उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यातील एक-दोन नाही तर सुमारे ३५ गावांमध्ये लांडग्यांनी दहशत पसरवली. आतापर्यंत लांडग्यांच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेल्यामुळे गावकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या बळींमध्ये चिमुकल्यांचा समावेश असून २५ पेक्षा अधिक लोक लांडग्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लांडग्यांच्या हल्ल्यामागील कारणे कोणती?

लांडगा हा शक्यतोवर माणसांपासून दूर राहणारा प्राणी. मात्र, त्याच्या अधिवासात माणूस गेला तर जीवाला धोका असल्याचे समजून ते हल्ला करतात. लांडगा आणि माणूस यांचा फारसा संघर्ष हाेत नसला तरीही जीवाला धोका वाटला तर ते माणसांवर हल्ला करतात. रेबीज हा आजार लांडग्यांच्या हल्ल्यामागील एक प्रमुख कारण मानले जाते. काही वर्षांपूर्वी मेळघाटातदेखील लांडग्यांनी माणसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याशिवाय दुसरे एक कारण म्हणजे लांडगे आणि कुत्रे काही वेळा आंतरप्रजनन करतात. त्यातून जन्माला आलेले लांडगे अधिक आक्रमक होतात आणि मनुष्यभक्षक होण्याची प्रवृत्ती आढळते. 

हेही वाचा >>>विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?

संशोधकांना काय आढळले?

उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यातील लांडग्यांचे हल्ले नेमके कशामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचा चमू याठिकाणी दाखल झाली आहे. मंगळवारी दिवसभर या चमूने उत्तर प्रदेश वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर ते बहराइचला रवाना झाले. हे पथक माणसांवर हल्ला करणाऱ्या लांडग्यांचे डीएनए नमूने घेऊन ते तपासतील. मात्र, हल्ले करणारे हे लांडगे संकरित प्रजातीतील असण्याची दाट शक्यता त्यांना आहे.

हल्ल्यांच्या घटनांचा अहवाल काय सांगतो?

उत्तर प्रदेशमध्ये दोन ते अडीच दशकांपूर्वी १९९६-९७ दरम्यान लांडग्यांच्या हल्ल्याच्या अशाच घटना समोर आल्या होत्या. त्यावर ‘लाइव्ह जर्नल’ने एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार एक सप्टेंबर १९९६ पर्यंत उत्तर प्रदेशात लांडग्यांच्या हल्ल्यात ३३ बालकांचा बळी गेला. तर २० बालके गंभीर जखमी झाली. १९९६-९७ दरम्यान लांडग्यांनी सुमारे ७४ लोकांना लक्ष्य केले होते. त्यातील बहुतेक मुले ही दहा वर्षांखालील हाेती. यानंतर दहा लांडग्यांना ठार करण्यात आले. 

बहराईचमध्ये लांडगे हल्ले का करत आहेत?

पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते लांडग्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा होणारा ऱ्हास हे मुख्य कारण आहे. लांडग्यांच्या अधिवासावर मानवी आक्रमण झाल्यामुळे त्यांचे अन्न कमी होत आहे. त्यामुळे निसर्गाशी असणारा त्यांचा समतोल बिघडला आहे. जंगल कमीकमी होत असल्याने त्यांना खाण्यासाठी भक्ष्य नाही. त्यामुळे त्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला असून त्यांच्या वर्तणुकीतदेखील बदल झाला आहे. कधी काळी मानवी वस्तीपासून दूर राहणारा प्राणी आता मानवी वस्तीच्या जवळ जात आहे. किंवा मानवी वसाहती या प्राण्यांच्या अधिवासात आल्यामुळे त्यांनी माणसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीत घट का?

सर्वाधिक हल्ले कोणत्या राज्यात?

उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांत लांडग्यांच्या हल्ल्याच्या सर्वाधिक घटना आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या तीन दशकांमध्ये लांडग्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील लांडग्यांच्या हल्ल्याच्या घटनांच्या नोंदी आहेत. १९०४ साली या राज्यात ७५ मुलांवर लांडग्यांनी हल्ले केले होते तर १९०० पर्यंत सुमारे २०० मुलांवर लांडग्यांनी हल्ला केला. आंध्र प्रदेशातदेखील अनंतपूर जिल्ह्यात १९८०च्या दशकात लांडग्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचे मृत्यू झाले. तर २०१२ मध्ये जम्मू-काश्मीर, बंगाल आणि उत्तर प्रदेशात लांडग्यांच्या हल्ल्याची नेांद आहे. महाराष्ट्रातील मेळघाट येथे देखील लांडग्यांचे हल्ले झाले आहेत.

लहान मुलांवर हल्ले का?

रानकुत्रे जसे समूहाने राहतात, तसेच लांडगेदेखील समूहाने राहतात. फरक फक्त एवढाच की रानकुत्र्यांचा कळप मोठा असतो, तर लांडग्यांच्या कळपात जास्तीत जास्त पाच ते सहा लांडगे असतात. बहुतेक वेळा रानकुत्र्यांप्रमाणेच ते सावजावर एकत्र हल्ला करतात. लहान मुले जास्त प्रतिकार करू शकत नसल्यामुळे त्यांना लहान मुलांवर हल्ला करणे जास्त सोपे आहे. म्हणूनच कदाचित गेल्या काही वर्षांपासून लांडग्यांच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. 

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wolves terrorize villages in bahraich district of uttar pradesh print exp amy
Show comments