जगभरात हवाई तंत्रज्ञानाने भरारी घेतली असून, पाचव्या पिढीच्या (फिफ्थ जनरेशन) अत्याधुनिक विमानांची सगळीकडे चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेने ‘एफ-३५’ हे पाचव्या पिढीतील विमान भारताला देण्याची इच्छा दर्शवली. दोन्ही देशांत लवकरच हा करार होण्याची शक्यता आहे. नियमित खरेदी प्रक्रियेपेक्षा राफेल विमानांप्रमाणेच सरकारी पातळीवर थेट खरेदीचा करार होण्याची शक्यता आहे. पाचव्या पिढीच्या विमानांसंबधी घेतलेला हा आढावा…

अत्याधुनिक विमानांची तातडीने गरज

भारतासमोर चीन आणि पाकिस्तानचे आव्हान पाहता हवाई दलाला अत्याधुनिक लढाऊ विमानांची नितांत गरज आहे. भारतातील लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्सची संख्या अतिशय कमी झाली असून, तातडीने ही कमतरता भरून काढण्याची गरज आहे. देशांतर्गत पातळीवर विमाननिर्मितीत भारत अद्यापही आत्मनिर्भर नाही. तेजस हलक्या लढाऊ विमानांची निर्मिती भारत करीत असला, तरी या विमानाचे इंजिन देशात तयार होत नाही. या पार्श्वभूमीवर रशिया, फ्रान्स, अमेरिका आदी देशांतून भारत हवाई दलाला आवश्यक सामग्री खरेदी करतो. चीनकडेही पाचव्या पिढीतील अत्याधुनिक विमाने आहेत. त्यामुळे भारताला अशा आधुनिक विमानांची गरज तातडीने आहे.

पाचव्या पिढीचे विमान म्हणजे काय?

अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा, अन्य लढाऊ विमानांशी संपर्कयंत्रणा सुसज्ज ठेवण्याची यंत्रणा, शत्रूच्या विमानांना, रडारना चकवा देण्याची विशेष यंत्रणा (स्टेल्थ क्षमता), घातक अशी मारक क्षमता, रडार जॅम करण्याची क्षमता अशी विविध वैशिष्ट्ये पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची सांगता येतील. ही विमाने ध्वनिपेक्षाही अधिक वेगाने उडतात. आधीच्या विमानांच्या तुलनेत या विमानातील तंत्रज्ञान अधिक सुसज्ज आणि एकात्मिक यंत्रणेचे असते. अमेरिकेचे एफ-३५, रशियाचे सुखोई-५७, चीनचे जे-२०, तुर्की तयार करीत असलेले ‘कान’ ही या विमानांची उदाहरणे आहेत. भारतातही अत्याधुनिक बहुउद्देशीय लढाऊ विमानावर काम सुरू असून, काही हजार कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केली गेली आहे.

अमेरिका, रशिया, चीनमधील विमाने

एफ-३५, सुखोई-५७ आणि जे-२० ही या देशांची सध्या असलेली पाचव्या पिढीतील विमाने. यापैकी भारत अमेरिकेशी करार करण्याची दाट शक्यता आहे. चीनकडून ही विमाने घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रशिया हा भारताचा शस्त्रास्त्र आयातीमधील मोठा भागीदार देश. मात्र, सुखोई-५७ विमानांच्या संदर्भात तंत्रज्ञान हस्तांतर, विमानाची किंमत, विमानातील तंत्रज्ञान यावरून २०१८ मध्ये या विमानांच्या संयुक्त निर्मितीतून भारत बाहेर पडला. अमेरिकेबरोबर ही विमाने घेण्याचा करार होऊ शकतो. मात्र, त्यासाठी अमेरिका आणि भारत यांच्यात नेमक्या कोणत्या अटी-शर्ती ठरतात, हे पाहावे लागेल.

अमेरिकेचे एफ-३५ लढाऊ विमान

अमेरिकी कंपनी ‘लॉकहीड मार्टिन’ने एफ-३५ या विमानांची निर्मिती केली आहे. अमेरिकेचे एफ-२२ विमान पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे. पण, आता त्याचे उत्पादन घेतले जात नाही. अतिशय मारक, प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणारे, दुसऱ्या लढाऊ विमानाबरोबर अतिशय उत्तम संपर्कयंत्रणा प्रस्थापित करणारे विमान म्हणून एफ-३५ ओळखले जाते. पुढील दशकात अमेरिका काही ट्रिलियन डॉलर अमेरिका या विमानांसाठी मोजणार आहे. २०७० पर्यंत ही विमाने कार्यरत राहतील, अशी लॉकहीड मार्टीन कंपनीची अपेक्षा आहे.

