जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ने करोना महासाथीमध्ये संपूर्ण जगाला मार्गदर्शन केले. उपचार करण्याची पद्धत, त्यासाठीची औषधे, नागरिकांनी घ्यावयाची काळजी अशा वेगवेगळ्या पातळींवर जागतिक आरोग्य संघटनेने समस्त जगाची मदत केली. जागतिक आरोग्य संघटनेने काही महासाथींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तर काही रोगांचे समूळ उच्चाटन करण्यात ही संघटना कमी पडली, असा दावा केला जातो. या संघटनेला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेची कामगिरी, यश, कथित अपयश जाणून घेऊ या.
हेही वाचा >>> विश्लेषण: दुय्यम बाजार व्यापारासाठी ASBA सारखी सुविधा ग्राहकांना फायदेशीर ठरणार का? जाणून घ्या
जागतिक पातळीवरच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एखादी संघटना असावी म्हणून १९४५ सालातील एप्रिल महिन्यात सॅन फ्रान्सिस्को येथे जागतिक नेते एकत्र आले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेचा जन्म झाला. याच वेळी चीन आणि ब्राझील देशातील नेत्यांनी जागतिक पातळीवर आरोग्याच्या मुद्द्यावर काम करणारी एखादी संघटना असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तीन वर्षांनी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संघटनेची घटना लागू झाली. उत्तम आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आणि अधिकार आहे. वंश, धर्म, राजकीय विचार, आर्थिक तसेच सामाजिक स्थिती असा भेद न करता उत्तम आरोग्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शांती आणि सुरक्षेसाठी सर्वांचे आरोग्य ही एक मूलभूत बाब आहे, असे मत या वेळी मांडण्यात आले. या संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे. तसेच या संघटनेची सहा विभागीय तर एकूण १५० देशांमध्ये कार्यालये आहेत.
हेही वाचा >>> १८ राज्यात ५ कोटी विद्यार्थी असलेल्या NCERT चा अभ्यासक्रम बदलून भाजपाने काय साधले?
जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी सध्या टेड्रोस अधानोम घेब्रयसस हे आहेत. २०१७ सालापासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मागील ७५ वर्षांमध्ये अनेक उल्लेखनीय कामे केली. काही मोहिमांमध्ये जागतिक आरोग्य संघटना यशस्वी ठरली; तर काही मोहिमांमध्ये या संघटनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
देवी रोगाचे समूळ उच्चाटन हे जागतिक आरोग्य संघटनेला मिळालेले सर्वांत महत्त्वाचे आणि उल्लेखनीय यश आहे. संपूर्ण जगाला धोका असलेला देवी हा रोग नष्ट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने १९८० साली जाहीर केले होते. न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील साथरोग आणि वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका वफा अल सद्र यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. “देवी रोगाच्या उच्चाटनासाठी अनेक संघटना तसेच संस्थांनी काम केले. मात्र या रोगाच्या निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली,” असे सद्र म्हणाल्या. नॉर्वेमधील ओस्लो विद्यापीठातील वैद्यकशास्त्र इतिहासाचे प्राध्यापक ख्रिस्तोफ ग्रॅडमॅन यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवी रोगाचे निर्मूलन हे जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाचे सर्वांत उत्तम उदाहरण आहे, असे ग्रॅडमॅन म्हणाले.
हेही वाचा >>> विश्लेषण: जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत कोणाचे पारडे जड? कार्लसनने लढतीतून का घेतली माघार?
‘इबोला’ रोगाला थोपवण्यात जागतिक आरोग्य संघटनेला अपयश?
२०१४ साली गिनी, लायबेरिया, सीरिया या देशांत ‘इबोला’चा उद्रेक झाला होता. या काळात जागतिक आरोग्य संघटनेने उत्तम कामगिरी केली नाही, असे अनेकांचे मत आहे. ‘इबोला’ उद्रेकामुळे डब्ल्यूएचओवर वेगवेगळ्या स्तरांवर टीका झाली. या रोगाला थोपवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने तत्परता दाखवली नाही, असा आरोप केला जातो. यावर सद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इबोलाच्या उद्रेकानंतर जागतिक आरोग्य संघटनेवर खूप टीका झाली. ती २०१६ साली थांबली. जागतिक आरोग्य संघटना कशा प्रकारे काम करते, याची माहिती नसल्यामुळे अनेकांनी या संघटनेवर टीका केली,” असे सद्र म्हणाल्या.
