राज्याचे नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. महामार्गाची रखडलेली कामे मार्गी लावा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांना दिलासा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महामार्गाच्या कामाला गती मिळेल का आणि महामार्गाची सद्यःस्थिती काय याचा थोडक्यात आढावा.
मंत्र्यांच्या दौऱ्यात काय झाले?
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या ४३९ किलो मीटर पैकी २८१ किलोमीटर मार्गाच्या कामाची २० फेब्रुवारीला पाहणी केली. पळस्पे ते हातखंबा दरम्यान महामार्गाच्या परिस्थितीचा, तिथे सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. कशेडी बोगद्यातील दुसऱ्या मार्गिकेच्या कामाची तसेच तेथील गळतीची पाहणी केली. महामार्गावर ठिकठिकाणी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. महाड सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महामार्गावरील उड्डाणपूल, सर्विस रोड, गटारे, महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, पथदिवे, बाह्यवळण रस्ते यांसारखी कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. राज्य आणि केंद्रीय बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय राखून हे काम गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश दिले. कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत खेद व्यक्त केला.
दौऱ्यामागची कारणे?
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम २०१० साली सुरू झाले होते. १५व्या वर्षातही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते झाराप या कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली ते २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. २०२५ उजाडला तरी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक कामे पूर्ण झाली असली तरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कामे रखडले आहेत. जी कामे पूर्ण झाली, तेथील दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे कामाची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी महामार्गाची पाहणी केली आहे.
रखडपट्टीमागील कारणे कोणती?
महामार्गाचे काम रखडण्यामागे निरनिराळे घटक कारणीभूत ठरले आहेत. सुरुवातीला भूसंपादनाच्या कामात दिरंगाई झाली. त्यानंतर कर्नाळा अभयारण्यातील रुंदीकरणासाठी पर्यावरणविषयक परवानगी मिळण्यास उशीर झाला. यानंतर ठेकेदाराची निष्क्रियता आडवी आली. म्हणून ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाविरोधात ठेकेदार न्यायालयात गेला. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येऊन कामे मार्गी लागण्यात दोन-तीन वर्षे निघून गेली. यानंतर नवीन ठेकेदारांना कामे देऊन ती मार्गी लावण्यात आली. याच दरम्यान पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या काँक्रीटीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा नव्याने कामांची सुरवात करावी लागली. यानंतर काही ठेकेदार काम अर्धवट सोडून गेले. त्यामुळे कामात दिरंगाई होत गेली. काम सुरू असतानाच चिपळूण येथे उड्डाणपूल कोसळला. परशुराम घाटात रस्ताच खचला. यामुळेही कामांना उशीर होत गेला.
कामाची सद्यःस्थिती काय?
महामार्गावर नागोठणे, कोलाड, लोणेरे, चिपळूण येथील पुलांची कामे रखडली आहेत. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे ठप्प आहेत. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पुलांसाठी नव्या ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही निविदा प्रक्रिया या महिन्याच्या अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर नवीन ठेकेदाराची नियुक्ती होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यात आणखी कालावधी जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात हे काम सुरू होईल असे सांगितले जात असले तरी त्याला किमान दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे. संगमेश्वर ते लांजा दरम्यान काम अजूनही मार्गी लागलेले नाही. पेणजवळील वाशी नाका येते नव्या पुलाची उभारणी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले आहेत. शंभर कोटी रुपयांचा पूल या ठिकाणी उभारला जाणार आहे. तसे झाल्यास पुलाचे काम सुरू होऊन तो पूर्ण होईपर्यंत आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
दौऱ्यातून काय साध्य होणार?
रवींद्र चव्हाण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे सुमारे १७ हून अधिक पाहणी दौरे केले. कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काम मार्गी लागू शकले नाही. त्यातून फारसे काही साध्य झाले असेही म्हणता येणार नाही. कामांची रखडपट्टी सुरूच राहिली. नवनवीन डेडलाइन येत गेल्या. कामे काही पूर्ण झालीच नाहीत. रवींद्र चव्हाण यांचा आदर्श ठेवत नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला. महामार्गाचे काम मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र मंत्री दौरा आला की महामार्ग विभागाची यंत्रणा रस्त्यावर उतरते. ठेकेदार जोरात काम सुरू असल्याचा आभास निर्माण करतात. मंत्री निघून गेले की यंत्रणाही निघून जाते. कामे रेंगाळत राहतात. त्यामुळे या दौऱ्यांचे फलित काय हे पाहण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.
Harshad.kashalkar@expressindia.com