– अन्वय सावंत
ऑस्ट्रेलियन संघाने जागतिक महिला क्रिकेटवरील आपले वर्चस्व सिद्ध करताना विक्रमी सातव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला ७१ धावांनी सहज धूळ चारली. यंदा न्यूझीलंडमध्ये झालेली ही विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतालाही प्रबळ दावेदार मानले जात होते. भारताने गेल्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदा मात्र कामगिरीतील सातत्याच्या अभावाचा फटका भारतीय संघाला बसला आणि त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीला काेणती कारणे जबाबदार ठरली. याचा घेतलेला वेध –
विश्वचषकासाठी पुरेशी तयारी झाली होती का?
करोनाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय महिला संघाचे बरेच महिने सामने झाले नाहीत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज यांसारख्या संघांना जैव-सुरक्षा परिघात राहून सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) महिला संघाकडे दुर्लक्ष झाले. भारतीय संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यानंतर त्या थेट विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडमध्ये (फेब्रुवारी २०२२) मर्यादित षटकांचे सामने खेळल्या. त्यातच न्यूझीलंडमध्ये अतिरिक्त विलगीकरण आणि अन्य निर्बंधांमुळे भारतीय संघाच्या तयारीत अडथळे निर्माण झाले. या सर्व गोष्टींचा भारताच्या कामगिरीवर परिणाम झाला.
खेळाडूंमधील मतभेद हेसुद्धा एक कारण होते का?
कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात सारे आलबेल नसल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू आहेत. २०१८ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतापुढे इंग्लंडचे आव्हान होते. या सामन्यात ट्वेन्टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीतने मितालीला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. भारताने हा सामना गमावल्याने या निर्णयावर बरीच टीका केली गेली. त्यानंतर मिताली आणि हरमनप्रीत यांनी आपल्यातील मतभेद संपवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना कितपत यश आले आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
रमेश पोवार यांनी प्रशिक्षकपदाला न्याय दिला का?
२०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर प्रशिक्षक रमेश पोवार आणि मिताली यांच्यातील वाद उघडकीस आला होता. मितालीने ‘बीसीसीआय’ला पत्र लिहून पोवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याचे स्पष्टीकरण देताना पोवार यांनी मिताली देशासाठी खेळण्यापेक्षा स्वतःसाठी खेळते अशी टीका केली होती. त्यानंतर पोवार यांच्या जागी वूर्केरी रामनची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने सलग पाच एकदिवसीय मालिका जिंकल्या. तसेच २०२०मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. मात्र, पुढील वर्षीच रामन यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी पुन्हा रमेश पोवार आले. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली व पोवार यांनी आपल्यातील वाद मिटवत एकत्रित भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची तयारी दर्शवली. मात्र, यंदाच्या विश्वचषकादरम्यान त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. आता पोवार यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला असून त्यांची फेरनिवड होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संघनिवडीत कोणत्या त्रुटी होत्या?
भारतीय महिला संघाने यंदा विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले. या सामन्यात युवा सलामीवीर शफाली वर्मा खातेही न उघडता बाद झाल्याने तिला पुढील तीन सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले. शफाली आणि डावखुरी स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने गेल्या काही महिन्यांत दमदार कामगिरी करताना भारताला आक्रमक सुरुवात मिळवून दिली होती. त्यामुळे केवळ एका सामन्यानंतर शफालीला संघाबाहेर करण्यात आल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर तिचे संघात पुनरागमन झाले आणि तिने बांगलादेश (४२ धावा) व दक्षिण आफ्रिका (५३) यांच्याविरुद्ध चांगल्या खेळी केल्या. गोलंदाजीत अनुभवी लेग-स्पिनर पूनम यादवला केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली. तसेच उपकर्णधार हरमनप्रीत आणि अष्टपैलू पूजा वस्त्रकार वगळता भारताच्या खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या.