अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये गेल्यानंतर प्रथमच युक्रेन युद्धाबाबत भाष्य केले आहे. पुतिन यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणाची माहिती देताना ट्रम्प यांनी युद्ध थांबविण्याची भाषा केली असली, तरी युक्रेनसाठी ही बातमी फारशी चांगली नाही… अमेरिका युक्रेनच्या डोक्यावरील वरदहस्त काढून घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले असतानाच त्यांचे मंत्रीही जागतिक व्यासपीठावर पुतिनधार्जिणी भाषा वापरत आहेत. त्यामुळे युक्रेनच्या पोटात गोळा आला नाही, तरच नवल….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुतिनशी चर्चेबाबत ट्रम्प काय म्हणाले?

युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेच्या धोरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट संकेत अखेर मिळाले. अपेक्षेप्रमाणे ट्रम्प यांनी युक्रेनला वाऱ्यावर सोडण्याची तयारी केल्याचे हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. पुतिन यांच्याशी सुमारे एक तास झालेल्या चर्चेची माहिती देताना ट्रम्प म्हणाले, की युद्ध संपविण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. आपण शांततेच्या दिशेने जात आहोत. यावेळी पुतिन यांच्याशी लवकरच प्रत्यक्ष भेट होऊ शकेल आणि या भेटीचे ठिकाण सौदी अरेबिया असू शकेल, असेही ट्रम्प यांनी सूचित केले. पुतिन यांच्याशी संभाषणानंतर आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशीही संवाद साधल्याचे सांगतानाच ट्रम्प यांनी या चर्चेचा तपशिल मात्र दिला नाही. पुतिन यांना शांतता हवी आहे, झेलेन्स्की यांनाही शांतता हवी आहे आणि अमेरिकेलाही शांतता हवी आहे, असे ते म्हणाले. मात्र या संभाव्य वाटाघाटी ज्या युक्रेनबाबत होणार आहेत, त्या देशाला चर्चेत स्थान असेल की नाही हे मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही.

युक्रेनच्या ‘नेटो’ सदस्यत्वाचे काय?

नॉथ अटलान्टिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नेटो) या लष्करी गटाचे सदस्यत्व युक्रेनला हवे आहे आणि ते मिळू नये, याच मुख्य कारणाने पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर सर्व ताकदीनिशी हल्ला चढविला होता. त्यामुळे युक्रेनला नेटोचे सदस्यत्व मिळू नये, यासाठी पुतिन वाटाघाटींमध्ये जोर लावणार, हे निश्चितच आहे. अमेरिकेचे नवे प्रशासनही युक्रेनला नेटोमध्ये घेण्यास फारसे उत्सुक नाहीतच. उलट नेटोमधून बाहेर पडून युरोपला वाऱ्यावर सोडण्याची भाषा खुद्द ट्रम्प यांच्यासह प्रशासनातील अनेक जण वापरत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पिट हेगसेट यांनीही युक्रेनला नेटोचे सदस्यत्व देणे शक्य नसल्याचे जाहीर करून टाकले. असे असताना झेलेन्स्की यांचे ‘नेटो स्वप्न’ भंगणार, हे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. पण एवढ्यावर निभावले तरी युक्रेनसाठी चांगले आहे, असे म्हणण्याचीही वेळ येऊ शकते. कारण आपला मोठा प्रदेश गमवावा लागण्याबरोबरच सत्तांतर होऊन रशियाधार्जिणे नेते युक्रेनचे राज्यकर्ते होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

झेलेन्स्की यांचे काय होणार?

क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव यांनी अलिकडेच “युद्धाच्या मुळ कारणांवर लक्ष देण्याची गरज आहे,” असे वक्तव्य केले होते. याचा एक अर्थ असा, की झेलेन्स्की यांना सत्ता सोडावी लागेल आणि रशियाच्या मर्जितील एखादा नेता युक्रेनचा अध्यक्ष केला जाऊ शकेल. याला युरोपमधून मोठा विरोध होण्याची शक्यता असली, तरी ट्रम्प ही अटदेखील मान्य करू शकतील, असे मानले जात आहे. मुळात वर म्हटल्याप्रमाणे ट्रम्प आणि पुतिन यांच्या संभाव्य वाटाघाटींमध्ये झेलेन्स्की आणि युरोपीय महासंघासाठी खुर्च्या असतील की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांची मनमानी कार्यपद्धती बघता ते परस्परच युक्रेनच्या भवितव्याचा फैसला करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. अशा परिस्थितीत युक्रेनला आपला काही भूभागही गमवावा लागू शकेल.

युक्रेनचा व्याप्त प्रदेश रशियाच्या घशात?

अलिकडेच युरोप दौऱ्यावर गेलेल्या हेगसेट यांनी युरोपने युक्रेनसाठी अधिक काम करावे, असा सल्ला दिला. त्याच वेळी “२०१४ पूर्वीची सीमारेषा पुनर्स्थापित करणे अशक्य आहे,” असे विधान केले. २०१४मध्ये पुतिन यांनी क्रायमिया हा युक्रेनचा प्रांत तोडून आपल्या देशात विलीन केला होता. म्हणजेच झेलेन्स्की यांना क्रायमियाचा आग्रह सोडावा लागणार, हे उघड आहे. मात्र रशियाने वाटाघाटींमध्ये परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी केली, तर युक्रेनला २०२२पूर्वीच्या नकाशाचा १५ टक्के भाग गमवावा लागू शकतो. डोनबास प्रदेशातील डोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांवर रशिया समर्थक बंडखोरांचे नियंत्रण आहे. रशियाने तेथे निवडणुकाही घेतल्या आहेत आणि ज्यांना बसवायचे त्यांच्याकडे सत्ताही दिली आहे. हा भाग आता रशियाच असल्याचे क्रेमलिनमधून वारंवार सांगितले जाते. झापोरिझ्झिया आणि खेरसनच्या काही भागांवरही रशियन फौजांचे नियंत्रण आहे. अर्थात, युद्ध अद्याप सुरू असल्यामुळे सीमारेषा सातत्याने बदलत असतात. मात्र आत्ता आहे अशी स्थिती राहिली तर युक्रेनला मोठे नुकसान सहन करावे लागेल, हे निश्चित… याचा थेट परिणाम युक्रेनच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरणावर होईल. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचा सर्वांत मोठा फटका हा आगामी काळात युक्रेन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना बसण्याची शक्यता आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will ukraine war stop due to donald trump vladimir putin talks ukraine may lose territory won by russia print exp asj