गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेला हत्ती कॅम्प वनखात्याकडून दुर्लक्षित असताना, आता महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात नव्याने ‘हत्ती कॅम्प’ उभारला जात आहे. त्यासाठी कर्नाटकातून हत्ती आणले जात आहेत. बचाव कार्य आणि गस्तीसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. जेथे वाहनांना प्रवेश नसतो, तेथे गस्तीसाठी हत्ती उपयोगी आहेत, असे वनखात्याचे म्हणणे आहे. कर्नाटकातून हत्ती आणले जात असतानाच नकार दिलेल्या महाराष्ट्रातूनदेखील एक मादी हत्ती आणली जात आहे. त्यामुळे या नव्या हत्ती कॅम्पवरून एक नवे वादळ उभे झाले आहे.
पेंच व्याघ्रप्रकल्पात नव्याने ‘हत्ती कॅम्प’ का?
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात ‘अवनी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘टी-१’ वाघिणीला जेरबंद करण्याच्या कारवाईदरम्यान प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. मध्य प्रदेशातील हत्तींवर महाराष्ट्राला अवलंबून राहावे लागले. तर ताडोबातील अप्रशिक्षित हत्तीने एका महिलेला पायदळी तुडवले होते. त्यामुळे बचाव कार्य आणि गस्तीसाठी पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती कॅम्प असावा, अशी कल्पना तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी मांडली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी कर्नाटकला पत्र लिहिले होते, पण करोनामुळे हा प्रस्ताव रेंगाळला होता. आता बचाव कार्य आणि गस्तीसाठी पेंच व्याघ्रप्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात नव्याने ‘हत्ती कॅम्प’ तयार केला जात आहे.
हेही वाचा : विश्लेषण : गाणी म्हणा, नाचा, आनंद व्यक्त करा…इराणमधील नवे आंदोलन का ठरतेय तेथील सरकारसाठी डोकेदुखी?
महाराष्ट्राऐवजी कर्नाटकातील हत्तींना प्राधान्य का?
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात असणारे ‘हत्ती कॅम्प’मधील हत्ती प्रशिक्षित नाहीत. ते अनेक वर्षांपासून केवळ लाकडे वाहून नेण्याच्या कामासाठी वापरले जातात. तर अलीकडे पर्यटनासाठी त्यांचा उपयोग होत आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातील ‘हत्ती कॅम्प’ साठी प्रशिक्षित हत्तीची गरज आहे. जेणेकडून ते बचाव कार्यात कामी येतील. त्यासाठी लहानपणापासूनच हत्तींना प्रशिक्षणाची गरज असते. कर्नाटकातील हत्तींना लहानपणापासूनच प्रशिक्षण दिले जात असल्याने ते प्रशिक्षित आहेत. त्यांच्यावर फार कष्ट घेण्याची गरज नाही, असे वनखात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवीन ‘हत्ती कॅम्प’वर आक्षेप का?
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेल्या ‘हत्ती कॅम्प’मधील हत्तींसाठी माहूत, चाराकटर, पशुवैद्यक यांची पदे वनखात्याला भरलेली नाहीत. परराज्यातील हत्ती आणून मात्र त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. कमलापूर ‘हत्ती कॅम्प’ महाराष्ट्रातील पहिला शासकीय ‘हत्ती कॅम्प’ आहे. याठिकाणी हत्तींच्या संख्येच्या तुलनेत माहूत, चाराकटर यांची तोकडी संख्या असल्याने वारंवार त्यांच्या नियुक्तीची मागणी होऊनही ती फेटाळली. परिणामी हत्तींना प्रशिक्षण नाही. पर्यटक मोठ्या संख्येने येत असताना इतर सुविधाही दिल्या नाहीत. मात्र, पेंच व्याघ्रप्रकल्पात नव्याने ‘हत्ती कॅम्प’ उभारून त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामुळे या नव्या ‘हत्ती कॅम्प’वर आक्षेप आहे.
हेही वाचा : विश्लेषण: हूथी बंडखोरांमुळे महागाईचा भडका?
वनखात्याला कमलापूर ‘हत्ती कॅम्प’ डोईजड झाला का?
राज्यातील पहिला आणि एकमेव गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त कमलापूर येथील सुमारे पाच दशकांपासूनचा शासकीय ‘हत्ती कॅम्प’ नकोसा झाल्याचे पुन्हा एकदा वनखात्याने दाखवून दिले आहे. दोन वर्षांपूर्वी या ‘हत्ती कॅम्प’मधील हत्ती परराज्यातील एका खासगी प्राणीसंग्रहालयाला पाठवण्याचा घाट खात्याने घातला होता. स्थानिकांच्या एकजुटीने हा डाव मोडीत निघाला. मात्र, आता पुन्हा एका व्याघ्रप्रकल्पात नव्याने होऊ घातलेल्या ‘हत्ती कॅम्प’मध्ये हत्ती हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग असूनही या ‘हत्ती कॅम्प’ ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे.
हेही वाचा : करोनाचा नवा जेएन-१ उपप्रकार काय आहे? जाणून घ्या सविस्तर
आता कमलापूरचा हत्ती कॅम्प कशाला हवा?
या व्याघ्रप्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात नव्याने ‘हत्ती कॅम्प’ विकसित करण्यात येत आहे. कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यातून तीन नर आणि एक मादी हत्ती याठिकाणी आणायचे होते. ‘प्रोजेक्ट एलिफंट’ कडून मिळालेल्या मंजुरीनंतर अलीकडेच २७ नोव्हेंबरला ‘भीमा’ आणि ‘सुब्रह्मण्यम’ हे दोन हत्ती येथे दाखल झाले. तर मादी हत्तींबाबत अजूनही हिरवा कंदील या व्याघ्रप्रकल्पाला मिळालेला नाही. त्यामुळे कमलापूरच्या शासकीय हत्ती कॅम्पमधून ‘मंगला’ या ३४ वर्षीय मादी हत्तीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी गुजरातमधील एका खासगी प्राणिसंग्रहालयासाठी पाठवल्या जाणाऱ्या हत्तींची रवानगी स्थानिकांनी रोखून धरली. आता पुन्हा एकदा हत्ती हलवण्याच्या हालचालींना वेग आल्यामुळे स्थानिकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
rakhi.chavhan@expressindia.com