Women Gives Births Unknown Man Baby : बदलती जीवनशैली व गुंतागुंतीच्या वैद्यकीय कारणांमुळे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बहुतांश विवाहित जोडपी आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्राद्वारे कृत्रिम प्रजननाच्या पद्धतींकडे वळतात. काही कारणांमुळे पालक होण्यात अडचणी येत असलेल्या जोडप्यांसाठी ही संकल्पना वरदानच ठरते. मात्र, या संकल्पनेमुळे अनेकदा नवीन वादाला तोंडही फुटतं. आयव्हीएफच्या अशाच एका प्रकरणानं लोकांच्या मनात प्रश्न निर्माण केले आहेत. एका महिलेच्या गर्भाशयात तिच्या नवऱ्याचे शुक्राणू न सोडता भलत्याच पुरुषाचे शुक्राणू सोडण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान, हे प्रकरण कुठं घडलं? ते कसं उघडकीस आलं? याबाबत जाणून घेऊ..

तंत्राद्वारे प्रजननाची कृत्रिम पद्धत

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला बऱ्याच दिवसांपासून गर्भधारणा होत नव्हती. त्यामुळे ही महिला आणि तिचा पती यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार घेतले. मात्र, त्यातही त्यांना अपयश आलं. शेवटी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या दाम्पत्यानं कृत्रिम प्रजनन पद्धतीनं मुलाला जन्म द्यायचा, असं ठरवलं. ऑस्ट्रेलियातील ‘मोनाश आयव्हीएफ सेंटर’मधील डॉक्टरांनी तंत्रज्ञानाद्वारे महिलेच्या गर्भाशयात तिच्या नवऱ्याचे शुक्राणू सोडण्यात आले. काही दिवसांनंतर महिलेला गर्भधारणा झाली आणि तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला.

दाम्पत्याशी न जुळणाऱ्या बाळाला दिला जन्म

दरम्यान महिलेच्या लक्षात आलं की, जन्माला आलेलं बाळ तिच्यासारखं किंवा तिच्या पतीसारखं दिसत नव्हतं. इतकंच काय, तर घरातील इतर कोणत्याही व्यक्तीसारखा बाळाचा चेहरा दिसत नव्हता. त्याचा रंगही कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा वेगळा होता. मनात शंकेची पाल चुकचुकल्यानंतर महिलेनं आणि तिच्या पतीनं ‘मोनाश आयव्हीएफ सेंटर’कडे याबाबत विचारणा केली. ‘ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’नुसार, डॉक्टरांनी त्या दाम्पत्याच्या स्त्रीबीज आणि शुक्राणूची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, त्यांनी तिच्या पतीऐवजी दुसऱ्याच पुरुषाचे शुक्राणू चुकून त्या महिलेच्या गर्भाशयात सोडले होते.

आणखी वाचा : लांडगा आला रे आला… १२,५०० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या ‘डायर वुल्फ’ प्रजातींचे पुनरुज्जीवन?

अनोळखी व्यक्तीच्या बाळाची बनली आई

घडलेला प्रकार लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांची चूक मान्य केली. याबाबत महिला आणि तिच्या पतीला माहिती देण्यात आली. महिलेनं जन्माला घातलेला बाळ हे तिच्या नवऱ्याचं नव्हतं. ते दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीचं होतं. या घटनेनंतर महिलेला जबर धक्का बसला आणि ती मानसिक तणावाखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. मोनाश आयव्हीएफ ही ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठ्या प्रजनन सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. प्रयोगशाळेत कडक सुरक्षा प्रोटोकॉल असूनही ही घटना घडली आहे. ‘मोनाश’नं कृत्रिम प्रजननात झालेली चूक मान्य करून, महिला आणि तिच्या पतीची माफीही मागितली आहे.

आयव्हीएफ क्लिनिकने मान्य केली चूक

“आम्हाला याचं खूप दुःख आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू,” असे ‘मोनाश’चे सीईओ मायकल नॅप यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. “या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी आम्ही एक स्वतंत्र समितीही नेमली आहे. या चौकशीचा अहवाल आणि त्यांच्या सर्व शिफारशी पूर्णपणे अमलात आणण्यास आम्ही वचनबद्ध आहोत”, असंही मायकल म्हणाले. “मोनाश आयव्हीएफ सेंटरमधील सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना अधिकच बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असेल. कृत्रिम प्रजननामध्ये पहिल्यांदाच आमच्या हातातून अशी चूक घडली आहे”, असंही मायकल यांनी स्पष्ट केलं आहे.

बाळावरून कायदेशीर लढाई होणार?

