अन्वय सावंत
महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामापूर्वीचा खेळाडू लिलाव सोमवारी (१३ फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात अपेक्षेप्रमाणे भारताच्या खेळाडू प्रमुख आकर्षण ठरल्या. भारताच्या १० महिला खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना लिलावातील सर्वांत महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सर्वाधिक ३.४० कोटी रुपयांच्या बोलीसह मानधनाला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. मानधनावर इतकी मोठी बोली का लावण्यात आली आणि अन्य कोणत्या खेळाडूंसाठी मुंबई इंडियन्स, बंगळूरु, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स व गुजरात जायंट्स या पाचही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली याचा आढावा.
मानधना सर्वांत महागडी खेळाडू का ठरली?
भारताची उपकर्णधार मानधनाची सध्याच्या घडीला जागतिक महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. तिने आतापर्यंत ११२ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २७.३२च्या सरासरी आणि १२३.१३च्या धावगतीने २६५१ धावा केल्या आहेत. ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत मानधना तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’ आणि इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव मानधनाच्या गाठीशी आहे. त्यामुळे ‘डब्ल्यूपीएल’च्या लिलावात तिच्यावर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि तसेच झाले.
हे वाचा >> WPL Auction 2023: महिला आयपीएलच्या लिलावात किती बोली लागली? सर्व महिला क्रिकेटपटूंची संपूर्ण यादी
मानधनासाठी कोणत्या संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली?
मानधनाला खरेदी करण्यासाठी बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ सर्वाधिक उत्सुक दिसले. ५० लाख मूळ किंमत असलेल्या मानधनावर सर्वांत आधी मुंबईने बोली लावली. त्यानंतर बंगळूरुने मुंबईला आव्हान दिले. दोन्ही संघ मानधनाला खरेदी करण्याची संधी सहजासहजी गमावणार नाहीत हे स्पष्ट दिसत होते. मात्र, अखेरीस बंगळूरुने ३.४० कोटी रुपयांची बोली लावत २६ वर्षीय मानधनाला संघात समाविष्ट करून घेतले. ‘‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला खूप मोठा वारसा आहे. या संघाचे अनेक चाहते आहेत. आता आम्ही मिळून सर्वोत्तम संघ तयार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. मी बंगळूरु संघाची जर्सी परिधान करण्यासाठी खूप उत्सुक आहे,’’ असे मानधना म्हणाली. मानधना या संघाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता असल्याचे बंगळूरु संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन म्हणाले.
भारताच्या अन्य कोणत्या खेळाडू कोट्यधीश ठरल्या?
‘डब्ल्यूपीएल’च्या लिलावात पाचही संघांनी सर्वोत्तम भारतीय खेळाडूंना खरेदी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळेच भारताच्या १० खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. यामध्ये मानधनासह अष्टपैलू दीप्ती शर्मा (२.६० कोटी, यूपी वॉरियर्स), फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (२.२० कोटी, दिल्ली कॅपिटल्स), सलामीवीर शफाली वर्मा (२ कोटी, दिल्ली कॅपिटल्स), यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष (१.९० कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), अष्टपैलू पूजा वस्त्रकार (१.९० कोटी, मुंबई इंडियन्स), फलंदाज हरमनप्रीत कौर (१.८० कोटी, मुंबई इंडियन्स), वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर (१.५० कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), यष्टिरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया (१.५० कोटी, मुंबई इंडियन्स), अष्टपैलू देविका वैद्य (१.४० कोटी, यूपी वॉरियर्स) या खेळाडूंचा समावेश होता.
सर्वांत महागड्या परदेशी महिला खेळाडू कोण?
इंग्लंडची नताली स्किव्हर-ब्रंट आणि ऑस्ट्रेलियाची ॲश्ली गार्डनर या अष्टपैलू संयुक्तरीत्या सर्वांत महागड्या परदेशी खेळाडू ठरल्या. स्किव्हर-ब्रंटला मुंबई इंडियन्स संघाने ३.२० कोटी रुपयांत खरेदी केले. आघाडीच्या फळीतील फलंदाज आणि मध्यम गती गोलंदाज असा स्किव्हर-ब्रंटचा लौकिक आहे. गार्डनरवर गुजरात जायंट्सनेही ३.२० कोटी रुपयांची विजयी बोली लावली. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनीला २ कोटी रुपयांत गुजरात संघाने खरेदी केले. इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन (१.८० कोटी, यूपी वॉरियर्स) आणि ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू एलिस पेरी (१.७० कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) यांच्यावरही मोठी बोली लागली.