जगातली पहिली नाकावाटे घेता येईल अशी करोना प्रतिबंधक लस iNCOVACC भारतात मिळण्यास सुरूवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी गुरुवारी ही लस लाँच केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या टप्प्यात iNCOVACC ही लस खासगी रुग्णालायांमध्ये मिळणार आहे. भारत बायोटेकच्या कंपनीची ही लस आहे. या लसीला गेल्या वर्षी ६ सप्टेंबरला या लसीच्या तातडीच्या वापराला सरकारने संमती दिली होती. मात्र अद्याप लस देण्यास सुरूवात झालेली नव्हती.
iNCOVACC ही लस आल्याने आता भारतात मिळणाऱ्या लसींमध्ये आणखी एका लसीचा समावेश झाला आङे. कोविन पोर्टलवर ही लस लसींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन, सीरमची कोव्हिशिल्ड आणि कोव्हाव्हॅक्स, रशियाची स्पुटनिक व्ही बायोलॉजिकल ई लिमिटेड ची कोर्बोवॅक्स या लसी मिळत होत्या. त्यात आता iNCOVACC या नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीचाही समावेश झाला आहे.
काय आहे iNCOVACC ही लस?
iNCOVACC ही लस जगातली पहिली नाकावाटे घेण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस आहे. भारत बायोटेक आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाने या लसीची निर्मिती केली आहे. आधी या लसीचं नाव BBV154 असं होतं. मात्र आता या लसीला iNCOVACC असं नाव देण्यात आलं आहे.
iNCOVACC ही लस कशी काम करते?
करोनासह अनेक व्हायरस म्युकोसामधून शरीरात जातात. म्युकोसा नाक, फुफ्फुसं, पचनसंस्था यामध्ये आढळणारा चिकट पदार्थ आहे. मात्र नाकावाटे घेता येणारी ही iNCOVACC लस म्युकोसामध्येच प्रतिबंधक शक्ती निर्माण करते. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही हे सांगितलं होतं की नेझल व्हॅक्सिन इतर लसींच्या तुलनेत देण्यास सोपी आहे. म्युकोसामध्ये ही लस प्रतिबंधक शक्ती निर्माण करते.
इतर व्हॅक्सिनपेक्षा ही लस वेगळी कशी?
भारतात आत्तापर्यंत ज्या लसी दिल्या जातात त्या दंडावर दिल्या जातात. इंजेक्शन दिल्याप्रमाणेच नसेत ही लस दिली पाहिजे. मात्र भारत बायोटेक ही लस नाकावाटे देण्यात येणारी आहे. नाकावाटे ही लस दिली जाणार आहे. नाकात इंजेक्शन दिलं जाणार नाही तर ड्रॉपप्रमाणे ही लस नाकावाटे दिली जाते.
नेझल व्हॅक्सिन इतर व्हॅक्सिनपेक्षा जास्त परिणामकारक आहे. नाकावाटे ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे ही लस तातडीने प्रतिकार शक्ती वाढते. ही लस नाकावाटे ड्रॉप्सप्रमाणे दिली जाणार आहे. एका डोसमध्ये चार थेंब असतात जर नेझल व्हॅक्सिन दोनदा घ्यायची असेल तर चार आठवड्याने याचा दुसरा डोस घेतला जाऊ शकतो. इंडिया टुडेने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
किती सुरक्षित आहे नाकावाटे देण्यात येणारी लस?
नाकावाटे देण्यात येणाऱ्या iNCOVACC या लसीची चाचणी तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १७५, दुसऱ्या ट्रायलमध्ये २०० लोकांना सहभागी करण्यात आलं होतं. तिसरी चाचणी दोन टप्प्यात घेतली गेली त्यातला पहिला टप्पा ३१०० लोकांमध्ये केला गेला. या लोकांना दोन डोस देण्यात आले होते. दुसरा टप्पा ८७५ लोकांसोबत केला गेला. त्यांना ही लस बूस्टर डोसप्रमाणे दिली गेली होती. कंपनीने हा दावा केला आहे की ही लस खूप परिणामकारक ठरली आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही लस खूप असरदार आहे असाही दावा कंपनीने केला आहे.
कोण घेऊ शकतं ही लस?
१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक ही लस घेऊ शकतात. सध्या १२ ते १७ वर्षांच्या मुलांचंही लसीकरण सुरू आहे. मात्र त्यांना ही नाकावाटे घेण्यात येणारी लस घेता येणार नाही. ज्यांनी पहिले दोन डोस घेतले आहेत त्यांना बूस्टर डोस म्हणून ही लस दिली जाणार आहे. १८ ते ५९ वर्षांचे लोक ही लस घेऊ शकतात. खासगी रूग्णालयांमध्ये ही लस ८०० रूपयांना मिळणार आहे. तसंच यावर जीएसटीही लागणार आहे.तर सरकारला ही लस ३२५ रूपयांना मिळणार आहे.