पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, भारतीय संघाला सरकारकडून या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला नाही. शुक्रवारपासून श्रीलंकेत ‘आयसीसी’च्या बैठका होणार आहेत. त्यावेळी या मुद्द्यावर खलबते होतील. भारतीय संघ पाकिस्तानात जाईल की तटस्थ ठिकाणी सामने होतील, पाकिस्तानची यावेळी भूमिका काय असेल, याचा घेतलेला हा आढावा.

पाकिस्तानात न जाण्याची प्रमुख कारणे कोणती?

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन १९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आपला कार्यक्रम ‘आयसीसी’ला सादर केला आहे. यामध्ये भारताचे साखळी फेरीतील तीनही सामने लाहोर येथे होणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर स्पर्धेचे उपांत्य फेरीतील सामने कराची (५ मार्च) आणि अंतिम सामना लाहोर (९ मार्च) येथे होईल. २००८ मध्ये भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही देशांमध्ये एकही द्विदेशीय मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ केवळ ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र, ‘आयसीसी’ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात झाले, तरी भारतीय संघ तटस्थ ठिकाणी सामने खेळण्याबाबत आग्रही असतो.

हेही वाचा >>>मोक्ष प्रदान करणाऱ्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती ठरतेय वादग्रस्त; काय आहे या मंदिराचा प्राचीन इतिहास?

चॅम्पियन्स करंडकाबाबत कोणता निर्णय?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकींना शुक्रवारपासून सुरुवात होणार असून वार्षिक सर्वसाधारण सभा ही २२ जुलैला पार पडेल. चॅम्पियन्स करंडकाचा मुद्दा हा बैठकीच्या कार्यक्रमाचा भाग नसला, तरीही दोन्हीही मंडळांकडून हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. भारताकडून ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा या बैठकीसाठी कोलंबोला उपस्थित असतील, तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून हा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्याची शक्यता आहे. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानात जाऊन खेळण्याचे टाळल्यास ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे सामने पुन्हा संमिश्र प्रारूपात (हायब्रिड मॉडेल) खेळवू शकते. त्याकरिता संयुक्त अरब अमिराती (यूएई) व श्रीलंका या दोन पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, या बैठकीत संमिश्र प्रारूपाला पाकिस्तानकडून विरोध केला जाण्याची शक्यता आहे. त्यातच भारत सरकारने पाकिस्तानात जाण्यासाठी परवानगी नाकारल्याचा लेखी पुरवा द्या, असेही पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, भारताने पाकिस्तान न जाण्याचा निर्णय घेतल्यावर संमिश्र प्रारूपाचा अवलंब करण्यात आला आणि भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळला.

हेही वाचा >>>शांतता कराराने कोकेनचा व्यापार कसा आला अडचणीत?

पाकिस्तानमध्ये जाण्यास संघ उत्सुक का नसतात?

पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर सर्वच देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणावरून अनेक संघांनी पाकिस्तान दौरा करणेच टाळले. २००९च्या या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेटला पुन्हा सुरुवात होण्यात २०१५ चे वर्ष उजाडले. त्यापूर्वी, पाकिस्तान संघ आपले बहुतांश सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळत होता. झिम्बाब्वेचा संघ पूर्ण सदस्य म्हणून प्रथम पाकिस्तान दौऱ्यावर गेला. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा महिला संघही पाकिस्तानात खेळण्यासाठी आला. ऑक्टोबर २०१७ मध्ये श्रीलंकेचा संघ तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यास पाकिस्तानात दाखला झाला. एप्रिल २०१८ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ ट्वेन्टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान गेला. २०१९ मध्ये श्रीलंकेचा संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तानत दाखल झाला होता. यानंतर २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटीसह मर्यादित षटकांचे सामने खेळला. तर, गेल्या वर्षी इंग्लंड संघाने कसोटी व ट्वेन्टी-२० मालिकेत सहभाग नोंदवला. तसेच, न्यूझीलंड संघानेही पाकिस्तानात मालिका खेळल्या.

भारताचा पाकिस्तान दौरा किती वेळा?

भारताने आपला पहिला पाकिस्तान दौरा हा १९५४-५५ मध्ये केला होता. यावेळी भारतीय संघ विनू मंकड यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला पाच कसोटी सामने खेळण्यासाठी गेला होता. ही मालिका बरोबरीत राहिली. यानंतर भारतीय संघ १९७८-७९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात त्यांनी तीन कसोटी व तीन एकदिवसीय सामने खेळले. या दोन्ही मालिका भारताला गमवाव्या लागल्या. १९८२-८३ मध्ये भारताने पाकिस्तान दौऱ्यात सहा कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. यानंतर १९८४-८५ मध्ये भारतीय संघाने कसोटी मालिका बरोबरीत सोडवली, तर एकदिवसीय मालिका जिंकली. यानंतर १९८९-९० मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला. याच दौऱ्यात सचिन तेंडुलकरची जगाला ओळख झाली. या दौऱ्यातील कसोटी मालिका बरोबरीत राहिली, तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने जिंकली. यानंतर १९९७-९८ मध्ये भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी दाखल झाला. ही मालिका भारताने गमावली. २००३-०४ मध्ये भारतीय संघ कसोटी व एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानला गेला. या दोन्ही मालिकेत भारताने यश मिळवले. २००५-०६ मध्ये भारताने पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिका गमवाली. पण, एकदिवसीय मालिकेत विजय नोंदवला. यानंतर २००८ मध्ये भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.