देशातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अतिशय कमी आहे, अशी चर्चा वारंवार होत असते. कंपन्यांतील महिलांची संख्या वाढविण्याबाबत पावले उचलण्याची मागणीही सातत्याने केली जाते. कंपन्यांत उच्चपदस्थ ठिकाणी महिलांनी संधी द्यावी, अशी आग्रही भूमिकाही घेतली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार, या वर्षी भारतीय कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३६.६ टक्के आहे. गेल्या दोन वर्षांत त्यात फारशी वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी हे प्रमाण ३६.९ टक्के होते. महिलांचे प्रतिनिधित्व सर्वच क्षेत्रांत वाढविण्याचा मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे.

नेमका अहवाल काय?

महिलांना काम करण्यासाठी उत्कृष्ट भारतीय कंपन्या हा अहवाल अवतार आणि सेरामाऊंट या कार्यसंस्कृती सल्लागार कंपन्यांनी जाहीर केला आहे. यात ११० कंपन्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालात सर्व उद्योग क्षेत्रांचा समावेश आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट असलेल्या कंपन्यांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संख्या जास्त आहे. महिलांसाठी उत्कृष्ट असलेल्या एकूण कंपन्यांपैकी २४ टक्के कंपन्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. त्याखालोखाल बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांचे ११ टक्के प्रमाण आहे. उत्पादन आणि जागतिक सुविधा केंद्र क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण प्रत्येकी ९ टक्के आहे. विशेष म्हणजे, महिलांना काम करण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या कंपन्यांपैकी ६३ टक्के बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत.

करोना संकटाचा परिणाम?

या अहवालानुसार, भारतीय कंपन्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व २०१६ मध्ये केवळ २५ टक्के होते. ते २०१९ मध्ये ३३ टक्क्यांवर पोहोचले. नंतर करोना संकटाच्या काळात महिला कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व वाढण्याचा वेग मंदावला. भारतीय कंपन्यांतील महिलांचे प्रतिनिधित्व २०२० मध्ये ३४ टक्के झाले. ते २०२१ मध्ये ३४.५ टक्के आणि २०२२ मध्ये ३४.८ टक्क्यांवर पोहोचले. करोना संकटाच्या काळात आणि त्यानंतर महिलांचे प्रतिनिधित्व फारसे वाढलेले नाही. वाढीचा मंदावलेला वेग अजूनही कायम असून, गेल्या दोन वर्षातही त्यात मोठी वाढ झालेली दिसून आलेली नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण : अधिसभा विद्यापीठातील राजकारणाचे प्रवेशद्वार?

सर्वाधिक असमतोल कुठे?

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण निर्मिती क्षेत्रात सर्वांत कमी आहे. या क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व केवळ २० टक्के आहे. व्यावसायिक सेवा क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व सर्वाधिक ४६ टक्के आहे. भारतीय कंपन्यांमध्ये प्राथमिक टप्प्यांवरील जबाबदाऱ्यांत महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे ४० टक्के आहे. याच वेळी उच्चपदस्थ व्यवस्थापकीय जबाबादाऱ्यांमध्ये हे प्रमाण २८.४ टक्के आहे. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात उच्चपदस्थ पदांवरील महिलांचे प्रमाण २४.५ टक्के असून, त्याखालोखाल एफएमसीजी क्षेत्रात २१.५ टक्के आहे.

सर्वमावेशकतेला किती स्थान?

एकूण कंपन्यांपैकी ५८ टक्के कंपन्या २०१९ मध्ये अपंग कर्मचाऱ्यांसाठी पूरक व्यवस्थेचा विचार करीत होत्या. ही संख्या वाढून आता ९८ वर पोहोचली आहे. आता अधिकाधिक कंपन्या सर्वसमावेशक वातावरणावर भर देताना दिसत आहेत. लिंग, अपंगत्व, वय, संस्कती यातील भिन्न घटकांना योग्य वातावरण निर्मिती करण्यावर कंपन्या भर देत आहेत. यामुळे भारतीय कंपन्या अधिकाधिक सर्वसमावेशक होत असल्याचे अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे.

महिलांना प्रतिनिधित्व देण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्या कोणत्या?

महिलांना काम करण्यासाठी उत्कृष्ट ठरलेल्या कंपन्यांमध्ये ॲक्सेंचर सोल्यूशन्स, एएक्सए एक्सएल इंडिया बिझनेस सर्व्हिसेस, बार्कलेज इंडिया, केर्न ऑईल अँड गॅस, सिटीबँक, आयबीएम इंडिया, केपीएमजी इंडिया, लिअर कॉर्पोरेशन, टेक महिंद्रा या कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर सर्वसमावेशकतेच्या बाबतीत ॲक्सेंचर सोल्यूशन्स, एक्सए एक्सएल इंडिया बिझनेस सर्व्हिसेस, सिटीबँक, आयबीएम इंडिया, इन्फोसिस, केपीएमजी इंडिया, मिडलँड क्रेडिट मॅनेजमेंट, टार्गेट कॉर्पोरेशन आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

अवतारच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉ. सौंदर्या राजेश यांच्या म्हणण्यानुसार, देशातील महिला कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्वाबाबत आपण काही ठिकाणी प्रगती केली आहे. असे असले तरी अनेक क्षेत्रात हे स्थान नगण्य आहे. महिलांना योग्य संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी कंपन्यांतील वातावरण अधिक पूरक असणे गरजेचे आहे. महिलांना केवळ प्रतिनिधित्व नव्हे तर नेतृत्व करण्याचीही संधी मिळायला हवी. त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या भावना वाटावी, यासाठी अजून प्रयत्न करायला हवेत. यातून महिलांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे प्रतिनिधित्व आणखी वाढू शकेल.

sanjay.jadhav@expressindia.com