World Malaria Day 23 April एक मच्छर .. यावरून सुरू होणारे अनेक संवाद आपण हिन्दी सिनेमात ऐकलेले आहेत. किंबहुना अशा प्रकारच्या संवादांना प्रेक्षकांकडून प्रसिद्धी व पसंतीही अधिक मिळते. मनोरंजनाची झालर वगळता या डासांनी गाजवलेला इतिहास दुर्लक्षित करून चालणार नाही. या डासांना काही इतिहास आहे का ? किंवा या डासांनीच मानवी इतिहासाला कलाटणी देण्याचे काम कसे केले? हे पाहणे आजच्या जागतिक मलेरिया दिनाच्या दिवशी रंजक आणि बोधप्रद ठरणारे आहे.
आणखी वाचा: विश्लेषण:Global Buddhist Summit 2023 चीन, भूराजकीय मुद्दे आणि ‘बौद्ध मुत्सद्देगिरी’!
मलेरियाचे प्राचीनत्त्व किती?
मलेरिया या रोगाला मराठीत हिवताप असे म्हटले जाते. दुर्दैवाने आजही या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या रोगावर आधुनिक जगात औषध उपलब्ध असले तरी या रोगाचे प्राचीनत्त्व इसवी सन पूर्व २७०० वर्षे इतके मागे जाते. हा रोग मेसोपोटेमिया, चीन, भारत यासारख्या देशांमध्ये इसवी सन पूर्व २७०० वर्षांपासून अस्तित्त्वात असल्याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत. ग्रीक अभ्यासक व तत्त्वज्ञ होमर, एम्पेडोकल्स ऑफ एग्रीजेंट, हिपोक्रॅटिस यांनी मेलेरियाचे संदर्भ आपल्या लिखाणात दिले आहेत. प्राचीन भारतीय वैद्यकतज्ज्ञ चरक- सुश्रुत हे देखील मलेरिया सदृश्य रोगाविषयी चर्चा करतात. प्राचीन ग्रीसमध्ये पाणथळीजवळ राहणाऱ्या लोकांना खराब हवामानामुळे हा रोग होतो असा समज होता. २५०० वर्षांहून अधिक काळापर्यंत मलेरियाचा ताप दलदलीतून निर्माण झालेल्या (miasmas) मायसमासमुळे-कुबट वासामुळे होतो अशीच धारणा सर्वसामान्य लोकांमध्ये होती. किंबहुना मलेरिया या शब्दाची उत्पत्ती ही इटालियन शब्द ‘माल एअर’ या शब्दांपासून झालेली आहे. माल एअर म्हणजे खराब हवा. जरी मलेरियाचे मूळ कारण माहीत नसले तरी प्राचीन जगात पाण्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असल्याची जाणीव होती.
हिवताप किंवा मलेरिया नक्की कशामुळे होतो?
मूलतः प्लॅस्मोडियम या परजीवी सूक्ष्मजीवामुळे मलेरिया हा रोग होतो. आणि डासांकडून त्याचा फैलाव केला जातो. १८ व्या शतकापर्यंत या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूदराचे प्रमाण अधिक होते. १८९७ साली डासच या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असल्याचे निरीक्षण सर रोनॉल्ड रॉस यांनी सर्वप्रथम मांडले. त्यांच्या मलेरियाविषयक संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देवून गौरविण्यात आले होते. विशेष म्हणजे रॉस यांनी या विषयातील संशोधन बराच काळ भारतात बंगाल व बंगलोर येथे असताना केले होते. याशिवाय ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली या संशोधकानी मलेरियाच्या संशोधनात लावलेला हातभार मोलाचा आहे.
आणखी वाचा: विश्लेषण: पंतप्रधान मोदी यांनी भारताला लोकशाहीची जन्मभूमी का म्हटले? संदर्भ नेमका काय आहे?
मलेरियासाठी कारणीभूत कोण?
मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या व्हायव्हॅक्स, ओव्हल व फाल्सिफेरम या प्लाझमोडियम परजीवीच्या प्रमुख जाती आहेत. प्रामुख्याने हिवतापाचा प्रसार ॲनॉफेलीस वर्गीय डासांकडून होतो. डासांनी दंश केल्यावर हा परजीवी बीजरूपात मानवी शरीरात प्रवेश करतो व पुढील दोन आठवड्यात त्यांची वाढ यकृतात होते. मलेरिया होवून मृत्यू होणे यासाठी व्यक्तीसापेक्ष प्रतिकारशक्ती कमजोर असणे हेही मुख्य कारण मानले जाते. या रोगाच्या फैलावासाठी कारणीभूत असलेल्या डासांच्या वाढीवर प्रतिबंध घालणे हाच योग्य उपाय मानला जातो.
