ज्ञानेश भुरे
भारताला तिसऱ्यांदा महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली असून या स्पर्धेला बुधवारपासून (१५ मार्च) प्रारंभ झाला. यापूर्वीच्या स्पर्धेत भारताला १ सुवर्ण आणि २ कांस्य अशी तीन पदके मिळाली होती. ही कामगिरी सुधारण्याची भारतीय खेळाडूंना या वेळी मोठी संधी असेल. निकहत झरीन, लवलिना बोरगोहेनखेरीज अन्य काही खेळाडूंकडून भारताला या वेळी पदकाच्या आशा आहेत. निकहत सुवर्णपदक राखण्यात यशस्वी ठरणार का, याकडे प्रामुख्याने सर्वांचे लक्ष असेल.
महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा भारतात यापूर्वी कधी झाली होती?
महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला २००१पासून सुरुवात झाल्यावर भारताला तिसऱ्यांदा स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. यापूर्वी २००६ आणि २०१८ मध्ये ही स्पर्धा भारतात झाली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेप्रमाणे गेल्या दोन स्पर्धाही नवी दिल्लीतच आयोजित करण्यात आल्या होत्या. याखेरीज २०१७मध्ये महिलांच्या राष्ट्रकुल स्पर्धेचेही यजमानपद भारताला मिळाले होते. ही स्पर्धा गुवाहाटीला झाली होती.
या वेळच्या जागतिक स्पर्धेचे वैशिष्ट्य काय?
जगभरातील अव्वल खेळाडू या जागतिक स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी हे एक आव्हान असते. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसमोर आपले कौशल्य दाखविण्याची संधी खेळाडूंना मिळत असते. ऑलिम्पिक वर्ष किंवा त्याआधीच्या वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा असतो. त्यामुळे त्या स्पर्धेत एक वेगळी चुरस असते. पुढील वर्षीही ऑलिम्पिक होणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने या वेळी स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे या वेळी होणारी स्पर्धा ही केवळ जागतिक स्पर्धाच असेल.
विश्लेषण : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत कोणत्या खेळाडूंवर भारताची भिस्त?
भारतीय खेळाडूंची या स्पर्धेतील आजवरची कामगिरी कशी आहे?
मेरी कोम जागतिक स्पर्धेतील भारताची सर्वांत यशस्वी बॉक्सिंगपटू आहे. तब्बल सहा वेळा मेरीने जागतिक विजेतेपद मिळवले आहे. तसेच तिने प्रत्येकी एकदा रौप्य आणि कांस्यपदकही मिळवले आहे. मेरीनंतर आता निकहत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास प्रयत्नशील आहे. तुर्कस्तान येथे २०२२ मध्ये झालेल्या अखेरच्या स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ कांस्य अशी तीन पदके मिळवली होती. यात निकहतच्या सुवर्णपदकाचा समावेश होता.
या वेळी भारताला कुणाकडून पदकांच्या अपेक्षा आहेत?
यंदाच्या स्पर्धेत भारताच्या एकूण १२ खेळाडू सहभागी झाल्या आहेत. यामध्ये भारताला सर्वाधिक आशा या निकहत आणि ऑलिम्पिक पदकविजेती लवलिनाकडून आहेत. निकहत ५० किलो वजनी गटात या वेळी विजेतेपद टिकवण्यासाठी खेळेल. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी निकहत पाचवी भारतीय खेळाडू ठरली होती. त्यानंतर तिने राष्ट्रकुल आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले आहे. लवलिना या वेळी वजन गट बदलून ७५ किलो वजन गटातून खेळणार आहे. यापूर्वी लवलिनाने जागतिक स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्येही लवलिना कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे.
लवलिना, निकहत वगळता अन्य कुणावर नजर?
निकहत, लवलिना वगळता नितू घंगास, स्विटी बोरा आणि मनीषा मॉन यांच्याकडून भारताला अपेक्षा आहेत. मनीषाने २०१८च्या जागतिक स्पर्धेतून पदार्पण केले. त्या वेळी ती उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. मनीषा ५७ किलो गटातून खेळत असून, २०२२च्या स्पर्धेत तिला कांस्यपदक होते. स्विटी ८१ किलो वजन गटातील आशियाई आणि राष्ट्रीय विजेती आहे. स्विटीने २०१४च्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदकही मिळवले होते. नितू ४८ किलो गटातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेती खेळाडू आहे. युवा जागतिक स्पर्धेतील नितूची कामगिरी लक्षणीय आहे. नितूने २०१७ आणि २०१८ मध्ये झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. युवा गटात ती आशियाई विजेतीही आहे. नितूचा रिंगमधील वेग आणि खेळ बघताना तरुणपणातील मेरीच्या खेळाची आठवण होते.