‘मेंदू सडणे’ या शब्दप्रयोगाला नकारात्मक किनार आहे. एखाद्याचे विचार अगदीच निरर्थक, निरुपयोगी आणि नकारात्मक असतील, तर साधारणतः हा शब्दप्रयोग कुत्सितपणे वापरला जातो. मात्र, बदलत्या डिजिटल काळात ‘मेंदू सडणे’ अर्थात ‘ब्रेन रॉट’ या शब्दाला आता वेगळे परिमाण प्राप्त होणार आहे. ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने ‘ब्रेन रॉट’ हा शब्द ‘वर्षातील शब्द’ (वर्ड ऑफ द इयर) निवडला आहे. मोबाइलवर (विशेषतः सामाजिक माध्यमांवर) तासन् तास राहिल्यामुळे मनाची होणारी अवस्था, असे सामान्यीकरण याचे करता येऊ शकते. या नव्या शब्दाविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्रेन रॉट’ म्हणजे काय ?

शब्दकोशात दिलेल्या अधिकृत अर्थानुसार, ‘‘ब्रेन रॉट’ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक स्वास्थ्य खराब होणे. विशेषतः अतिशय किरकोळ अशा ऑनलाइन साधनांच्या अतिवापरामुळे होणारा परिणाम.’ याचा थोडक्यात उलगडा करून सांगायचा झाल्यास सामाजिक माध्यमांवर तासन् तास रील पाहणे, अपडेट्स पाहणे, नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवणे अशा बाबींमुळे मनावर परिणाम होतो. एकाग्रता भंग पावते. मन विचलित होते. सातत्याने हात मोबाइलकडे जातात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. एकांगीपणा वाढतो. संवाद हरवतो. मेंदूच्या अशा स्थितीची मांडणी करायची झाल्यास त्याला ‘ब्रेन रॉट’ असे म्हणावे लागेल.

हेही वाचा : ४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?

‘ऑक्सफर्ड’मधील इतर स्पर्धक शब्द कोणते?

हीट डोम, न्यूरोस्पाइसी हे आणखी काही शब्द २०२४ या वर्षासाठीचे होते. मात्र, सर्वाधिक मते ब्रेन रॉट या शब्दाने घेतली. या शब्दाचा आणि सध्याच्या वास्तवाचा संबंध इतका निकटचा होता, या शब्दालाच समाविष्ट करण्यासाठी लोकांनी मतदान केले. शब्दाचा वापर, वास्तवाशी निकटता आदी बाबींचा विचार शब्द निवडताना होतो. २०२२ मध्ये ‘ग्लोबल मोड’ आणि २०१९ मध्ये ‘क्लायमेट इमर्जन्सी’ या शब्दांची शब्दकोशात भर पडली. ब्रेन रॉट या शब्दाला जगभरातील चार लाख मते पडली.

‘ब्रेन रॉट’मध्ये नेमके काय होते?

मानवी मेंदूचा अतिरेकी वापर यामध्ये होतो. मेंदूच्या संवेदना जागृत होण्यासाठी ज्या सामग्रीची आवश्यकता असते, अशी सामग्री अर्थात कंटेन्टचा पुरवठा मेंदूकडे इतक्या अतिरेकी प्रमाणात होतो, की या सामग्रीची शहानिशा करणे आणि ही सामग्री पचवणे मेंदूला जमत नाही. माहितीचा मोठा पुरवठा करून मेंदूकडून अतिरेकी कामाची अपेक्षा ठेवली, की त्याची परिणती ‘ब्रेन रॉट’मध्ये होते. ऐकू येणे, चव, वास ओळखणे, स्मृती जागृत ठेवणे, कारणमीमांसा करणे, समस्या सोडविण्यासाठी मेंदूचा वापर, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व विकास आणि एकूणच अस्तित्वाच्या जाणिवेवरच डिजिटल व्यसनामुळे उद्भवलेल्या ‘ब्रेन रॉट’मुळे परिणाम होतो. ‘ब्रेन रॉट’मुळे होणारे प्रमुख परिणाम खालीलप्रमाणे

  • हायपरअॅक्टिव्ह वर्तन
  • मुलांमध्ये विशेष करून आक्रमकता वाढणे
  • व्यसनात्मक वर्तनाचा आकृतिबंध
  • झोपेवर परिणाम होत असल्याने मेंदूची नको असलेली माहिती काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम. त्यातून मेंदूची कार्यक्षमता कमी होते.
  • ‘स्क्रीन टाइम’ जास्त होत असल्याने प्रत्यक्ष संवाद करण्याची क्षमता हरवून बसते. त्यातून अनेकदा कुटुंबीयांशीही मेसेज अथवा चॅटिंगने संवाद करण्यास प्राधान्य दिले जाते.

शरीरावर काय दुष्परिणाम?

एकाग्रता कमी होते. दीर्घ काळ करावी लागणारी कामे करावीशी वाटत नाहीत. ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या विसरल्यासारख्या होतात. रोजची दैनंदिन कामेही नीटशी आठवत नाहीत. सामाजिक माध्यमांमुळे मन गुंतलेले असते. पण, त्यातून मनाला अर्थपूर्ण काहीही मिळत नसल्याने याची अंतिम परिणती ‘ब्रेन रॉट’मध्ये होते. मोबाइलवर सततचे स्क्रोलिंग करणे, सामाजिक माध्यमांची चटक लागणे, रिवॉर्ड, नोटिफिकेशन्स आणि तत्सन ऑनलाइन बाबींमुळे मेंदू अधिक अलर्ट मोडवर राहतो. त्यातून इतर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा : विश्लेषण : सरकारला व्याघ्रप्रकल्प नको आहेत का?

‘ब्रेन रॉट’मधून मुक्त कसे व्हावे ?

विविध लक्षणांमधून आपण ‘ब्रेन रॉट’चे शिकार झालो आहोत, अशी शंका आली आणि डॉक्टरांकडूनही त्यास दुजोरा मिळाला, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू त्यातून बाहेर येता येते. सामाजिक माध्यमांवरील वावर, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे आणि इतर उपाययोजनांतून मुक्त होता येते. तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. खालील उपाय योजता येतील.

  • स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे
  • आभासीपेक्षा खऱ्या आयुष्याचा अनुभव घेणे. आठवड्यातून एकदा आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटणे.
  • विकास आणि माणूस म्हणून वृद्धी होईल, प्रेरणा मिळेल अशी सामग्री ऑनलाइन पाहणे.
  • डिजिटल व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी सातत्याने त्यापासून दूर राहणे.
  • दैनंदिन व्यायाम, वेळेवर जेवण आणि योग्य दिनचर्या ठेवणे.