चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्यास आता अवघा दीड महिना शिल्लक असताना पाकिस्तानातील स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) दबाव वाढू लागला आहे. हे काम वेळेत पूर्ण होण्याची पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) हमी देण्यात आली असली, तरी ‘आयसीसी’ला अन्य पर्यायांचाही विचार करावा लागत आहे. गतवर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान न्यूयॉर्क येथील तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या स्टेडियमच्या अवस्थेवरून ‘आयसीसी’वर बरीच टीका झाली होती. त्यामुळे आता त्यांना अधिक खबरदारी बाळगावी लागत आहे. स्पर्धा पाकिस्तानातून हलवण्यात यावी यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचा दबाव असल्याचीही चर्चा आहे.
नूतनीकरणाचे काम संथगतीने…
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील बहुतेक सामने पाकिस्तानात, तर भारताचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. पाकिस्तानातील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, लाहोर येथील गद्दाफी स्टेडियम आणि कराची येथील नॅशनल बँक स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप बरेच काम शिल्लक असून ते पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा कालावधी लागणार असल्याचे ‘पीसीबी’मधील पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे ‘आयसीसी’ला ही स्पर्धा पाकिस्तानाबाहेर हलविण्याबाबत विचार करावा लागत असल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा-ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
आयोजनाचा हट्ट, पण कामास विलंब
चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद राखण्यासाठी पाकिस्तानला बरीच मेहनत करावी लागली. सुरक्षेबाबत खात्री नसल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला. त्यानंतर ही स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार (हायब्रिड मॉडेल) आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू झाली. सुरुवातीला पाकिस्तानने यास स्पष्ट नकार देताना स्पर्धेचे संपूर्ण यजमानपद राखण्यासाठी हट्ट केला. अखेरीस आर्थिक गणितांचा विचार करून ‘पीसीबी’ने भारताचे सामने दुबईत आणि अन्य सामने पाकिस्तानात खेळविण्यास होकार दिला. परंतु यजमानपदाचे हक्क राखण्यात यश आले असले, तरी ‘पीसीबी’ला स्टेडियम नूतनीकरणाचे काम वेळेवर पूर्ण करता आलेले नाही. मैदान आणि प्रेक्षकांसाठीची आसने यादरम्यानचे कुंपण, ‘फ्लडलाइट्स’ (विद्युतझोत), आसने, ड्रेसिंग रूम आणि मान्यवरांसाठी असणारी विशेष जागा (हॉस्पिटॅलिटी बॉक्स) याचे काम अजूनही सुरू आहे.
‘पीसीबी’कडून काय स्पष्टीकरण?
पाकिस्तानातील स्टेडियमबाबत उभे करण्यात आलेले चित्र योग्य नसून चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी प्रगतिपथावर असल्याची ग्वाही ‘पीसीबी’कडून देण्यात आली आहे. ‘‘चॅम्पियन्स ट्रॉफीचे महत्त्व लक्षात घेता ‘पीसीबी’ने स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. यासाठी जवळपास १२०० कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्टेडियममधील कामावर ‘पीसीबी’ आणि संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत. नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे,’’ असे ‘पीसीबी’मधील अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा-एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?
पाकिस्तानसाठी ही स्पर्धा का महत्त्वाची?
पाकिस्तानला जवळपास तीन दशकांनी ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धेच्या आयोजनाची संधी लाभली आहे. पाकिस्तानने १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-यजमानपद भूषविले होते. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांसारख्या आघाडीच्या संघांनी पाकिस्तानचे दौरे केले असले, तरी अजूनही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. सुरक्षेचा मुद्दाही आहेच. हे चित्र बदलण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद यशस्वीरीत्या भूषविणे पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अन्य कोणते आव्हान?
पाकिस्तानातील तीनही स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या कामाची चिंता असतानाच ‘आयसीसी’समोर आता अन्य मोठे आव्हान उपस्थित झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तान संघाविरुद्ध सामने न खेळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तालिबानी राजवटीत अफगाणिस्तानातील महिलांची गळचेपी, महिलांना क्रीडा स्पर्धांत खेळण्यास बंदी याच्या निषेधार्थ आपल्या क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाण संघाविरुद्ध खेळू नये अशी मागणी इंग्लंडमधील खासदारांकडून करण्यात आली. पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांनीही अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तानचा ‘ब’ गटात समावेश असून त्यांचे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळी सामने होणार आहेत. त्यामुळे या तीनही संघांच्या भूमिकेवर ‘आयसीसी’ला लक्ष ठेवावे लागणार आहे. सध्या तरी या सामन्यांना कोणताही धोका नसल्याचे मानले जात आहे.
आणखी वाचा-Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
भारताचा दबाव किती?
भारतीय क्रिकेट मंडळ अर्थात बीसीसीआय किंवा भारत सरकारने या मुद्द्यावर अधिकृत भूमिका घेतलेली नाही. पण मुळात भारतीय संघास पाकिस्तानात खेळण्याची संमती मिळणार नसल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड प्रकारे आयोजित करण्यात येत आहे. आता सरसकट स्पर्धाच पाकिस्तानबाहेर हलवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानातील माजी खेळाडू, पदाधिकारी, राजकारणी याबद्दल भारताला दोष देत आहेत. पण आर्थिक आणि राजकीय बजबजपुरी बनलेल्या पाकिस्तानची ही मोठी स्पर्धा भरवण्याची तयारीच दिसत नाही, आणि याचे खापर भारतावर फोडले जात असल्याचे आपल्याकडील मंडळींचे म्हणणे आहे. भारताचे जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष बनल्यामुळे त्यांनीच हे सगळे सुरू केल्याचे पाकिस्तानातील काहींना वाटते. पण आयसीसीचे निकष याच एका मुद्द्यावर पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी भरवण्याच्या परीक्षेत नापास ठरू शकतो, हे जय शहांनाही ठाऊक आहे.