Australia Violence Against Women ऑस्ट्रेलियात महिलांवर होणारे हिंसाचार दिवसागणित वाढत आहेत. गेल्या चार महिन्यात २७ महिला हिंसाचाराच्या बळी ठरल्या आहेत. देशातील वाढता हिंसाचार ‘राष्ट्रीय संकट’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी हिंसाचारावरील कायदे कठोर व्हावेत यासाठी संपूर्ण देशात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. नेमकं ऑस्ट्रेलियात काय घडत आहे? देशातील महिलांवरील हिंसाचार का वाढत आहेत? इतक्या मोठ्या संख्येने लोक निदर्शने का करत आहेत? याबद्दल जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रविवारी (२८ एप्रिल) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज स्वतः कॅनबेरामध्ये सुरू असलेल्या निदर्शनात सहभागी झाले. अल्बनीज म्हणाले की, देशातील सर्व सरकारांनी फेडरल स्तरावर बदल करणे आणि गुन्हेगारांना रोखण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. “आपल्याला संस्कृती बदलण्याची गरज आहे आणि आपल्याला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. त्यासह कायदेशीर प्रणाली बदलण्याचीही तितकीच गरज आहे,” असे अल्बनीज आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले. “पीडितांना आधार देणे पुरेसे नाही. आपण गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महिलांवर होणारी हिंसा म्हणजे महामारी आहे,” असे अल्बानीज म्हणाले.
हेही वाचा : इस्रोच्या अहवालातून हिमनदी तलावांबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; भविष्यात तलावफुटीच्या घटना वाढणार?
संपूर्ण ऑस्ट्रेलियात निदर्शने
सिडनी, कॅनबेरा, होबार्ट, ॲडलेड, मेलबर्न आणि ब्रिस्बेनसारख्या शहरांसह संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये एकूण १५ ‘नो मोर: नॅशनल रॅली अगेन्स्ट जेंडर बेस्ड व्हायोलन्स’ आयोजित करण्यात आली आहेत. यात सहभागी होत, ऑस्ट्रेलियन नागरिकांनी महिलांवरील हिंसाचार रोखण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी सिडनीमध्ये, शहराच्या संसद भवनासमोर जवळ जवळ तीन हजार लोक जमले. निदर्शकांनी महिलांबाबत हिंसाचार करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली. ग्रीन्स पार्टीच्या सिनेटर साराह हॅन्सन-यंग यांनी ‘ॲडलेड’मध्ये सांगितले की, ऑस्ट्रेलियातील लिंग-आधारित हिंसाचार तातडीने रोखणे आवश्यक आहे. हॅन्सन-यंगच्या प्रवक्त्याने सांगितले की, “महिला पुढे येऊन काहीही बोलत नाही. स्थिती खरंच वाईट आहे, परंतु आम्ही त्यावर काही करू शकत नाही,”
Violence against women is an epidemic in Australia, Prime Minister Anthony Albanese said, as thousands attended rallies in Sydney and other Australian cities, urging tougher laws on gender violence https://t.co/fHUFfU35Ne pic.twitter.com/cxZPnz3Ur8
— Reuters (@Reuters) April 27, 2024
निदर्शनांमध्ये आंदोलक, आदर, आणखी हिंसा नको आणि आपल्यापैकी किती जणांना मरायचे आहे?, यासारखे फलक हाती घेऊन दिसत आहेत. मेलबर्नमध्ये फेडरेशन स्क्वेअरकडे कूच करण्यापूर्वी व्हिक्टोरियाच्या स्टेट लायब्ररीबाहेर आंदोलकांचा मोठा जमाव जमला. त्यात एका महिलेने तिच्या तोंडावर लाल हाताचे ठसे उमटवले होते आणि खरे पुरुष हिंसाचार करत नाहीत असा फलक हाती धरला होता. व्हिक्टोरियाच्या प्रीमियर जॅसिंटा ॲलनदेखील या निषेधामध्ये सामील झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “आपण महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलणे थांबवले पाहिजे आणि पुरुषांच्या हिंसाचाराचा सामना केला पाहिजे, हीच समस्या आहे,”
महिलांवरील हिंसाचार ही एक महामारी
पंतप्रधान अँथनी अल्बनीज निदर्शनात सामील झाले होते. निदर्शनात सामील होण्याआधी, त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले, “मी संपूर्ण ऑस्ट्रेलियातील महिलांबरोबर चालेन. महिलांवरील हिंसाचार ही एक महामारी आहे. आपण हे बदलायला हवे.” एका आंदोलनात सहभागी झालेल्या लेखिका एमी यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले, “जीव गमावणार्या महिला आणि इतर हिंसाचार सहन करत, आपले आयुष्य कमी करत असलेल्या महिलांसाठी ही निदर्शने आहेत. लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. एकत्र येऊन लढण्याची हीच वेळ आहे.”
A woman has been killed every four days so far this year.
