– राहुल खळदकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षा न झालेल्या न्यायाधीन बंद्यांची (कच्चे कैदी) संख्या वाढत असून देशभरातील कारागृहे कच्च्या कैद्यांनी तुडुंब भरली आहेत. देशभरातील सर्वच कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. पुरुष कैद्यांप्रमाणेच महिलांसाठीच्या कारागृहातही क्षमतेपेक्षा जास्त महिला कैद्यांना ठेवण्यात आले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) महाराष्ट्रातील महिला कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी असल्याची माहिती उजेडात आली आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, झारखंड या सहा राज्यांतील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. 

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी का?

गंभीर गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात ठेवण्यात येते. त्यांना कच्चे कैदी असे म्हटले जाते. जामीन मिळेपर्यंत कैद्यांना कारागृहात ठेवण्यात येते. गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेल्या आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्याबरोबरच सुनावणी प्रक्रिया पार पाडून त्यांना जामीन मंजूर होईपर्यंतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडावे लागत असल्याने त्याचा ताण पोलीस, न्यायव्यवस्था आणि कारागृह प्रशासनावर पडत आहे. देशातील बहुतांश कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. महिला आणि पुरुष कैद्यांच्या संख्येचा विचार केल्यास सर्वाधिक कैदी शिक्षा न झालेले आहेत. कारागृहात ठेवण्यात आलेल्या एकूण कैद्यांची संख्या विचारात घेतल्यास ७५ ते ८० टक्के कैदी शिक्षा न झालेले आहेत. शिक्षा झालेल्या कैद्यांचे प्रमाण २० ते २५ टक्के एवढेच आहे.

महाराष्ट्रातील महिलांसाठीच्या कारागृहांची क्षमता किती? 

महाराष्ट्रात येरवडा, मुंबई आणि अकोला येथे महिलांसाठी स्वतंत्र कारागृहे आहेत. राज्यात ३१ जिल्हा कारागृहे आहेत. एक खुली वसाहत आहे. १४२ उपकारागृहे आहेत. राज्यातील कारागृहात ४ हजार ७२५ शिक्षा झालेले पुरुष कैदी आहेत आणि ३० हजार १२५ कच्चे कैदी आहेत. महिलांसाठी असलेल्या स्वतंत्र  कारागृहांत १३४३ कैदी आहेत. त्यांपैकी वीस टक्के महिला कैद्यांना शिक्षा झालेली आहे. उर्वरित महिला कैद्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. तीन कारागृहांत १३२० महिला कैद्यांना ठेवण्याची एकत्रित क्षमता आहे.

जास्त महिला कैदी असणारी राज्ये कोणती?

सर्वाधिक महिला कैदी उत्तराखंडमधील कारागृहात आहेत. तेथील महिला कारागृहाची क्षमता विचारात घेतल्यास उत्तराखंडमधील महिला कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे १५६.५ टक्के महिला कैदी आहेत. उत्तरप्रदेशमध्ये हे प्रमाण १४०.६ टक्के आहे. छत्तीसगडमध्ये १३६.५ टक्के, महाराष्ट्रात  १०५.८ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये १०४.१ टक्के आणि झारखंडमध्ये १०२.६ टक्के आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैद्यांची संख्या आणि टक्केवारी विचारात घेता महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक महिला कारागृहे कोठे ?

उद्योग व्यवसायात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात महिलांसाठी तीन स्वतंत्र कारागृहे आहेत. राज्यात असलेल्या पुरुष कैद्यांच्या कारागृहात महिला कैद्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र  कक्षाची सोय आहे. राजस्थानात महिलांसाठी सहा स्वतंत्र कारागृहे आहेत. ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. राजस्थानानंतर तामिळनाडूत महिलांसाठी पाच स्वतंत्र कारागृहे आहेत. महिलांसाठी केरळात तीन, गुजरातमध्ये दोन, पश्चिम बंगालमध्ये एक, उत्तर प्रदेशात एक अशी कारागृहे आहेत.

महिला कैद्यांवरील गुन्हे कोणते?  

महाराष्ट्रात महिलांसाठीच्या तीन स्वतंत्र कारागृहात सध्या १३४३ महिला कैदी आहेत. पुरुष कैद्यांची संख्या विचारात घेतल्यास महिला कारागृहातील कैद्यांची संख्या तशी कमी असली तरी, महिला कारागृहातही क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, लूट, अपहार, फसवणूक, बलात्कार, अपहरण, खंडणी अशा विविध गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर पुरुष कैद्यांना कारागृहात ठेवण्यात येते. पुरुषांच्या तुलनेत महिलांवर काही विशिष्ट प्रकारचे गुन्हे दाखल होतात. महाराष्ट्रातील कारागृहात असलेल्या महिला कैद्यांवर सर्वाधिक गुन्हे सुनेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे या प्रकारातील आहेत. छळ, खून, फसवणूक, चोरी असे गुन्हे सोडल्यास महिलांकडून अन्य गुन्हे होण्याचे प्रमाण कमी आहे.

कारागृहात सुविधा कोणत्या? 

कारागृह प्रशासनाकडून महिला कैद्यांना सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पुरुष कैद्यांच्या तुलनेत महिला कैद्यांच्या समस्या वेगळ्या असतात. महिला कारागृहात असलेल्या ७५ ते ८० टक्के महिला कैद्यांवर गुन्हा सिद्ध झालेला नसतो. त्यामुळे त्यांना कारागृहातील विविध रोजगारविषयक योजनांचा लाभ घेता येत नाही. महिला कैद्यांना दैनंदिन वापरातील वस्तू द्याव्या लागतात. अगदी टिकली, बांगडीपासून महिला कैद्यांना सर्व प्रकारच्या सुविधा द्याव्या लागतात. मासिक पाळीत सॅनटिरी नॅपकिन तसेच त्यांना आरोग्यविषयक उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात.

महिला कैद्यांच्या मुलांसाठी सोय काय ?

एखाद्या गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर महिला कैद्याला कारागृहात ठेवण्यात येते. तिच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नातेवाईक नसतील तर, कारागृह प्रशासनाला महिला कैद्याच्या मुलांचे संगोपन करावे लागते. नियमानुसार महिला कैदी कारागृहात तिच्या मुलाचा सहा वर्षांपर्यंत सांभाळ करू शकते. मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास काेणी पुढे आले नाही तर संबंधित मुलाची जबाबदारी बाल संगोपन संस्थेकडे सोपविण्यात येते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women prisons and status of women prisoners in india print exp scsg