ आहे,” असे ईमार्केटरच्या प्रमुख विश्लेषक जस्मिन एनबर्ग यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले. “इन्स्टाग्रामदेखील वापरकर्त्यांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रियतेच्या आघाडीवर आहे,” असेदेखील त्यांनी सांगितले. दुसरीकडे मेटाच्या सध्याच्या महसुलात व्हॉट्सअॅपचे कमी योगदान आहे. दैनंदिन वापरकर्त्यांच्या बाबतीत हे कंपनीचे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे.
झुकरबर्ग यांनी या विभागाचे वर्णन कंपनीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असे केले आहे. जर एफटीसी त्यांचे आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाले, तर बाजारपेठेत स्पर्धा पुनर्संचयित होईल आणि हे सिद्ध करण्यासाठी एफटीसीला दुसरी चाचणी घ्यावी लागेल, जी आणखीनच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रकरणातील सुनावणीदरम्यान झुकरबर्ग आणि कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) शेरिल सँडबर्ग या दोघांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.