विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रातील विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होत आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर विस्ताराचे कर्मचारी, विमानांसह सर्व गोष्टी एअर इंडियाकडे वर्ग होतील. या विलीनीकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रामुख्याने प्रवासी सेवांशी निगडित अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच वेळी विस्ताराच्या उच्च दर्जाच्या सेवेची पातळी एअर इंडिया गाठणार का, असाही प्रश्न हवाई वाहतूक क्षेत्रातून विचारला जात आहे.

प्रक्रिया कशी पार पडणार?

विस्तारामध्ये टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांची ५१:४९ हिस्सेदारी आहे. विलीनीकरणानंतरच्या कंपनीत सिंगापूर एअरलाइन्सला थेट परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यानंतर लगेचच या विलीनीकरणाची घोषणा केली. विलीनीकरणानंतरच्या एअर इंडियामध्ये सिंगापूर एअरलाइन्सचा २५.१ टक्के हिस्सा असेल. ही प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत पार पाडली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे आणि विनाअडथळा पूर्ण करण्याची पावले दोन्ही कंपन्यांनी उचलली आहेत. विस्ताराच्या विमानांचे क्रमांक १२ नोव्हेंबरनंतर बदलतील. विस्ताराच्या विमानांचे नियोजित वेळापत्रक आणि त्यातील नियुक्त कर्मचारी यात पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत एअर इंडियाकडून बदल केले जाणार नाहीत.

हेही वाचा >>>Netflix’s IC 814: द कंदहार हायजॅक, दहशतवाद्यांच्या नावांवरून पेटला वाद; नेमकं प्रकरण काय?

विलीनीकरणानंतर काय?

विस्ताराच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर आता ३ सप्टेंबरपासून ग्राहकांना ११ नोव्हेंबरपर्यंतचीच तिकिटे खरेदी करता येतील. कारण ११ नोव्हेंबरनंतर विस्ताराची विमाने एअर इंडियाच्या सेवेत समाविष्ट होतील. ग्राहकांनी १२ नोव्हेंबर अथवा त्यानंतरची तिकिटे आधी खरेदी केली असतील तर त्यांना एअर इंडियाची तिकिटे आपोआप मिळतील. याबाबत कंपनीकडून ग्राहकांना स्वतंत्रपणे संपर्क साधून कळविले जाईल. याचबरोबर ११ नोव्हेंबरनंतर विस्ताराऐवजी एअर इंडियाच्या मंचावरूनच तिकिटे खरेदी करावी लागतील. विस्ताराची सेवा ११ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांसाठी नेहमीप्रमाणे सुरू असणार आहे. विस्ताराची सेवा एअर इंडियात विलीन होणार असल्याने आधी तिकिटे खरेदी केलेल्या प्रवाशांना नवीन ई-तिकीट क्रमांक मिळेल, मात्र त्यांचा मूळ पीएनआर कायम राहील. दिवाळीच्या काळात हवाई प्रवाशांची संख्या वाढते. भारतात विमान तिकिटांचा दर जास्त असल्याने प्रवासी आधीच सवलतीत तिकीट खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे दिवाळीच्या काळातील तिकीट खरेदी ग्राहकांनी काही महिने आधीच उरकून घेतलेली असते. ही विलीनीकरण प्रक्रिया दिवाळीनंतर पूर्ण होणार असल्याने मोठा गोंधळ टळणार आहे.

इतर सेवांचे काय होणार?

विस्ताराचा लॉयल्टी प्रोग्रॅमही एअर इंडियाच्या फ्लाईंग रिटर्न्स कार्यक्रमात विलीन केला जाईल. यात विस्ताराच्या ग्राहकांना कोणताही तोटा होणार नाही. ते कोणत्याही अडथळ्याविना एअर इंडियाचे पॉइंट मिळवू शकतील आणि त्यांचा वापर करू शकतील. याचबरोबर विस्ताराच्या प्रवाशांना विमानतळावर मिळणारी लाऊंजची सुविधा ११ नोव्हेंबरपर्यंत कायम राहील. त्यानंतर लाऊंज सुविधा घेतलेल्या विस्ताराच्या प्रवाशांना हे पैसै परत देण्यात येतील. विस्ताराची को-ब्रँडेड क्रे़डिट कार्ड विलीनीकरणानंतरही वैध राहतील. ही कार्डे वापरता येतील मात्र, त्याचे फायदे आणि रिवॉर्ड यात बदल होऊ शकतात. यामुळे अशा कार्डधारकांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून त्यातील नेमके बदल जाणून घ्यावेत.

हेही वाचा >>>विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?

एअर इंडियाचे स्थान वधारणार?

विस्ताराने ९ जानेवारी २०१५ रोजी सेवा सुरू केली. सध्या कंपनीकडे ७० विमाने आहेत. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार कंपनीचा देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठेत १० टक्के आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बाजारपेठेत ४.१ टक्के हिस्सा आहे. एअर इंडियाचा देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठेत १४.२ टक्के आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बाजारपेठेत १३.१ टक्के हिस्सा आहे. या विलीनीकरणानंतर एअर इंडियाचा हवाई वाहतूक बाजारपेठेतील हिस्सा लक्षणीयरीत्या वाढणार असून, कंपनीचे स्थानही वधारणार आहे.

सेवेच्या दर्जाचे काय?

विस्ताराच्या सेवेचा दर्जा हा चांगला आहे. करोना संकट वगळता प्रवाशांची भोजन सेवा कंपनीने बंद केलेली नाही. याबद्दलही कंपनीने दिलगिरी व्यक्त केली होती. विस्ताराचे भोजन आणि सेवा या दोन गोष्टींना प्रवाशांची अधिक पसंती आहे. एअर इंडियात विलीनीकरणानंतर या विस्ताराचा सेवांचा दर्जा कायम राहणार का, असा प्रश्न हवाई वाहतूक क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे. कारण एअर इंडियाकडून कमी तिकीट दरात प्रवाशांना सेवा दिली जाते. यामुळे एअर इंडियाच्या सेवांचा दर्जा विस्ताराशी मिळताजुळता नसल्याचे अनेकांचे मत आहे. पुढील काळात एअर इंडियाच्या सेवेत किती सुधारणा होते, हे पाहावे लागेल.