या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षी साजरा करण्यात येणाऱ्या वर्ल्ड हेरिटेज या दिवसाची थीम ‘वातावरणातील बदल व त्यामुळे सांस्कृतिक वारशात घडून येणारा बदल’ अशी आहे. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अनेक ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू, स्थळे नष्ट झाली आहेत. किंबहुना अनेक समुदाय आपली मूळची जागा सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. वातावरणात होणारे बदल हे तिथल्या स्थानिक संस्कृतीलाही घातक ठरत आहेत. निसर्ग, वातावरण यांनादेखील ‘हेरिटेज’ मानले जाते. एखाद्या विशिष्ट परिसंस्थेत (इकोसिस्टम) जन्माला आलेल्या सजिवांपासून ते तिथल्या दगड, मातीपर्यंत सर्व घटक आपले वेगळेपण निसर्गाला अनुसरून सिद्ध करत असतात. म्हणूनच त्या इकोसिस्टमला धरोहर किंवा पारंपरिक वारसा मानले जाते. त्याच विशिष्ट निसर्गात अनेक मानवी संस्कृती विकसित होत असतात. त्या संस्कृती त्या निसर्गाचा वारसा जपत मोठ्या होतात. पर्यायाने त्याही त्याच निसर्गाचा अविभाज्य भाग असतात. म्हणूनच या संस्कृतींमध्ये विकसित होणाऱ्या प्रथा-परंपरा त्या निसर्गाशी असलेला आपला संबंध आवर्जून दर्शवितात. युनेस्कोने भारतातील सात नैसर्गिक स्थळे वर्ल्ड हेरिटेज साईटस् म्हणून घोषित केली आहेत. त्यात १ जुलै २०१२ रोजी पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. आजच्या वर्ल्ड हेरिटेज दिवसाचे निमित्त साधून पश्चिम घाट या स्थळाविषयी जाणून घेऊ.

आणखी वाचा : विश्लेषण : World Heritage Day 2023: वातावरणातील बदल खरंच ‘सांस्कृतिक वारसा’ नष्ट करत आहेत का?

पश्चिम घाट हा भारताच्या सात राज्यांमध्ये विस्तारलेला आहे. यात महाराष्ट्र-गुजरात येथील पश्चिम भाग व समुद्रकिनारपट्टीपासून ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत ७९५३ वर्ग किलोमीटर पर्वत श्रृंखलेचा भाग समाविष्ट होतो. पश्चिम घाटाचे वय हे हिमालयापेक्षाही अधिक आहे. पश्चिम घाट हा आपल्या जैवविविधतेसाठी ओळखला जातो. ही पर्वतश्रृंखला आपल्या उष्ण काटिबंधातील सदाबहार वनांसाठी ओळखली जाते. अनेक दुर्मीळ जातीच्या वनस्पतींचा आढळ या वनांमध्ये होतो. जवळपास ३२५ नामशेष होत असलेल्या वनस्पती व प्राणी, पक्षी, उभयचर प्राणी यांचे घर पश्चिम घाटात आहे. इतकेच नव्हे तर ही सर्व सजीव सृष्टी भारतीय मान्सून प्रभावित करणारी आहे.

पश्चिम घाटाचे वैशिष्ट्य

पश्चिम घाट हे पक्षी, प्राणी, कीटक, मासे, उभयचर प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक दुर्मीळ तसेच स्थानिक प्रजातींचे घर आहे. पश्चिम घाटात फुलांच्या व वनस्पतींच्या ५००० पेक्षा जास्त प्रजाती, १३९ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, ५०८ पक्ष्यांच्या प्रजाती आणि १७९ उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत. पश्चिम घाटातील उत्तरेकडचा भाग हा स्थानिक उभयचर (सेसिलियन) आणि कास पठारावर आढळणाऱ्या विविध फुलांच्या अनेक प्रजातींसाठी ओळखला जातो. केरळमधील नीला कुरुंजी आणि महाराष्ट्रातील कारवी या फुलांचा देखावा पावसाळ्यात ठरावीक अंतराने पाहण्यासारखा असतो. (कारवी दर सात वर्षांनी फुलते). पश्चिम घाटात उगम पावणारे अनेक प्रवाह हे माशांच्या स्थानिक प्रजातींचे निवासस्थान आहेत. या घाटातील जंगलांचा हवामानावर स्थिर प्रभाव पडतो, ज्यामुळे पश्चिम उतारावर आणि पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो आणि पूर्वेकडील उतारावर मध्यम पाऊस पडतो. अगदी प्राचीन काळापासून पश्चिम किनारपट्टीवरील खाड्या व बंदरांना व्यापाराच्या दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे. त्यांना गाळमुक्त ठेवणे गरजेचे आहे. तरच किनारपट्टी व पर्यायाने घाटमाथ्यावर असलेल्या वनराईचे संरक्षण करण्यास मदत होईल. घाटमाथ्यावर असलेली वनराई व समुद्रकिनाऱ्यालगत असलेली खारफुटीची वने कार्बन उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नामांकन मिळालेल्या स्थळांच्या यादीत स्थळांच्या क्लस्टरमध्ये अगस्त्यमलाई, पेरियार, अनमलाई, निलगिरी, कोडागुमधील अप्पर कावेरी, कुद्रेमुख आणि सह्याद्रीचा लँडस्केप इत्यादींचा समावेश आहे.