आयव्हीएफ सेंटरच्या निवेदनानुसार, कृत्रिम प्रजननाच्या इतर प्रकरणांमध्ये याआधी अशी चूक झालेली नव्हती. दाम्पत्याबरोबर चुकून घडलेला हा प्रकार राज्य नियामक संस्थेला कळविण्यात आला आहे. दरम्यान, महिलेनं चुकून अनोळखी व्यक्तीच्या बाळाला जन्म दिल्यामुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे बाळाच्या ताब्यावरून कायदेशीर लढाई उभी राहू शकते, असं ऑस्ट्रेलियातील सरोगसी कायदेतज्ज्ञ सारा जेफर्ड यांनी ‘द गार्डियन’शी बोलताना सांगितलं. “ऑस्ट्रेलियामध्ये बाळास जन्म देणारे पालक हेच त्याचे कायदेशीर पालक असतात, असा प्राथमिक समज असतो,” असं त्या म्हणाल्या. बाळाचे आनुवंशिक पालक याबद्दल काय दावा करतात, हे आपल्याला पाहावं लागेल, असंही सारा यांनी सांगितलं.

बाळावर मूळ हक्क कोणाचा?

‘सीएनएन’शी बोलताना सारा जेफर्ड म्हणाल्या की, कृत्रिम प्रजनन विषयासंबंधित चिंता व्यक्त करणारे अनेक फोन आले. ऑस्ट्रेलियात अशा प्रकारच्या प्रकरणासाठी आधीचा कोणताही कायदेशीर दाखला नाही. कायद्यानुसार बाळाला जन्म देणारे दाम्पत्य हेच त्याचे कायदेशीर पालक असतात. मात्र, जेव्हा आनुवंशिक पालकांनी त्यांचे शुक्राणू वापरण्यास परवानगी दिलेली नसते, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर आव्हान देता येते. कोणताही निर्णय बाळाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करूनच घेतला जाईल; परंतु याचे परिणाम संबंधित व्यक्तींवर आयुष्यभरासाठी होतील. अमेरिकेतही नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले होते. एका गोऱ्या महिलेने कृष्णवर्णीय बाळाला जन्म दिला होता. नंतर या महिलेच्या लक्षात आलं की, तिच्या गर्भाशयात चुकून तिच्या पतीऐवजी भलत्याच पुरुषाचे शुक्राणू सोडण्यात आले होते.

हेही वाचा : भारत आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर? मोठ्या प्रमाणात वाढत आहे ‘Vitamin D’ची कमतरता; नवीन अभ्यास काय सांगतो?

७०० हून अधिक महिलांनी दाखल केला दावा

ऑस्ट्रेलियातील मोनाश इन व्हिट्रो फर्टिलायझेशन सेंटरची स्थापना १९७१ मध्ये झाली होती. या सेंटरच्या शाखांचे जाळे देशभरातील अनेक शहरांमध्ये पसरलेले आहे. यापूर्वीही ‘मोनाश’मध्ये शुक्राणू अदलाबदलीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी मोनाश सेंटरवर ७०० हून अधिक दाम्पत्यांनी खटले दाखल केले होते. त्यातील बहुतांश खटले हे शुक्राणू अदलाबदलीचे होते. या वेगवेगळ्या खटल्यांमध्ये ‘मोनाश’ला नुकसानभरपाई म्हणून पीडित दाम्पत्यांना तब्बल ५६ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स द्यावे लागले होते. या प्रकरणातील दाम्पत्यांनी असा आरोप केला होता की, आयव्हीएफ सेंटरने त्यांचे उपयुक्त शुक्राणू नष्ट केले होते किंवा दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात टाकले होते.

आयव्हीएफद्वारे बाळ जन्मास कसे घातले जाते?

‘इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन’(आयव्हीएफ) यामध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांना एकत्र गोठवून ठेवले जाते. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ‘एम्बरियो’ म्हटले जाते. आवश्यकतेनुसार या ‘एम्बरियो’चे गर्भाशयात प्रत्यारोपण केले जाते. आयव्हीएफमध्ये अनेकदा गर्भपाताची शक्यता असते. त्यावेळी गोठवून ठेवलेल्या एम्बरियोचा वापर केला जातो. सध्या हे एम्बरियो दान करण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे. गर्भाशयाचा कर्करोग किंवा तत्सम आजार असलेल्या महिलांना सरोगसीचा पर्याय सुचविला जातो. ज्या दाम्पत्याला मूल हवे असे त्यांचे स्त्रीबीज व शुक्राणू यांचे एकत्रीकरण करून, त्याचे रोपण भाडोत्री मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात केले जाते. दाम्पत्यातील एकाच्याही स्त्रीबीज किंवा शुक्राणूपासून गर्भधारणा होत नसली तरी इतर दाम्पत्यांकडून दान घेतले जाते आणि सरोगसीचा वापर केला जातो.