‘‘तुमच्या संघातील अन्य खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यास त्यांच्या आनंदात तुम्ही सहभागी झाले पाहिजे. अखेर कोणत्याही खेळाडूपेक्षा संघाचे यश महत्त्वाचे असते.’’ एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केलेले हे वक्तव्य त्याच्याबाबत खूप काही सांगून जाते. यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांत शमीला संघाबाहेर बसावे लागले होते. मात्र, हार्दिक पंड्या जायबंदी झाल्याने शमीला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळाली आणि त्याने पाच गडी बाद करत आपले नाणे खणखणीत वाजवले. संधीसाठी वाट पाहणे आणि संधी मिळताच तिचे सोने करणे ही चांगली सवय शमीला सुरुवातीपासूनच आहे. इतकेच नाही, तर मैदानावर आणि मैदानाबाहेरही शमीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्यावर मात करत शमीने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. शमीच्या याच प्रेरणादायी प्रवासाचा आढावा.
शमीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची कधी सुरुवात केली?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर २०१३मध्ये शमीसाठी भारतीय संघाची दारे खुली झाली. त्याने जानेवारी २०१३मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ एक बळी मिळवता आला. मात्र, त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपले घरचे मैदान असलेल्या इडन गार्डन्सवर शमीने केलेले कसोटी पदार्पण अविस्मरणीय ठरले. त्याने दोन डावांत मिळून तब्बल नऊ गडी बाद करण्याची किमया साधली.
हेही वाचा… विश्लेषण: पाकिस्तानातून अफगाण निर्वासितांची हकालपट्टी का?
भारतीय वेगवान गोलंदाजाने कसोटी पदार्पणात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, त्याच काळात इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांसारखे गोलंदाज लयीत होते, तर काही वर्षांनी जसप्रीत बुमराचा भारतीय संघात प्रवेश झाला. त्यामुळे शमीला म्हणावे तितके श्रेय कधी मिळाले नाही.
वैयक्तिक आयुष्यात शमीला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या वर्षभरातच शमी कोलकाता येथे स्थित हसीन जहाँ नामक महिलेशी विवाहबंधनात अडकला. मॉडेल असलेल्या हसीन जहाँने मार्च २०१८मध्ये, शमी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने शमीवर घरगुती हिंसाचार, हत्येचा प्रयत्न, विषप्रयोग आणि गुन्हेगारी धमकी असे आरोप लावले. तसेच शमीच्या मोठ्या भावाने आपल्यावर बलात्कार केल्याचाही दावा तिने केला. तिने शमीवर सामनानिश्चितीचेही आरोप केले. या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शमीचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ‘बीसीसीआय’च्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने शमीची चौकशी केली. चौकशीदरम्यान शमीविरोधात काहीही न सापडल्याचे पथकाने स्पष्ट केल्यानंतर ‘बीसीसीआय’ने शमीचे नाव पुन्हा राष्ट्रीय कराराच्या यादीत जोडले, परंतु न्यायालयीन वाद त्यानंतरही सुरूच राहिला.
याचा शमीवर काय परिणाम झाला?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या सह-यजमानपदाखाली झालेल्या २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान शमीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तब्बल दीड वर्ष क्रिकेटपासून दूर राहावे लागले. याच कालावधीत त्याला वैयक्तिक आयुष्यातही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. आपल्यासाठी मधली काही वर्षे खूप अवघड होती, असे शमीने २०२०मध्ये रोहित शर्मासोबतच्या एका मुलाखतीत सांगितले होते. शमीला नैराश्य आले आणि त्याने तीन वेळा आत्महत्येचाही विचार केला होता. मात्र, कुटुंबीयांमुळे त्याला बळ दिले. ‘‘दुखापतीनंतर उपचार घेणे, रोज-रोज तेच व्यायाम करणे हे खूप अवघड जात होते. त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यातही काही समस्या निर्माण झाल्या. त्यातच ‘आयपीएल’ला सुरुवात होण्यास १०-१२ दिवस असताना माझा अपघात झाला. माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता. मानसिकदृष्ट्या मी खचलो होतो. आत्महत्येचा विचार तीन वेळा तरी माझ्या डोक्यात येऊन गेला. मात्र, कुटुंबीयांनी मला पाठिंबा दिला, मला समजावले. ते सतत माझ्यासोबत राहिले. त्यामुळेच मी पुन्हा स्थिरावलो आहे,’’ असे शमीने रोहितशी बोलताना सांगितले होते.
शमीने स्वत:ला कशा प्रकारे सावरले आणि दमदार पुनरागमन केले?
भारतीय क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचे मापदंड म्हणून यो-यो चाचणीकडे पाहिले जाते. २०१८मध्ये शमी या चाचणीत अनुत्तीर्ण झाला होता. त्यामुळे त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, हा त्याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा क्षण ठरला. शमीने तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली आणि भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. २०१८मध्ये १२ कसोटीत ४७ बळी, तर २०१९मध्ये ८ कसोटीत ३३ बळी मिळवत शमीने भारतीय संघात अढळ स्थान निर्माण केले. सुरुवातीला बुमरा, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यासह कसोटी क्रिकेटमध्ये शमीने उत्कृष्ट कामगिरी केली. पुढे बुमरा आणि शमीला मोहम्मद सिराजची साथ मिळाली. वेगवान गोलंदाजांची ही फळी भारताची आजवरची सर्वोत्तम मानली जात आहे. गेल्या काही काळात बुमराला दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागले. या काळात शमीने अतिरिक्त भार उचलत भारताच्या यशात महत्त्वाचे योगदान दिले.
विश्वचषकातील शमीची कामगिरी का ठरते खास?
मायदेशात होत असलेल्या यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीला फलंदाजी करू शकतात अशा गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शार्दूल ठाकूरला अंतिम ११ खेळाडूंत स्थान देण्यासाठी शमीला बाहेर बसावे लागत होते. मात्र, हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर भारताने शार्दूललाही बाहेर करत एकेक अतिरिक्त फलंदाज व गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि शमीला संधी मिळाली. चार सामने संघाबाहेर बसल्यानंतर शमीने न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमनात पाच बळी मिळवले. पुढील दोन सामन्यांत त्याने इंग्लंडविरुद्ध चार, तर श्रीलंकेविरुद्ध पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. तसेच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले. या स्पर्धेतील कामगिरीसह तो आता एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला आहे. आपला तिसरा एकदिवसीय विश्वचषक खेळणाऱ्या शमीने आतापर्यंत १४ डावांत ४५ गडी बाद केले आहेत. त्यामुळे त्याने झहीर खान (२३ डावांत ४४) आणि जवागल श्रीनाथ (३३ डावांत ४४) यांचा विक्रम मोडीत काढला. आता भारताला विश्वचषक विजयाचे स्वप्न साकार करायचे झाल्यास शमीला आपली हीच दर्जेदार कामगिरी सुरू ठेवावी लागणार आहे.