रशियाचे सुखोई-५७ लढाऊ विमान

रशियाचे सुखोई-५७ लढाऊ विमान हे रशियातील पाचव्या पिढीतील पहिले अत्याधुनिक विमान आहे. जास्त वजन नेण्याची क्षमता, अतिशय उच्च प्रतीचे इंजिन, उत्तम इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा आहे. सुखोई-५७ विमाने कुठला देश खरेदी करणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, तो देश नेमका कुठला, हे समोर आलेले नाही. ही विमाने फेलॉन या नावानेही ओळखली जातात. सीरियामध्ये २०१८ मध्ये या विमानांनी प्रथम युद्धात भाग घेतला. युक्रेन युद्धातही या विमानांनी भाग घेतल्याचा दावा केला जातो. भारतामध्ये बंगळुरू येथे झालेल्या एअरो इंडिया शो मध्ये एफ-३५ आणि सुखोई-५७ ही विमाने प्रदर्शनात मांडली गेली होती. दोन्ही विमाने एकाच ठिकाणी येण्याची ही पहिलीच वेळ होती.

चीनचे जे-२० लढाऊ विमान

चीनकडे पाचव्या पिढीतील अत्याधुनिक जे-२० हे विमान आहे. २०११ मध्ये पहिल्यांदा हे अवकाशात झेपावले. २०१७ मध्ये ते सेवेत दाखल झाले. जे-२० विमान म्हणजे अमेरिकेच्या एफ-२२ आणि एफ-३५ विमानांतील तंत्रज्ञानाचेच बनावट रूप असल्याचा दावा काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनचे पहिले अध्यक्ष माओ यांच्या जन्मदिनी चीनने आणखी अत्याधुनिक विमान सर्वांसमोर सादर केले. जे-३६ असे त्याचे नाव सांगितले जाते. हे विमान सहाव्या पिढीतील असल्याचाही दावा केला गेला आहे. स्टेल्थ क्षमता अधिक असण्याबरोबरच वजन नेण्याची क्षमताही यामध्ये वाढविण्यात आली आहे.

भारताबरोबरील करार गुंतागुंतीचा

अत्याधुनिक विमानांच्या खरेदीच्या करारामध्ये केवळ आर्थिक देवघेवीचा मुद्दा नसतो, तर परस्पर राष्ट्रहिताचा विचार तिथे येतो आणि त्यानुसार सामरिक धोरणे ठरविली जातात. भारत हा रशियाकडूनही मोठी शस्त्रास्त्रे घेतो. रशियाची एस-४०० ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा घेतल्यामुळे अमेरिकेने तुर्कीला एफ-३५ विमाने देण्यास नकार दिला होता. भारतानेही रशियाची एस-४०० ही यंत्रणा खरेदी केली आहे. विमान खरेदीमध्ये तंत्रज्ञान हस्तांतर आणि देशांतर्गत रोजगाराला चालना देण्यासाठी भारतात संयुक्त उत्पादन अशा काही अटी भारत ठेवतो. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील एफ-३५ संबंधी करार त्यामुळेच गुंतागुंतीचा ठरण्याची शक्यता आहे. नेमक्या कुठल्या अटी दोन्ही देश एकमेकांसमोर ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. भारताची नेहमीची शस्त्रास्त्र खरेदीची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे एफ-३५ विमाने घेण्याचे ठरले, तर राफेल विमानांप्रमाणेच ती थेट खरेदी केली जातील, अशी शक्यता आहे.

‘मॅन बिहाइंड द मशीन’

तंत्रज्ञानाची आधुनिकता महत्त्वाची असली, तरी प्रत्यक्ष युद्धात लढाऊ वैमानिकाचे कौशल्यच अधिक प्रभावी ठरते, हे आजवर दिसून आले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्तमानचे उदाहरण या बाबतीत बोलके आहे. जुन्या मिग-२१ विमानांतून भरारी घेऊन अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले एफ-१६ विमान लढाऊ कुशलतेने त्याने पाडले. त्यामुळे हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी लढाऊ विमान, त्यातील तंत्रज्ञान याबरोबरच सर्वाधिक महत्त्व असते, ते ‘मॅन बिहाइंड द मशीन’ला, लढाऊ वैमानिकांना. अमेरिकेबरोबर पाचव्या पिढीची विमाने खरेदी करण्याचा करार झाला, तर तो हवाई दलाचे बळ कैक पटींनी वाढणार आहे.

Prasad.Kulkarni@expressindia.com

Story img Loader