हेही वाचा >>> विश्लेषण : यंदाची IPL फुकटात दाखवून Jio ला नेमका कसा फायदा होत आहे? जाणून घ्या
“जागतिक आरोग्य संघटनेकडून अवास्तव अपेक्षा करण्यात आल्या. या संघटनेने ‘इबोला’चा उद्रेक झालेल्या भागात जाऊन काम केले पाहिजे, असे अनेक जण म्हणाले. मात्र जागतिक आरोग्य संघटना तसे करू शकत नाही. या संघटनेचे काम एखाद्या रोगाच्या उच्चाटनासाठी मार्गदर्शन करणे हे आहे. त्या भागात प्रत्यक्ष जाऊन रोगाच्या उच्चाटनासाठी काम करणे, हे जागतिक आरोग्य संघटनेचे काम नाही,” असे सद्र यांनी सांगितले. ग्रॅडमॅन यांचेदेखील असेच मत आहे. जागतिक आरोग्य संघटना ही एक लोकशाही मूल्ये जोपासणारी संस्था आहे. पोलिसांप्रमाणे हस्तक्षेप करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे काम नाही, असे मत ग्रॅडमॅन यांनी व्यक्त केले. जागतिक आरोग्य संघटनेला आपल्या सदस्य राष्ट्राच्या संमतीशिवाय त्या देशात कोणतीही कारवाई करता येत नाही.
‘इबोला’ रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अनेक प्रयत्न केले. मात्र टीकेची झोड उठल्यानंतर या संघटनेने आपल्या कार्यप्रणालीमध्ये अनेक बदल केले. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यविषयक प्रचार विभागाचे संचालक रुडिगर क्रेच यांनी अधिक माहिती दिली आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: अंधत्वाचे प्रकार कोणते? स्क्रीनटाइमही अंधत्वाला कारणीभूत ठरू शकतो का?
२०१४ ते २०१६ या काळातील ‘इबोला’ उद्रेकानंतर जागतिक आरोग्य संघटनेने स्वत:मध्ये बरेच बदल केले आहेत. आता ही संघटना आरोग्यविषयक माहितीसाठी एखाद्या देशातील सरकारवर कमी अवलंबून आहे. आम्ही आता अनेक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांकडून मदत घेतो. एखाद्या देशातील सरकारने सांगण्याअगोदरच या कंपन्या आम्हाला रोगाच्या प्रसाराबाबत लवकर माहिती देऊ शकतात. तसेच आम्ही आता एएसए तसेच ‘नासा’सारख्या संस्थांची मदत घेतो. उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या प्रतिमांचाही आम्ही उपयोग करतो. यामुळे आम्हाला एखाद्या रोगाच्या प्रसाराविषयी लवकर माहिती मिळते,” असे रुडिगर क्रेच यांनी सांगितले.
हेही वाचा >>> विश्लेषण: उत्तर प्रदेशात भाजपकडून विरोधकांना शह? विधान परिषदेसाठी मुस्लीम सदस्य निवडीतून नवा संदेश?
मलेरिया निर्मूलनात अपयश
जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया रोगाच्या निर्मूलनाचा प्रयत्न केला. जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या समूळ उच्चाटनासाठी १९५५ साली मोहीम हाती घेतली. १५ देशांसह एका प्रांतामध्ये (Territory) ही मोहीम राबवली गेली. मात्र १९६० संघटनेने त्यासाठीचे प्रयत्न थांबवले. आफ्रिकेत या मोहिमेला यश मिळाले नाही. अनेक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात अपयश आले. परिणामी अनेक देशांत मलेरिया रोगाने पुन्हा डोके वर काढले. पुढे जागतिक आरोग्य संघटनेने १९६९ साली मलेरिया निर्मूलन मोहीम थांबवली. याबाबत ग्रॅडमॅन यांनी अधिक माहिती दिली आहे. “मलेरिया निर्मूलन मोहिमेमुळे जागतिक आरोग्य संघटनेवर दिवाळखोरीची वेळ आली. या संघटनेतील सदस्य राष्ट्रांचा विश्वास उडत होता. परिणामी सदस्य राष्ट्र संघटनेला दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये कपात करीत होते,” असे ग्रॅडमॅन यांनी सांगितले.
करोना महासाथीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेची कामगिरी
करोना महासाथीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र अनेक नेत्यांनी तसेच देशांनी या काळात जागतिक आरोग्य संघटनेवर टीकादेखील केली. यामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश होता. जागतिक आरोग्य संघटना करोना महासाथीविरोधात लढण्यासाठी सदस्य राष्ट्रांची समाधानकारक मदत करत नाही, असा आरोप तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
हेही वाचा >> विश्लेषण: नैसर्गिक आपत्तीमुळे अन्नसुरक्षा धोक्यात?
मात्र सद्र आणि ग्रॅडमॅन यांच्यासारख्या तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेची पाठराखण केली आहे. या तज्ज्ञांनुसार एखाद्या रोगाविरोधात लढण्यासाठी कारवाई करण्याचे तसेच उपक्रम राबवण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेचे नाही. करोना महासाथीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली. मात्र या महासाथीविरोधात लढण्याचे काम सदस्य राष्ट्रांनाच करायचे होते, असे मत सद्र यांनी व्यक्त केले. सांगितलेल्या शिफारशी लागू करण्याचे अधिकार जागतिक आरोग्य संघटनेकडे नाहीत. एक तर संघटनेचे सदस्य राष्ट्र शिफारशींची अंमलबजावणी करू शकतात किंवा त्या नाकारू शकतात, असेही सद्र यांनी पुढे सांगितले.