स्पेनच्या कार्लोस अल्कराझने विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी जेतेपद पटकावताना छाप पाडली. या जेतेपदानंतर अल्कराझ भविष्यात फेडरर, नदाल आणि जोकोविच या ‘अव्वल तीन’ खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवू शकेल अशी चर्चा सुरू झाली आहे. अल्कराझची आतापर्यंतची वाटचाल कशी राहिली, आगामी काळात त्याच्यासमोर कोणकोणती आव्हाने असतील याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विम्बल्डन जेतेपदाची वाटचाल…

जागतिक टेनिसमध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत २१ वर्षीय स्पेनच्या अल्कराझने सर्बियाच्या २४ ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचला ६-२, ६-२, ७-६ (७-४) असे सरळ सेटमध्ये पराभूत करत जेतेपद पटकावले. अल्कराझचे हे सलग दुसरे विम्बल्डन जेतेपद आहे. गेल्या वर्षीही अल्कराझने जोकोविचला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरले होते. त्या वेळी सामना पाच सेटपर्यंत गेला होता. या वेळी अल्कराझने तीन सेटमध्येच जेतेपद पटकावण्याची किमया साधली. त्याआधी उपांत्य सामन्यात अल्कराझने पाचव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला ६-७ (१-७), ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत केले. त्याआधी उपांत्यपूर्व सामन्यात त्याने अमेरिकेच्या टॉमी पॉलवर ५-७, ६-४, ६-२, ६-२ असा विजय मिळवला होता.

हेही वाचा : विश्लेषण: जीवघेण्या हल्ल्यामुळे मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल का?

आघाडीच्या खेळाडूंबरोबर…?

अल्कराझने २०२२ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकत आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. यानंतर २०२३ मध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकली. या वर्षी फ्रेंच व विम्बल्डन स्पर्धा जिंकताना त्याने सर्वांचे लक्ष वेधले. टेनिसमधील कोणत्याही खेळाडूने २२ वर्षांचा होईपर्यंत त्याच्याइतकी ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवलेली नाहीत. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीतील त्याची कामगिरी ४-० अशी आहे. सध्याच्या काळातील सर्वांत यशस्वी पुरुष एकेरी टेनिसपटू म्हणून जोकोविचकडे पाहिले जाते. त्याने आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवली आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील १०, विम्बल्डनमधील सात, फ्रेंच स्पर्धेतील तीन आणि अमेरिकन स्पर्धेतील चार जेतेपदांचा समावेश आहे. स्पेनच्या राफेल नदालच्या नावे २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे (दोन ऑस्ट्रेलियन खुली, १४ फ्रेंच खुली, दोन विम्बल्डन व चार अमेरिकन खुली) आहेत. तसेच, स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे (सहा ऑस्ट्रेलियन खुली, एक फ्रेंच खुली, आठ विम्बल्डन आणि पाच अमेरिकन खुली ) मिळवली आहेत. या तीन दिग्गज खेळाडूंमधील फेडररने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. नदालही दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेरच होता. तो या हंगामाअंती निवृत्ती होणार आहे. जोकोविचलाही गेल्या काही काळापासून दुखापतीने सतावले आहे. त्यामुळे अल्कराझची लय आणि वय लक्षात घेता या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत बसण्याची संधी त्याला आहे.

कारकीर्दीची सुरुवात कशी?

अल्कराझने वयाच्या १५व्या वर्षी आपल्या टेनिस कारकीर्दीला सुरुवात केली. त्याने ‘आयटीएफ’ पुरुष जागतिक टेनिसमध्ये तीन, तर ‘एटीपी’ चॅलेंजर दौऱ्यात चार जेतेपदे पटकावली. मे २०२१ मध्ये त्याने क्रमवारीत आघाडीच्या १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्याने याच वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मार्च २०२२मध्ये अल्कराझने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. यानंतर माद्रिद टेनिस स्पर्धा जिंकताना त्याने नदाल, जोकोविच आणि ॲलेक्झांडर झ्वेरेव यांना पराभूत केले. २०२३ मध्ये त्याने अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकताना पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. वर्षाअखेरीस तो ‘एटीपी’ क्रमवारीत अग्रस्थानी होता.

हेही वाचा : विश्लेषण: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि नॉन-क्रिमिलेअरचा वाद काय आहे?

कोणत्या खेळाडूंकडून आव्हान?

अल्कराझने कमी वयातच चांगली कामगिरी करत छाप पाडली. मात्र, आगामी काळात त्याला अनेक खेळाडूंचे आव्हान असणार आहे. जर्मनीचा ॲलेक्झांडर झ्वेरेव गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची त्याने २०२१, २०२२ आणि २०२४ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. तर, या वर्षी त्याने विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. त्याने २०२१ मध्ये अमेरिकन टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपाचेही आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. त्याने गेल्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या वेळच्या विम्बल्डन टेनिसमध्ये त्याचे आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले होते. त्सित्सिपासकडे चांगला खेळ करण्याची क्षमता असल्याने त्याला कमी लेखून चालणार नाही. नॉर्वेचा कॅस्पर रूडही चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. या वेळच्या विम्बल्डनमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नसली, तरीही फ्रेंच टेनिस स्पर्धेची २०२२ व २०२३ मध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती. २०२२ मध्ये त्याने अमेरिकन टेनिसच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचा विजेता यानिक सिन्नेरही प्रभावी कामगिरी करत राहणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will spanish tennis player carlos alcaraz become like rafael nadal novak djokovic and roger federer print exp css
Show comments