अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाचा इयान नेपोम्नियाशी आणि चीनचा डिंग लिरेन या ग्रँडमास्टर खेळाडूंमधील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीला शुक्रवार, ७ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. २००७ सालानंतर प्रथमच विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्याव्यतिरिक्त एखाद्या बुद्धिबळपटूला जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळणार आहे. अस्ताना, कझाकस्तान येथे होणाऱ्या या लढतीत कोणत्या बुद्धिबळपटूचे पारडे जड असेल आणि कार्लसनने या लढतीत न खेळण्याचा का निर्णय घेतला याचा आढावा.

नेपोम्नियाशीचे पारडे जड का?

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इयान नेपोम्नियाशीने २०२१मध्ये जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत कार्लसनला आव्हान दिले होते. मात्र, कार्लसनने खेळ उंचावल्यानंतर नेपोम्नियाशीने चुका केल्या आणि त्याचे जगज्जेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले. परंतु या लढतीत खेळल्यामुळे त्याला आव्हानवीरांच्या (कॅन्डिडेट्स) स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला. मग त्याने १४ फेऱ्यांची आव्हानवीरांची स्पर्धा विक्रमी ९.५ गुणांसह जिंकत पुन्हा जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी पात्रता मिळवली. आपल्या वैविध्यपूर्ण आणि आक्रमक चालींसाठी ओळखल्या जाणाऱ्या नेपोम्नियाशीला पारंपरिक (क्लासिकल) पद्धतीत हरवणे मोठे आव्हान मानले जाते. त्यातच त्याच्या गाठीशी जागतिक अजिंक्यपद लढतीत खेळण्याचा अनुभव असल्याने यंदा त्याचे पारडे जड मानले जात आहे.

लिरेनमध्ये धक्कादायक निकालाची कितपत क्षमता?

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणारा आणि चीनचा अव्वल बुद्धिबळपटू डिंग लिरेन आपल्या तंत्रशुद्ध खेळासाठी ओळखला जातो. लिरेन मोठे धोके पत्करणे टाळतो. परंतु त्याच्या खेळातील सातत्यामुळेच त्याला नमवणे प्रतिस्पर्ध्यांना अवघड जाते. तो धक्कादायक निकाल नोंदवण्यात सक्षम आहे. लिरेनने क्रमवारीतील स्थानाच्या जोरावर आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराला पराभूत करत त्याने उपविजेतेपद मिळवले. मग कार्लसनने माघार घेतल्यानंतर त्याचा जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.

विश्लेषण : यंदाची IPL फुकटात दाखवून Jio ला नेमका कसा फायदा होत आहे? जाणून घ्या

कार्लसनने माघार घेण्याचे काय कारण?

२०२१च्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत कार्लसनने नेपोम्नियाशीला पराभूत केले. यासह कार्लसनने पाचव्यांदा जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. परंतु त्यानंतर पुन्हा जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत खेळण्यासाठी त्याने एक अट ठेवली. इराणियन-फ्रेंच ग्रँडमास्टर अलिरेझा फिरूझा आपला प्रतिस्पर्धी असला, तरच आपण जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत खेळणार असल्याचे कार्लसन म्हणाला. जुलै २०२२मध्ये कार्लसनने आपण जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत खेळणार नसल्याचे आणि जगज्जेतेपद सोडत असल्याचे जाहीर केले होते. बुद्धिबळ विश्वासाठी हा मोठा धक्का होता.

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीचे स्वरूप काय?

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळाच्या लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्व प्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरेल आणि विश्वविजेतेपद मिळवेल. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर खेळाडू सामना बरोबरीत सोडू शकणार नाहीत. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल.

विश्लेषण : फुटबॉल गोलरक्षकांवर पेनल्टी शूटआउटमध्ये नवे निर्बंध कशासाठी? बदलामागची कारणे कोणती?

जागतिक अजिंक्यपद लढतीला किती मोठा इतिहास?

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळाची पहिली लढत १८८६मध्ये विलहेल्म स्टायनिट्झ आणि योहानेस झुकेर्टोर्ट यांच्यात झाली होती. यात स्टायनिट्झने बाजी मारली होती. इमॅन्युएल लास्कर, गॅरी कॅस्पारोव्ह आणि ॲनाटोली कार्पोव्ह यांनी सर्वाधिक सहा वेळा जगज्जेतेपद मिळवले आहे. मिखाईल बोट्विनिक, कार्लसन आणि विश्वनाथन आनंद यांनी पाच वेळा विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू असणाऱ्या कार्लसनने गेल्या १० वर्षांपासून विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World chess championship carlson withdrawal russia vs china print exp pmw
Show comments