आणखी वाचा: विश्लेषण: Same-sex relationship: समलिंगी संकल्पना भारतासाठी नवीन आहे का ?
मलेरिया इतिहासाला आकार देण्यासाठी खरंच कारणीभूत आहे का?
मलेरियाने गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासाला आकार देण्याचे काम केले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जगाच्या इतिहासात अनेक मोठ्या राजांचा, नेत्यांचा बळी याच मलेरियाने घेतला व राष्ट्रांच्या चढ-उतारांसाठी मलेरिया हे कारण ठरले. किंबहुना अनेकदा राजकीय संघर्षापेक्षा अनेकजण मृत्युमुखी पडल्याचे लक्षात येते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात दोन्हीकडच्या अनेक सैनिकांना मलेरियाच्या प्रादुर्भावमुळे प्राण गमवावे लागले होते. १९१० साली, लंडनच्या रॉयल आर्मी मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक कर्नल सी.एच. मेलविले यांनी रोनाल्ड रॉस यांच्या ‘द प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया’ या पुस्तकात युद्धातील मलेरिया प्रतिबंध या विषयावर एक अध्याय लिहिला आहे. “युद्धातील मलेरियाचा इतिहास हा युद्धाचाच इतिहास मानला जाऊ शकतो.” असे त्यांनी नमूद केले आहे. किंबहुना मलेरिया हे एक युद्धच असल्याचे ते अधोरेखित करतात. अशा स्वरूपाच्या युद्धासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्याला कार्यकारी आणि शिस्तबद्ध अधिकारांसह मलेरिया प्रतिबंधक ऑपरेशन्सचा प्रभारी नियुक्त करण्यात यावा असेही ते सुचवितात. दोन्ही महायुद्धांच्या दरम्यान सिन्कोना झाडाची साल आणि क्विनाइन यांचा वापर मलेरियावर औषध म्हणून करण्यात येत होता. या औषधांच्या साठ्यासाठी केलेले प्रयत्न हे मलेरियाची युद्धातील तीव्रता दर्शवितात. किंबहुना त्यावेळी वास्तविक युद्धापेक्षा मलेरियाविरोधी प्रतिबंधावर अधिक खर्च करण्यात आला होता.
जगाचा इतिहास बदलू पाहणाऱ्या अलेक्झांडर द ग्रेट याचे भविष्य मलेरियाने कसे बदलले?
इसवी सन पूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेट या मॅसेडोनियन सेनापतीने पूर्व भूमध्य, सीरिया, फोनिशिया, अरेबिया आणि इजिप्तचा संपूर्ण किनारा काबीज करून पर्शियन लोकांवर विजय मिळवत भारतात येवून पोहचला होता. त्याच वेळी तो यशाच्या शिखरावर असताना त्याला मलेरियाने ग्रासले होते. त्याचीच परिणती अलेक्झांडर कोमात जाऊन त्याचा मृत्यू झाला. अलेक्झांडरच्या मृत्यूमुळे इतिहासाची दिशाच बदलली गेल्याचे अभ्यासक मानतात. जर तो जिवंत असता तर इतिहास नेमका काय असता हे विचार करायला लावणारे आहे. युरोप व आशिया हे दोन्ही भाग पादाक्रांत करणाऱ्या अलेक्झांडर द ग्रेट याचा शेवट मात्र डासांनी केला हे सत्य आहे.
इतिहासातून बोध
म्हणूनच प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. घरात किंवा घराच्या आजूबाजूला कुठे ही पाण्याचा साठा असेल तेथे नियमित स्वच्छता राखली जाणे आवश्यक आहे. निष्काळजीपणा हा आपल्या नाशाचे कारण ठरू शकतो. हे इतिहासाने सिद्ध केले आहे. इतिहासातून बोध हेच शहणपणाचे लक्षण आहे.
आणखी वाचा: विश्लेषण:Global Buddhist Summit 2023 चीन, भूराजकीय मुद्दे आणि ‘बौद्ध मुत्सद्देगिरी’!
आणखी वाचा: विश्लेषण: Same-sex relationship: समलिंगी संकल्पना भारतासाठी नवीन आहे का ?