लोकसभा निवडणुकीला जेमतेम सात महिन्यांचा अवधी आहे. विविध यात्रांच्या माध्यमातून राजकीय पक्ष जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजवादी पक्षाने देशभरातील आतापर्यंतची सर्वात मोठी सायकल यात्रा काढल्याचा दावा केला आहे. ‘देश बचाओ देश बनाओ’ या घोषणेवर आधारित या यात्रेने उत्तर प्रदेशात पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आतापर्यंत दोन हजार किमी अंतर पार केले आहे. यात्रेचा पहिला टप्पा दहा हजार किमीचा असून, एकूण २५ हजार किमी अंतर पार करण्याचे उद्दिष्ट आहे. समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकल आहे. या यात्रेमध्ये कार्यकर्ते हे बेरोजगारी, महागाई तसेच सामान्यांना भेडसावणाऱ्या अन्य प्रश्नांबाबत जनजागृती करत आहेत.
दिल्लीत समारोप
समाजवादी लोहिया वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिषेक यादव यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू आहे. प्रयागराज येथे ९ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. या यात्रेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्याचा समारोप २२ नोव्हेंबर रोजी, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या जयंतीदिनी होईल. तर दुसरा टप्पा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबरला लखनऊ येथून सुरू होईल. दिल्लीत जंतरमंतर येथे २६ जानेवारी रोजी या सायकल यात्रेचा समारोप होईल. आतापर्यंत उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड तसेच पूर्व उत्तर प्रदेशातील ९ जिल्ह्यांत या यात्रेने प्रवास केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या आदेशानुसार आम्ही पक्षाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचे अभिषेक यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांतून विधानसभेच्या ४०३ मतदारसंघांतून ही सायकल यात्रा जाणार आहे.
महत्त्व काय?
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. राज्यात समाजवादी पक्षाचा भाजपशी थेट सामना आहे. विरोधकांची इंडिया आघाडी किंवा भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोघांच्या दृष्टीने राज्यातील ८० जागा महत्त्वाच्या आहेत. गेल्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ६२ तर मित्र पक्ष अपना दलाच्या २ अशा ६४ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बहुजन समाज पक्ष तसेच समाजवादी पक्षाचे आव्हान परतावून लावले होते. बसपला १० तर समाजवादी पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचे राजकारण बरेच बदलले आहे. तरीही राज्यात भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. डबल इंजिन सरकारचा लाभ उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या दृष्टीने समाजवादी पक्ष कशी कामगिरी करणार यावरच देशातील निकालाची दिशा ठरेल. समाजवादी पक्षाला जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून या यात्रेचे महत्त्व आहे. त्याचे मतांमध्ये कितपत रूपांतर होते हे महत्त्वाचे.
हेही वाचा – ‘आफ्रिका वातावरण शिखर परिषदे’चे महत्त्व काय? या खंडातील देशांच्या व्यथा कोणत्या?
यात्रांचा काळ
निवडणुकीचा हंगाम म्हटल्यावर यात्रा आल्याच. भाजपने मध्य प्रदेशात पाच जनआशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. राज्यातील सर्व २३० विधानसभा मतदारसंघांतून १० हजार किमीहून अधिक इतका यात्रांचा प्रवास राहील. २५ सप्टेंबरला भोपाळमध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी या यात्रांचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. राजस्थानमध्ये सर्व २०० विधानसभा मतदारसंघांत भाजपने परिवर्तन यात्रा काढली आहे. दुसरीकडे काँग्रेसने यात्रांमध्ये पुढाकार घेत भाजपला आव्हान दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. याखेरीज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये सात सप्टेंबरला पदयात्रांचे आयोजन केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद महत्त्वपूर्ण ठरला होता. समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात गेल्या चार निवडणुकांत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. यात लोकसभेच्या दोन २०१४ तसेच २०१९ तसेच विधानसभेच्या २०१७ तसेच २२ यांचा समावेश आहे. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवणे तसेच पक्षाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने या सायकल यात्रेकडे पाहिले जात आहे.