मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न २०१४ मध्ये पूर्ण झाले. आजघडीला मुंबईतील चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल आहेत. तर लवकरच ठाणे आणि मिरा-भाईंदरवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे वसई-विरार, बदलापूर, उल्हासनगरवासियांचेही मेट्रोकडे डोळे लागले आहेत. आता बदलापूर आणि वसई-विरारच्या मार्गिका लवकरच मार्गी लागणार आहेत. एमएमआरडीएने आता या मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तर दुसरीकडे ‘मेट्रो ५’चा उल्हासनगरपर्यंत करण्याचा विस्तार निर्णय घेतला आहे. आता कोणत्या मेट्रो मार्गिका मार्गी लागणार आणि त्याचा फायदा कोणाला, कसा होणार याचा हा आढावा…
एमएमआरमध्ये ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रोचा पर्याय पुढे आणला. आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरविणे आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यापैकी ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ आणि ‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व मेट्रो ७’ मार्गिका सेवेत दाखल झाल्या आहेत. सध्या ‘ अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब’ , ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’, ‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’, ‘कासारवडवली – गायमुख मेट्रो ४अ’, ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’, ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ , ‘अंधेरी – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’, ‘दहिसर – भाईंदर मेट्रो ९’ आणि ‘कल्याण – तळोजा मेट्रो १२’चे काम सुरू असून लवकरच ‘गायमुख – मिरारोड मेट्रो १०’ या मार्गिकेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी ‘मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८’, ‘शिवाजी चौक – विरार मेट्रो १३’ आणि ‘अंबरनाथ – बदलापूर मेट्रो १४’ मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व १४ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईत ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही टोकावरून कुठेही मेट्रोने जाता येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे आता प्रस्तावित ‘मेट्रो १०’, ‘मेट्रो १३’ आणि ‘मेट्रो १४’ मार्गिकांची कामे हाती घेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
‘मेट्रो १०’, ‘मेट्रो १३’ आणि ‘मेट्रो १४’
गायमुख – शिवाजी चौक दरम्यान ९.२९ किमी लांबीची ‘मेट्रो १०’ मार्गिका प्रस्तावित असून या मार्गिकेत चार मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. ही मार्गिका ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चा (वडाळा – कासारवडी – गायमुख) विस्तार आहे. या मार्गिकेसाठी अंदाजे ४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेमुळे ठाण्यावरून मिरा रोडला जाणे सोपे होणार आहे. तर ‘मेट्रो १३’ मार्गिका २३ किमी लांबीची असून या मार्गिकेत २० मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेसाठी अंदाजे ७ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘कांजूरमार्ग – बदलापूर १४ मेट्रो’ मार्गिका ३८ किमी लांबीची असून या मार्गिकेसाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात १५ स्थानकांचा समावेश आहे. या तिन्ही मेट्रो मार्गिका आतापर्यंत केवळ कागदावर होत्या. मुंबई, ठाण्यात मेट्रोचे जाळे विणले जात असताना वसई-विरार, मिरारोड, बदलापूरवासियाचे मेट्रोचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न होता. मात्र आता एमएमआरडीएने या प्रस्तावित मेट्रो मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या तिन्ही मेट्रो मार्गांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात वसई-विरार, मिरारोडवासियांसह बदलापूरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
पर्यावरण प्रभाव मूल्यांकन कधी?
मुंबईला थेट बदलापूरशी जोडणाऱ्या ३८ किमी लांबीच्या ‘मेट्रो १४’ मार्गिकेचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या मार्गिकेच्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी काही दिवस आधी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मार्गिकेचा सविस्तर आराखडा मिलान मेट्रो कंपनीने तयार केला आहे. आता मार्गिका प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करून पर्यावरणविषयक परवानगी मिळविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या कामास येत्या काही महिन्यांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो १४’ पाठोपाठच आता ‘मेट्रो १०’ आणि ‘मेट्रो १३’ मार्गिकांसाठी विविध प्रकारच्या मान्यता घेऊन प्रत्यक्षात कामे सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
‘मेट्रो ५’ची धाव आता उल्हासनगरपर्यंत?
‘मेट्रो १०’, ‘मेट्रो १३’ आणि ‘मेट्रो १४’ मार्गिका मार्गी लावतानाच एमएमआरडीएने ‘मेट्रो ५’ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नुकतीच झालेल्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिका २४.९ किमी लांबीची असून या मार्गिकेवर १७ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. ही मार्गिका कल्याणपर्यंत प्रस्तावित होती. मात्र आता ‘मेट्रो ५’ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यानुसार खडकपाडा, कल्याण – उल्हासनगर असा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता उल्हासनगरवासियांचेही मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.