या निसर्गसंपदेचे नेमके शत्रू कोण ?

पश्चिम घाटाला जागतिक वारसा हा दर्जा मिळाला तरी त्याचा घाटात अवैधरीत्या होणाऱ्या उत्खननावर विशेष काही परिणाम होईल असे वाटत नाही. अभ्यासकांच्या मते वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देत असताना पश्चिम घाटातील केवळ ३९ स्थळांनाच टॅग देण्यात आला आहे. काही स्थळे जाणीवपूर्वक वगळण्यात आली होती. गोव्यासारख्या राज्याला दुर्मीळ नैसर्गिक वारसा लाभलेला असूनही गोव्यातील एकाही स्थळाला संरक्षक टॅग देण्यात आलेला नाही. अवैध खनन व त्याला मिळालेला राजश्रय याला कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. युनेस्को दर वर्षी त्यांच्या सदस्य देशांनी नामांकन केलेल्या ‘उत्कृष्ट सार्वभौमिक मूल्यांच्या’ आधारे सांस्कृतिक किंवा प्राकृतिक स्थळाचे मूल्यमापन करून त्याला जागतिक वारशाचा दर्जा देते. अशा प्रकारे स्थळांना जागतिक संरक्षित स्थळांचा दर्जा देण्यात येतो.

आणखी वाचा : विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या

कसा मिळाला या घाटाला जागतिक वारशाचा दर्जा?

पश्चिम घाटाला जागतिक वारसा टॅग अनेक परिश्रमांनंतर मिळाला आहे. पश्चिम घाटातील ३९ स्थळांचा जागतिक वारसा म्हणून समावेश करण्याचा प्रस्ताव जागतिक वारसा समितीने २०११ मध्ये ३५ व्या बैठकीत फेटाळला होता. त्यानंतर २०१२ मध्ये परत एकदा त्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा विचारार्थ सादर केला असता तो फेटाळण्याच्या मार्गावर होता. त्या बैठकीत अहवालात सुधारणा करून त्यात बदल करण्यास भारतास सुचविण्यात आले. त्या वेळी माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटातील काही पर्यावरण संवेदनशील स्थळांची निवड केली होती. अनेक राज्यांतून या समितीला विरोध करण्यात आला होता. जागतिक वारसा हा दर्जा मिळणे म्हणजे त्या भागातील विकासाला पायबंद घालण्यासारखे असल्याचे सांगितले जात होते. परंतु सेंट पीटर्सबर्ग येथे भारतीय प्रतिनिधी मंडळाने जागतिक वारसा समितीला भारताच्या प्रस्तावाच्या गुणवत्तेबद्दल पटवून दिले. त्या वेळी अल्जेरिया, कंबोडिया, कोलंबिया, इथिओपिया, इराक, जपान, मलेशिया, माली, मेक्सिको, कतार, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि थायलंड या देशांचे प्रतिनिधीही भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते. त्यामुळे भारताच्या प्रस्तावाला बळकटी मिळाली होती व याच वर्षी भारताच्या पश्चिम घाटातील ३९ स्थळांना जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला.
बेल्जियममधील वालोनियाच्या प्रमुख खाणी, स्वीडनमधील हॅलसिंगलँडचे सुशोभित फार्महाऊस, ब्राझीलमधील पर्वत आणि समुद्र यांच्यातील कॅरिओका लँडस्केप्स, तुर्कीमधील Çatalhöyük चे नवाश्मयुगीन (निओलिथिक साइट) स्थळ, Ounianga तलाव, चाड, कॅमेरूनमधील संघा त्रिराष्ट्रीय, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, काँगो आणि चेंगजियांग जीवाश्म स्थळ (चीन) ही २०१२ मध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेली इतर स्थळे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World heritage day 2023 international day for monuments and sites climate action and its relation to cultural heritage western ghat svs
Show comments