अनेक वर्षे भारतीय फलंदाजीची मदार खांद्यावर असणाऱ्या विराट कोहलीच्या बॅटिंगवर सध्या नशीब रुसून बसलंय असं दिसतयं. २०१९ पर्यंत विराट धावा काढणारं मशीन होता. बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्याच दिवस-रात्र कसोटी सामन्यात विराटनं शतक झळकावलं होतं. पण त्यानंतरची तीन वर्ष विराट अक्षरश: धावा काढण्यासाठी झगडताना दिसत आहे. विराट हा सध्या विश्वातला सर्वोत्कृष्ट बॅट्समन असल्याची ग्वाही ज्या पंडितांनी तीन वर्षांपूर्वी दिली होती, त्यातलेच अनेकजण टी-२० वर्ल्ड कपमध्ये विराटला खेळवावं की नाही? याबाबत साशंक आहेत. सध्या भारताकडे असलेल्या फलंदाजांची क्षमता बघता विराट भारताच्या टी-२० संघात बसतो का? याची चर्चा करणं आवश्यक आहे.
विराटपेक्षा सरस कामगिरी करणाऱ्या फलंदाजांचा उदय
या वर्षी विराट चार टी-२० सामन्यांमध्ये खेळला. १७, ५२, १ आणि ११ अशा धावा विराटने या सामन्यांमध्ये काढल्या होत्या. यापैकी शेवटच्या दोन धावा इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात काढण्यात आल्या आहेत. फलंदाजीचा तिसरा क्रम म्हटला, की कोहलीच्या पलीकडे विचार करण्याची गरजच नाही, अशी स्थिती होती. एकेरी- दुहेरी धावा काढत धावफलक हलता ठेवणं असो, चौकार, षटकार मारत धावगती वाढवणं असो, की इतर फलंदाजांना हाताशी घेत विजयी लक्ष्यापर्यंत पोहचणं असो, विराट बहुतांशवेळा यशस्वी झाला होता. पण, हे सगळे गुण गेल्या अनेक वर्षांत विराटमध्ये दिसून येत नाहीत. दुसरी बाब म्हणजे विराटपेक्षा सरस कामगिरी करुन दाखवणारे फलंदाज याच कालावधीत उदयाला आले आहेत. दीपक हुडासारखा फलंदाज वरच्या फळीत उत्कृष्ट धावगतीसह चांगल्या धावा करतोय. त्यामुळेच हुडाला बसवून जेव्हा विराटला खेळवलं होतं, तेव्हा अनेकांनी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं होतं.
वाढत्या दबाबामुळे विराटच्या खेळीवर परिणाम
गेल्या टी-२० च्या १० सामन्यांमध्ये विराटने चार अर्धशतकं झळकावली आहेत, पण त्यातली तीन अर्धशतकं गेल्या वर्षी झळकावली होती. या वर्षी त्याने एकच अर्धशकत काढलं आहे. कोहलीनं २०१९ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकही झळकावलेलं नाही. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यातही बघायला गेलं तर विराटला धावा करण्यासाठी झगडावं लागलं होतं. विराटनं सुरुवातीपासून आक्रमक शैली बनवण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो अयशस्वी ठरला. जर आयपीएलचा विचार केला, तर तिथेही यंदा विराटला फारशी चमक दखवता आली नाही. एकूण १६ सामन्यांमध्ये ११६ च्या धावगतीने विराटनं ३४१ धावा काढल्या. टी-२० मध्ये १८०-२०० च्या जवळ पोहचायचं असेल तर जास्त गतीनं धावा करणारे फलंदाज वरच्या फळीतही असावेत, असा एकंदर कल दिसून येत आहे. यामुळेच विराटवरचा दबावही वाढला असल्याचे गेल्या दोन सामन्यांत बघायला मिळालं. अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या विराटकडून डीप मिडविकेटमध्ये एक अत्यंत सोपा झेल गेल्या सामन्यात सुटला, हे या दबावामुळेच असण्याची शक्यता आहे. भारतीय संघासाठी विराट कोहली आता टी-२० पेक्षा एकदिवसीय व कसोटी सामन्यांसाठी उपयुक्त आहे, असेही मत व्यक्त होत आहे.
हेही वाचा- कोहलीच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे -रोहित
निवड समितीच्या निर्णयावर लक्ष
विराटने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामने खेळले असून ५०.७२ च्या सरासरीनं त्याने ३,२९७ धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याच्या एकंदरीत कामगिरीबद्दल प्रश्नच उद्भवत नाही, पण गेल्या वर्षभरातील विराटच्या कामगिरीचा किंवा त्याच्या फॉर्मचा विचार केला, तर त्याला काही महिन्यातच होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्ड कपमध्ये खरचं खेळवण्यात येईल, की त्याला एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला निवड समिती देते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
रोहीत शर्माकडून विराट कोहलीची पाठराखण
विराटला संघाबाहेर बसवलं तरी त्याचे पाठराखे आणि अनेक जण टीका करतील हे नक्की. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरोधातील मालिकेनंतर रोहित शर्माने विराटची केलेली पाठराखणही विसरता येणार नाही. संघाच्या धोरणांमध्ये विराट किती महत्त्वाचा आहे, हे रोहितनं ठामपणे सांगितलं होतं. पण, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या सातत्यानं मधल्या फळीत चांगला खेळ करत असताना विराटवर दबाव येणं व त्याच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे स्वाभाविक आहे.
निवड समितीसमोर मोठं आव्हान
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसवत आपण कठोर निर्णय घेऊ शकतो याची झलक दाखवून दिली आहे. अर्थात, कोहलीच्या बाबतीत असा निर्णय घेणं हे तितकं सोपं नसेल. त्यातल्या त्यात एकच समाधानाची बाब म्हणजे, येत्या काळात अनेक सामने होणार आहेत आणि प्रत्येकाला आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यांमध्ये विराट पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसेल आणि त्याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघातून वगळण्याचा विचार करावा लागू नये, अशी कामना कदाचित निवड समिती करत असेल यात शंका नाही.