William Dalrymple on the Silk Road: इतिहासकार, लेखक आणि जयपूर लिटररी फेस्टिव्हलचे सह-संचालक विल्यम डालरिंपल यांनी City of Djinns, The Last Mughal आणि The Anarchy यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या या पुस्तकांमध्ये इस्ट इंडिया कंपनीच्या उदयाचा इतिहास समाविष्ट आहे. प्राचीन भारताचा परिवर्तनकारी प्रभाव, सिल्क रूटचे मिथक आणि भारतीय इतिहासकारांनी केलेले लोकविरहित इतिहासाचे लेखन यावर इतिहासकार विल्यम डालरिंपल यांनी सविस्तर चर्चा केली.
आयडिया एक्सचेंजमध्ये इतिहासकार विल्यम डालरिंपल यांनी त्यांच्या नवीन पुस्तकाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांचं नवीन पुस्तक The Golden Road: How Ancient India Transformed the World मुख्यत्त्वे एका समुद्री मार्गाबद्दल आहे. या सागरी मार्गाला त्यांनी स्वतःहून हे नाव दिलं आहे. त्यांच्या मते हा सागरी मार्ग प्रचलित रेशीम मार्गापेक्षाही अतिशय महत्त्वाचा होता. त्यांनी सांगितलं की, अनेक लोकांना हे लक्षातच येत नाही की, प्राचीन किंवा मध्ययुगीन स्त्रोतांमध्ये सिल्क रोड हा शब्द वापरला जात नव्हता. हे सत्य वादग्रस्त असलं तरी १८७७ साली हा शब्द पहिल्यांदा वापरात आला. बॅरन वॉन रिचथोफेन हे तत्कालीन जर्मन भूगोलाच्या पुस्तकाचे लेखक होते. त्यांनी या मार्गासाठी ‘Die Seidenstrasse’ हा जर्मन शब्द वापरला. ज्याचा अर्थ सिल्क रोड असा होतो.
चीनकडून सिल्क रोड या संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर
सिल्क रोड हा आशियाच्या मधल्या भागातून समुद्राला समुद्राशी जोडणारा एक महामार्ग होता अशी एक मिथक कल्पना आहे. या मिथकामुळे खरा महामार्ग दुर्लक्षित राहिला. तो वास्तविक अस्तित्त्वात होता, हे गेल्या वीस वर्षांमधील उत्खननातून सिद्ध झाले आहे. लाल समुद्राच्या इजिप्तमधील बेरेनिके किनाऱ्यावर आणि भारतातील केरळमधील पट्टणम येथील मुजरिस येथील उत्खननांनंतर झालेल्या संशोधनातून हा महामार्ग समोर आला आहे. त्यामुळे ‘The Golden Road’ हे माझे ‘Silk Road’ ला दिलेले प्रत्युत्तर आहे असे विल्यम डालरिंपल म्हणाले. गोल्डन रोड हा शब्द तसाच काल्पनिक आहे जसा सिल्क रोड आहे, परंतु हा एक प्रतिवाद आहे. हा प्रतिवाद प्राचीन कालखंडाची साक्ष देणाऱ्या पुरातत्त्व आणि आर्थिक इतिहासातील स्पष्ट पुराव्यांवर आधारित आहे. ते म्हणतात, त्यांच्या पुस्तकात भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय दृष्टिकोनातून प्राचीन व्यापारासाठी भारताला मिळालेलं आश्चर्यकारक महत्त्व या गोष्टीवरही लक्ष केंद्रित केले आहे जे आपण अनेकदा विसरतो. चीनकडून सिल्क रोड या संकल्पनेचा अत्यंत प्रभावीपणे वापर होत आहे आणि त्याचं शस्त्र बनवून, त्याचा प्रचार-प्रसार केला आहे, जो ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ चा पाया आहे.
बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह (BRI) म्हणजे काय?
बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह हा चीनचा सर्वात आधुनिक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा आणि व्यापार प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाकडे प्राचीन रेशीम मार्गाची आधुनिक पुनरावृत्ती म्हणून पाहिले जाते. २०१३ साली राष्ट्राध्यक्ष ‘शी जिनपिंग’ यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले होते, हा प्रकल्प पूर्व आशिया आणि युरोपला भौतिक पायाभूत सुविधांद्वारे जोडण्यासाठी तयार करण्यात आला. परंतु, त्यानंतर हा प्रकल्प आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर विस्तारला गेला आहे. जागतिक महासत्ता होण्याच्या चीनच्या महत्त्वकांक्षेने, या प्रकल्पात महामार्ग, रेल्वे, ऊर्जा पाइपलाइन, पर्वतीय मार्ग आणि अनेक देशांची सीमा ओलांडत जाणाऱ्या एका जाळ्याची कल्पना करण्यात आली आहे, जी चीनपासून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडील दोन्ही भागांना जोडणारी आहे.
चीनने त्यांची कहाणी अधिक प्रभावीपणे सांगितली आहे का?
विल्यम डालरिंपल सांगतात, चीनने त्यांच्या इतिहासाची दोन प्रकारे प्रभावी मांडणी केली आहे. एक म्हणजे त्यांनी त्यांच्या इतिहासाची मांडणी लोकप्रिय आणि सहज समजण्याजोगी केली, जी नैसर्गिकरित्या मोहीत करणारी कहाणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांनी सिल्क रोडच्या विचारधारेला एक शांततापूर्ण जागतिक व्यापारी नेटवर्क म्हणून प्रस्तुत केले. ही विचारधारा १८ व्या आणि १९ व्या शतकातील सैनिकीकरण झालेल्या युरोपियन नेटवर्कच्या विरोधात आहे आणि त्यातूनच त्यांनी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ सारखी अद्वितीय योजना तयार केली. तर भारताकडून नंतर कॉटन रोड, स्पाइस रोड, किंवा अलीकडेच जी-20 मध्ये सादर झालेला IMEC (India-Middle East-Europe Economic Corridor- गाझाच्या संघर्षादरम्यान स्थगित झाला) या संकल्पना विलंबाने पुढे आल्या.
भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
भारतीय इतिहासातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे न येण्यामागे शैक्षणिक क्षेत्रातील अपयश हे महत्त्वाचे कारण आहे असे डालरिंपल म्हणाले. विशेषतः १९५० च्या दशकापासून ते २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय शैक्षणिक क्षेत्रात एक असा दीर्घकाळ आला जिथे अभ्यासक केवळ एकमेकांशीच बोलत राहिले आणि तेही बऱ्याचदा जाणीवपूर्वक कठीण भाषेत. त्याचाच परिणाम सबॉल्टर्न स्टडीज कलेक्टिव्हच्या सिद्धांतातून दिसून येतो. म्हणूनच आज ‘व्हॉट्सअॅप इतिहास’ आणि ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’ यांचा उदय झाला. भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडले. हे आता बदलत असलं तरी, गेल्या ४० वर्षांची एक पोकळी राहिली आहे, ज्यामुळे व्हॉट्सअॅपवर ‘प्लॅस्टिक सर्जरी’, महाभारतामधील अणुबॉम्ब, रामायणातील हेलिकॉप्टरसारखी आकाशात उडणारी वाहनं आणि अशा अनेक कल्पनारम्य गोष्टी पसरू लागल्या.
याच कारणामुळे देशातील आणि परदेशातील भारतीय समुदायाला याची जाणीव आहे की, इथे एक महान संस्कृती आहे, पण त्यांच्यात त्या संस्कृतीच्या तपशीलांबद्दल थोडा गोंधळ आहे. कारण त्यावर योग्य पद्धतीने लिहिले जात नाही. हे पुस्तक यावर सखोल संशोधनातून उत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे. भारताने जगाला काय दिलं? भारतातून काय बाहेर गेलं आणि त्याने आसपासच्या जगावर कसा प्रभाव टाकला याचे सविस्तर उत्तर या पुस्तकातून मिळते. गोल्डन रोड हा विषय वेगवेगळ्या शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासला गेला परंतु तो एकत्रितपणे मांडला गेला नाही. अनेक तज्ज्ञांनी सखोल अभ्यास केलाय आणि दिल्लीत असे महान विद्वान आहेत ज्यांनी बरेच संशोधन एकत्र केलं आहे. परंतु दीर्घकाळ असे संशोधन एकत्रित न केल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd