राज्यात पावसाळ्याच्या तोंडावर कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यंदा १ जानेवारी ते ७ मे या कालावधीत हिवतापाचे ३ हजार ६२ रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला असून, १ जानेवारी ते ७ मे या कालावधीत डेंग्यूचे १ हजार ७५५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दीडपट झाली आहे. त्यातच आता झिकाने डोके वर काढले आहे. पुण्यातील झिकाची रुग्णसंख्या ११ वर पोहोचली असून, त्यातील ५ गर्भवती आहेत.
हिवतापाचा प्रार्दुभाव कुठे?
राज्यातील हिवतापाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. मुंबईत सर्वाधिक १ हजार ३२४ रुग्ण तर गडचिरोली जिल्ह्यात १ हजार १४२ रुग्णांची नोंद झाली आहे. या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. राज्यात गेल्या वर्षी १ जानेवारी ते ७ मे या कालावधीत हिवतापाच्या २ हजार २३० रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रुग्णांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा…पंतप्रधान मोदींना रशियात मिळालेल्या ‘सेंट ॲण्ड्र्यू’ सर्वोच्च नागरी पुरस्काराचे महत्त्व काय?
युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाय…
आगामी काळात हिवतापाचे रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्हा हा हिवतापासाठी अतिशय संवेदनशील आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ३६ टक्के रुग्ण गडचिरोलीत आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कीटकजन्य आजारांचा आढावा घेतला होता. त्यातही हे आजार वाढत असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मुंबई आणि गडचिरोलील हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून तेथील स्थानिक प्रशासनासोबत युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.
गडचिरोलीतील हिवतापाचे गूढ …
गडचिरोली जिल्हा हा दुर्गम आणि जंगली भागाचा आहे. या जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असते. गडचिरोलीत कीटकजन्य आजारांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यातही हिवतापाची रुग्णसंख्या अधिक असते. राज्यात गडचिरोलीमध्ये हिवतापाची रुग्णसंख्या सर्वाधिक नोंदविण्यात येते. गेल्या वर्षी तिथे औषधोपचार करूनही हिवतापाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गडचिरोली भागात हिवतापाच्या नवीन प्रकाराचा प्रसार झाल्याची शंका व्यक्त होत आहे. याचबरोबर हिवतापाचा हा प्रकार औषधांना जुमानत नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेला याबाबत संशोधन करण्याची विनंती केली आहे. या संशोधनातून या भागात हिवतापाचा प्रादुर्भाव वाढण्यामागील नेमकी कारणे समोर येण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा…राजस्थानातच उंटांवर संक्रांत; काय घडतंय नेमकं?
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दीडपट वाढ
राज्यात यंदा १ जानेवारी ते ७ मे या कालावधीत डेंग्यूचे १ हजार ७५५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दीडपट झाली आहे. राज्यात यंदा डेंग्यूचे १ लाख २७ हजार १४० संशयित रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ८१ हजार ७३१ होती. यंदा निदान झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या १ हजार ७५५ आहे. गेल्या वर्षी ही संख्या १ हजार २३७ होती. यंदाची रुग्णसंख्या गेल्या वर्षीपेक्षा दीड पटीने जास्त आहे.
डेंग्यूचा उद्रेक कुठे?
राज्यात सर्वाधिक १७४ डेंग्यूचे रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्हा ११७, अकोला जिल्हा ७१, नांदेड जिल्हा ५८, सोलापूर जिल्हा ५१ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यातील महापालिकांचा विचार करता मुंबई महापालिकेत सर्वाधिक २८५ रुग्णसंख्या आहे. त्या खालोखाल नाशिक महापालिका ७९, कोल्हापूर महापालिका ४५, सांगली महापालिका ४१ आणि पनवेल महापालिका ३८, अशी रुग्णसंख्या आहे.
हेही वाचा…विश्लेषण : मंगळसदृश वातावरणात वर्षभर…! नासाची पृथ्वीवरील आभासी मोहीम काय होती?
झिकाचे आव्हान किती मोठे?
पुण्यात झिकाचे ११ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५ गर्भवती आहेत. या रोगाचा धोका प्रामुख्य़ाने गर्भवती आणि तिच्या गर्भाला असतो. पुण्यातील वेगवेगळ्या भागांत रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे या भागातील गर्भवतींची तपासणी मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत झिकाचा प्रसार वाढल्याने त्याला प्रतिबंध घालण्याचे आव्हानही आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
हेही वाचा…विश्लेषण : लोकसभा निवडणुकीतून धडा… भाजपने नेमले २४ नवे राज्य प्रभारी!
उपाययोजना काय?
आरोग्य विभागाने राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून हा हिवताप प्रतिरोध महिना जाहीर केला आहे. या महिन्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका, चंडीपुरा आणि हत्तीरोग या आजारांविषयी समाजात जनजागृती करण्यात आली. याचबरोबर कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे, अशी माहिती राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी दिली.
sanjay.jadhav@expressindia.com