Tree Plantation World Environment Day पाणी या निसर्गदत्त देणगीच्या तुटवड्यामुळे भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या विज्ञान युगात सद्य:स्थितीतच या संकटाने विक्राळ रूप धारण केले आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण जगात पाण्याचा तुटवडा आहे. पाणी मिळत नसल्याने आणि शुद्ध पाण्याच्या अभावामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. हे संकट आणखी भीषण होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जागतिक बँकेने सादर केलेला एक अहवाल जगभरातील पाणीसंकटाचे वास्तव दर्शवतो. जगासह भारतातील पाण्याचे वाढते संकट, धक्कादायक आकडेवारी या सर्व भीषण परिस्थितीची कारणे याविषयी जाणून घेऊ या.

चिंताजनक पाणीटंचाईची आकडेवारी

पाणीटंचाईसह जगभरात शुद्ध पाण्याचादेखील अभाव आहे. २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार २.२ अब्ज लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही आणि ३.५ अब्ज लोक अस्वच्छ परिसरात राहतात. त्यातील १० पैकी आठ लोक ग्रामीण भागात राहतात. जागतिक लोकसंख्येच्या ३६ टक्के लोकसंख्या असलेल्या चीन आणि भारतामध्ये केवळ ११ टक्केच गोड्या पाण्याचा साठा आहे; तर पाच टक्के लोकसंख्या असणार्‍या उत्तर अमेरिकेकडे ५२ टक्के गोड्या पाण्याचा साठा आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोकडे आफ्रिकेतील अर्ध्याहून अधिक जलस्रोत आहेत, तरीही सहेल, दक्षिण पूर्व आफ्रिका, दक्षिण व मध्य आशिया यांसारख्या प्रदेशात भीषण पाणीटंचाई आहे. विशेष म्हणजे विकसनशील देशांमध्ये २००० पासून १९७ दशलक्ष लोकांपर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत घट झाली आहे.

२०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार २.२ अब्ज लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : बर्फाळ प्रदेशातल्या आईसलँडमध्ये ज्वालामुखीचा भीषण उद्रेक कसा झाला? ज्वालामुखीची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…

हवामान बदलाचा परिणाम

हवामान बदलामुळे विकसनशील देशांना अधिक तीव्र आणि दीर्घकाळापर्यंत दुष्काळ आणि पुराचा सामना करावा लागत असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती उद्भवत आहे. जगातील ८०० दशलक्षांहून अधिक लोकांना दुष्काळाचा धोका आहे आणि त्याहून दुप्पट लोक पूरप्रवण क्षेत्रात राहतात. तापमानवाढ बघता २१०० पर्यंत जागतिक भूभागाचा जवळ जवळ ५० टक्के भाग दुष्काळामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. मध्य युरोप, आशिया, हॉर्न ऑफ आफ्रिका, भारत, उत्तर अमेरिका, ॲमेझोनिया व मध्य ऑस्ट्रेलिया या देशांना याचा सर्वांत जास्त धोका आहे. पाणीटंचाईचा अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो. विकसनशील देशांमध्ये ५६ टक्के नोकऱ्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या क्षेत्रांमध्ये आहेत. त्यामुळे कमी पावसामुळे जीडीपीवाढीवर लक्षणीय परिणाम होतो.

जगातील ८०० दशलक्षांहून अधिक लोकांना दुष्काळाचा धोका आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

भारतात पाणीटंचाईचे संकट किती भीषण?

भारत सरकारच्या नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया) देशाच्या पाणी समस्येवर आधारित जल व्यवस्थापन निर्देशांक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार जवळपास ६०० दशलक्ष लोकांना अत्यंत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, भारतात ही परिस्थिती आणखीनच वाईट आहे. जगातील पाणीसाठ्यांपैकी केवळ चार टक्के पाणी भारताकडे आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या शहरी भागातील १४ वर्षांखालील आठ दशलक्ष मुलांचे आरोग्य अस्वच्छ पाण्यामुळे धोक्यात आहे.

