इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटची लोकप्रियता आणि भारतात वेगाने होत असलेला महिला क्रिकेटचा प्रसार, या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुरुषांप्रमाणेच महिलांची पूर्ण स्वरूपातील ‘आयपीएल’ लवकरच खेळवण्यात येईल, असे आश्वासन ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी दिले आहे. या लीगमुळे देशातील असंख्य युवा महिला क्रिकेटपटूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तसेच अधिक परदेशी खेळाडूंच्या समावेशामुळे महिला क्रिकेटचा आपोआप प्रसार होईल, अशी शहा यांची धारणा आहे. मात्र, त्यांची ही संकल्पना कितपत वास्तववादी आहे, याचे विश्लेषण आवश्यक ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधी प्रायोगिक स्वरूपात कोणते प्रयत्न झाले?

भारतीय महिला संघाने २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची किमया साधल्यानंतर देशात महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढली. त्यामुळे महिलांची ‘आयपीएल’ सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला. ‘बीसीसीआय’ने २०१८ मध्ये सर्वप्रथम पुरुषांच्या ‘आयपीएल’दरम्यानच महिलांचा ट्वेन्टी-२० सामना खेळवला. सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स हे दोन संघ त्या लढतीत खेळले. त्यानंतर २०१९ मध्ये व्हेलॉसिटी संघाची भर पडली आणि या तीन संघांच्या या स्पर्धेला ‘महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज’ असे नाव देण्यात आले. या दोन्ही वेळेस हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज संघ जिंकला. पुढे नोव्हेंबर २०२०च्या पर्वात स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने जेतेपद पटकावले. गतवर्षी या स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही.

पुरुष ‘आयपीएल’इतके महिलांच्या लीगचे अर्थकारण विस्तारेल का?

भविष्यात तीनऐवजी पुरुषांप्रमाणेच आठ अथवा किमान सहा संघांची महिलांची ‘आयपीएल’ खेळवण्यात यावी, अशी मागणी महिला संघातील खेळाडू, चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी केली. मात्र, इतक्या संघांच्या खरेदीसाठी फ्रँचायझी मालक मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच नुकतेच टाटा समूहाने ६७० कोटी रुपये मोजून दोन वर्षांसाठी पुरुषांच्या ‘आयपीएल’चे मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले. या लीगला २००८ मध्ये सुरुवात झाली, त्यावेळी ‘डीएलएफ’ने १६० कोटी रुपयांत चार वर्षांसाठी मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले होते. त्यामुळे महिला ‘आयपीएल’मध्येही असा चढता आलेख राहू शकेल का, याचाही ‘बीसीसीआय’ला विचार करावा लागेल. तसेच ‘आयपीएल’ सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाकडे असून त्यांनी २०१८ ते २०२२ या पाच वर्षांसाठी साधारण १६ हजार ३४७ कोटी रुपये मोजले. महिला ‘आयपीएल’साठी इतकी मोठी रक्कम जवळपास अशक्यच आहे. असे विश्लेषकांना वाटते.

भारतातील महिला क्रिकेटसाठी ‘आयपीएल’ का महत्त्वाची?

पुरुषांची ‘आयपीएल’ ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय स्थानिक ट्वेन्टी-२० लीग मानली जाते. या लीगमुळे जगभरातील खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळवण्याची आणि आपल्यातील प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळत असल्याने ते या लीगमध्ये खेळण्यासाठी आतुर असतात. ‘आयपीएल’चे जागतिक क्रिकेटमधील स्थान लक्षात घेता परदेशातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटूंना या लीगकडे आकर्षित करणे फारसे अवघड जाणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आघाडीच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी लाभल्यास भारतीय महिला खेळाडूंच्या गुणवत्तेतही सुधारणा होऊ शकेल. त्यांना दडपणाखाली खेळण्याचा अनुभव मिळेल. तसेच भारतात सातत्याने प्रतिभावान, युवा महिला खेळाडू घडतील.

वार्षिक क्रिकेट हंगामाच्या वेळापत्रकात या स्पर्धेला बसवणे किती आव्हानात्मक ठरेल?

महिला क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आता सातत्याने वाढ होत आहे. त्यातच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग आणि इंग्लंडमधील द हंड्रेड यांसारख्या स्पर्धांमुळे महिलांच्या वार्षिक क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक अधिकाधिक व्यग्र होत आहे. त्यामुळे महिलांच्या ‘आयपीएल’साठी वेळ काढणे हे ‘बीसीसीआय’पुढील मोठे आव्हान आहे. तसेच महिलांची ‘आयपीएल’ सुरू झाल्यास अन्य लीगचा दर्जा आणि लोकप्रियता कमी होण्याची भीती आहे. या परिस्थितीत ‘आयसीसी’शी संलग्न असलेली अन्य क्रिकेट मंडळे आपल्या आघाडीच्या महिला क्रिकेटपटूंना ‘आयपीएल’मध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women ipl soon what a reality what a challenge asj 82 print exp 0222