— Anthony Albanese (@AlboMP) April 27, 2024
Tomorrow I will walk with women across Australia to say enough is enough. pic.twitter.com/6Ncu9QLmq3
ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेची हत्या
गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात चैतन्य मधगाणी या भारतीय महिलेची तिच्याच पतीने हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर तो मुलांना घेऊन भारतात पळून आला होता. तिचा मृतदेह रस्त्याशेजारी असलेल्या एका कचराकुंडीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ‘डिस्ट्रॉय द जॉईंट’ या मोहिमेच्या गटाने जारी केलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, २०२४ च्या पहिल्या ११९ दिवसांत २७ महिलांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधान अल्बनीज म्हणाले की, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दर चार दिवसांनी एका महिलेची हत्या झाली आहे. त्याच वेळी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये १४ महिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
२०२४ च्या डेटामध्ये त्या पाच महिलांचाही समावेश आहे, ज्यांची १३ एप्रिल रोजी बोंडी शॉपिंग सेंटरमध्ये जोएल कौची या व्यक्तीने चाकूने वार करून हत्या केली होती. खरं तर, घटनेच्या व्हिडिओ फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, हल्ल्यादरम्यान कौची याने जाणीवपूर्वक पुरुषांना न मारता महिलांवर वार केले. न्यू साउथ वेल्सचे पोलीस आयुक्त कॅरेन वेब यांनी बोंडी शॉपिंग सेंटरमधील मारेकर्याने महिलांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट सांगितले होते. मारेकऱ्याच्या वडिलांनी स्पष्ट केले की, प्रेयसी नसल्यामुळे मुलाला नैराश्य आले आणि त्यातूनच तो असे कृत्य करत होता.
बलात्कार आणि हत्येचा आरोप तरीही जामिनावर बाहेर
याशिवाय, २८ वर्षीय मॉली टाइसहर्स्टचा मृत्यूही हादरवून सोडणारा होता. सिडनीच्या पश्चिमेकडील फोर्ब्समधील यंग स्ट्रीटवरील तिच्या घरात ती मृतावस्थेत आढळली. तिचा पूर्व पती डॅनियल बिलिंग्सने तिची हत्या केली. टाइसहर्स्टच्या कथित हत्या प्रकरणात, डॅनियल बिलिंग्सवर तीन वेळा बलात्कार केल्याचा, तिचा पाठलाग केल्याचा, तिच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आणि तिच्या १२ आठवड्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण केल्याचा आरोप होता. मात्र, तो आता जामिनावर बाहेर आहे.
टाइसहर्स्टच्या हत्येच्या चार महिन्यांपूर्वी जानेवारीत घराला लागलेल्या आगीत एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मुलानेच तिची हत्या केल्याची माहिती समोर आली होती. रेबेका यंग, समंथा मर्फी आणि हन्ना मॅकग्वायर या महिलांचा मृत्यूही घरगुती हिंसाचारामुळे झाला. या गुन्ह्यांनंतर व्हिक्टोरियामधील कौटुंबिक हिंसाचार सेवा संस्था ‘सेफ अँड इक्वल’च्या मुख्य कार्यकारी तानिया फरहा यांनी सांगितले की, पुरुषांकडून ज्या वेगाने महिलांची हत्या केली जात आहे ते एक ‘राष्ट्रीय संकट’ आहे.
महिलांवरील वाढत्या हिंसाचाराची कारणे
महिलांवरील गुन्ह्यांमध्ये होणार्या वाढीला पुरुषी अहंकार कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ऑस्ट्रेलियात द्वेषयुक्त भाषा वापरणे आजकाल ट्रेंड झाला आहे. २३ टक्के ऑस्ट्रेलियन पुरुषांना ऑनलाइन लैंगिकतावादी भाषा वापरणे योग्य वाटते. शिवाय, जवळजवळ पाचपैकी एक ऑस्ट्रेलियन पुरुष एखाद्या महिलेच्या संमतीशिवाय तिचे ‘इंटीमेट फोटो’ ऑनलाइन शेअर करणे पसंत करतो.
हेही वाचा : भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? नृत्य केल्याने खरंच आरोग्य सुधारते का?
महिलांचा अपमान करणे, पुरुष वर्चस्ववादी विचारसरणीचा प्रचार करणे या गोष्टी ऑनलाइनदेखील वाढल्या आहेत. खरं तर, गेल्या महिन्यातच ऑस्ट्रेलियन सरकारने ऑनलाइन स्वरुपाच्या या हानिकारक गोष्टी हाताळण्यासाठी ३.५ दशलक्ष डॉलर अनुदान देऊ केले. ऑस्ट्रेलियातील शिक्षक वर्गाने सांगितले आहे की, ऑस्ट्रेलियन मुले ऑनलाइन अनेक चुकीच्या गोष्टींच्या संपर्कात येत आहेत. ज्याचा त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. फेडरल सरकार घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी राष्ट्रीय योजनांवर काम करत आहे.