यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्र झळा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशाच्या बहुतेक भागांत साधारण प्रमाणापेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा वाहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्रतेत वाढ आणि उष्णतेच्या सातत्याने येणाऱ्या लाटा यावरून वर्तविण्यात आला आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होईल.

हवामान बदलाच्या इतर परिणामांप्रमाणेच योग्य वेळी उपाययोजना केल्यास उष्णतेच्या लाटांचे परिणाम कमी करता येणं शक्य आहे. अनेक राज्ये आणि शहरांनी वाढत्या उष्णतेला तोंड देण्यासाठी आणि त्याचा लोकांवर कमी प्रभाव होण्यासाठी हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केले आहेत. हे प्लॅन तयार करूनही त्यांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याचे काही अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या उन्हाळी हंगामात संपूर्ण उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात साधारण उष्णतेपेक्षा अधिक प्रमाणात उष्णतेच्या लाटा अपेक्षित आहेत. या काळात दक्षिण, ईशान्य, जम्मू आणि काश्मीर तसंच हिमाचल प्रदेश ही ठिकाणं अपवाद असू शकतात.

उष्णतेच्या लाटांच्या दिवसांची संख्या राज्यानुसार बदलते. म्हणजे राजस्थानमध्ये साधारण वर्षात उन्हाळ्यात ८ ते १२ उष्णतेच्या लाटेचे दिवस होते.
२०२४ मध्ये नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा वगळता देशातल्या प्रत्येक राज्यात उष्णतेची लाट होती. केरळमध्येही गतवर्षी उन्हाळ्यात सलग सहा दिवस उष्णतेच्या लाटांची नोंद करण्यात आली. २०२४ मध्ये देशभरात एकूण ५५४ दिवस उष्णतेच्या लाटा होत्या. हे गेल्या १५ वर्षांमधील सर्वाधिक दिवस होते. २०१० मध्ये उष्णतेच्या लाटेचे ५७८ दिवस नोंदवले गेले होते. २०२४ हे वर्ष जगासाठी आणि भारतासाठीदेखील सर्वात उष्ण तापमानाचे होते. तरीही हंगामातील उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या आणि सरासरी वार्षिक तापमान यांच्यात थेट संबंध नाही. उष्णतेच्या लाटा म्हणजे उच्च तापमानाचा केंद्रित कालावधी असतो. तसंच वार्षिक तापमान म्हणजे संपूर्ण देश किंवा प्रदेशातील वर्षभरातील सरासरी तापमान. २०२३ या वर्षात फक्त २३० उष्णतेच्या लाटेचे दिवस होते आणि ते भारतासाठी दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात उष्ण वर्ष होते. २०२२ हे वर्ष तुलनेने थंड होते, मात्र तरीही देशात ४६७ उष्णतेच्या लाटेचे दिवस नोंदवले गेले होते.

येत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, भारतात उष्णतेच्या लाटांचे सातत्य आणि तीव्रता वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
क्लायमेट डायनॅमिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, देशाच्या मध्य, वायव्य आणि आग्नेय भागात २००० पासून उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्ये सुमारे तीन दिवसांनी वाढ होत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या काही भागांसह आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात ही वाढ अधिक स्पष्टपणे दिसून आली होती. दीर्घकाळ वाहणाऱ्या उष्णतेच्या लाटांमध्येही सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी लाटा सात दिवस किंवा त्याहून अधिक काळ टिकतात. वायव्य, मध्य आणि आग्नेय प्रदेशांमध्ये दीर्घकाळ वाहणाऱ्या उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात आहेत. याचा शेती, आरोग्यावर अधिक हानिकारक परिणाम होऊ शकतो असंही अभ्यासात म्हटलं आहे.

उष्णतेबाबतच्या कृती योजना
हवामान विभाग उष्णतेच्या लाटांबद्दल पाच ते सात दिवस आधीच राज्य आणि जिल्ह्यांना सतर्क करून अंदाज देतात. अतिवृष्टीबाबत अधिक अचूक अंदाजही वर्तवले जातात.
किमान २३ राज्ये आणि अनेक जिल्ह्यांनी त्यांच्या स्थानिक उष्णता कृती योजना विकसित केल्या आहेत, ज्यामध्ये उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि उष्णतेशी संबंधित मृत्यू टाळण्यासाठी उचलली जाणारी आवश्यक पावलं याचा समावेश आहे. यापैकी बरेच कमी खर्चिक आणि सोपे उपायही आहेत. सार्वजनिक ठिकाणी सावली तयार करणे, पाण्याची उपलब्धता, शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळात बदल असेही उपाय करण्यासारखे आहेत. उष्णतेशी संपर्क कमी ठेवण्यासाठी आणि उष्णतेसंबंधी आजार रोखण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतात.
सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, कामगारांसाठी थंड सावलीसाठी हिरवळ वाढेल अशा उपाययोजना करणे किंवा उष्णतेशी संबंधित आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करणे यांसारख्या उपाययोजना राबवण्याची शक्यता जास्त आहे असं दिल्लीस्थित संशोधन संस्था सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्हने केलेल्या अभ्यासात आढळले आहे.

अनेक उपाययोजना किंवा हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार करूनही काही उपायांकडे दुर्लक्ष केले जाते. शहरांचे हिरवळीकरण, जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन किंवा स्थानिक तापमान कमी करण्यासाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरणारी उद्यानं आणि खुल्या जागांची निर्मिती याकडे दुर्लक्ष होताना दिसते. प्रत्यक्षात सरकारकडून उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या घटनांबाबत प्रतिसाद दिले जातात. मात्र, पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत किंवा नियोजनात त्रुटी असतात. जेव्हा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवला जातो तेव्हा हिट अ‍ॅक्शन प्लॅन सुरू केला जातो.