जगातील पाणीसाठ्यांपैकी केवळ चार टक्के पाणी भारताकडे आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

अहवालात असेही म्हटले आहे की, पाण्याच्या गुणवत्ता निर्देशांकात १२२ देशांपैकी भारत १२० व्या क्रमांकावर आहे. देशातील जवळजवळ ७० टक्के पाणी दूषित आहे. जागतिक लोकसंख्येच्या तब्बल १८ टक्के लोकसंख्या असूनही भारताकडे जगातील केवळ चार टक्के गोड्या पाण्याचा साठा आहे. त्यामुळे भारतातले पाणीसंकट अधिकच भीषण आहे.

गोड्या पाण्याची समस्या

जलशक्ती मंत्रालयाने केलेल्या पाचव्या लघुसिंचन गणनेनुसार देशात २०.५२ दशलक्ष विहिरी आहेत. भारत भूजलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. परंतु, भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे; ज्यामुळे भविष्यात पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता निर्माण होत आहे. २०१९ च्या केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार अनेक भागांतल्या विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तसेच, ऋतूंतील बदल आणि पाण्याच्या अयोग्य वापरामुळे नद्या आणि जलाशय कोरडे पडतात; विशेषतः मान्सून येण्यापूर्वी. त्यामुळेही पाण्याची भीषण समस्या निर्माण होते.

भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे; ज्यामुळे भविष्यात पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता निर्माण होत आहे. (छायाचित्र-पीटीआय)

पाणीटंचाईचा कृषी क्षेत्रावर परिणाम

भारतात पाण्याच्या वापरामध्ये शेतीचा मोठा वाटा आहे. सध्याच्या पाणीटंचाईमुळे अन्नसुरक्षा आणि कृषी उत्पादकता धोक्यात आली आहे. शेतकर्‍यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. एकट्या कृषी क्षेत्रात २०३० पर्यंत ५७० अब्ज घनमीटरपर्यंत पाण्याची आवश्यकता असणार आहे. मात्र, पाण्याच्या अपुर्‍या साठ्यामुळे अन्नधान्याची टंचाई आणि किमतीत वाढ होऊ शकते. २०१९ च्या जागतिक बँकेच्या अहवालाचा अंदाज आहे की, भारतातील पाण्याच्या कमतरतेमुळे २०५० पर्यंत कृषी उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होऊ शकते.

पाणीटंचाईची इतर कारणे

मान्सूनचा पाऊस : भारताची जीवनरेखा असलेल्या मान्सूनचा हंगाम अनियमित होत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम)च्या अभ्यासानुसार १९५० पासून सरासरी मान्सूनच्या पावसात १० टक्क्यांनी घट झाली आहे.

वाढलेल्या बाष्पीभवनामुळे भूपृष्ठावरील पाण्याची उपलब्धता कमी होत आहेत आणि नद्या व तलाव कोरडे पडत आहेत.(छायाचित्र-पीटीआय)

बाष्पीभवन दर : वातावरणातील बदलामुळे जागतिक तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. ‘नेचर’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, १९८५-२०१८ दरम्यान भारतातील नैसर्गिक तलाव आणि जलाशयांच्या (कृत्रिम तलाव) बाष्पीभवनाचा दर ५.९ टक्क्यांनी वाढला आहे. वाढलेल्या बाष्पीभवनामुळे भूपृष्ठावरील पाण्याची उपलब्धता कमी होते, नद्या व तलाव कोरडे पडतात. त्यासह जमिनीतील ओलावाही कमी होतो; जो शेतीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

हेही वाचा : महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात, तरी महिलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त का? ‘लॅन्सेट’चा अहवाल काय सांगतो?

हिमनद्या (ग्लेशियर) वितळणे : गंगा आणि सिंधू यांसारख्या प्रमुख नद्यांचे उगमस्थान असणार्‍या हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. हिमनद्या वितळणे फायदेशीर वाटत असले तरी त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात व्यत्यय येतो.

दक्षिण भारतातील पाण्याचे संकट : कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा यांसह भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रमुख जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. या राज्यांमधील बहुतांश प्रमुख जलाशयांत त्यांच्या क्षमतेच्या केवळ २५ टक्के किंवा त्याहूनही कमी पाणी आहे.