झाडांचे, निसर्गाचे महत्त्व आता वेगळे सांगायला नको. माणसाला ते पटले आहे. लोक ‘बॅक टू बेसिक्स’कडे निघाले आहेत, निसर्गाच्या जवळ जाऊन राहणे पसंत करू लागले आहेत. निसर्गातल्या कुतूहलांविषयी माणसाला कायम अप्रूप राहिले आहे. म्हणूनच तर जगातली आश्चर्ये निर्माण झाली. असेच एक आश्चर्य आहे एक झाड. हे झाड तब्बल नऊ हजार वर्षांहूनही अधिक जुने आहे आणि ते अजूनही जिवंत आहे. हजारो पावसाळे, गोठवणारा बर्फ, वादळे, वणवे झेलूनही ते इतकी वर्षे कसे टिकले… जाणून घेऊ.

कुठे आहे हा अतिप्राचीन वृक्ष?

स्वीडनच्या डालर्ना प्रांतात हे झाड उभे आहे. उभ्या सुळक्यासारख्या दिसणाऱ्या या झाडाची उंची मात्र फार कमी आहे. ते अवघे पाच मीटर म्हणजे साधारण १६ फूट उंच आहे. डलर्ना प्रांतातील फुलुफजेलेट डोंगरावर ते आहे. या झाडाची मुळे साधारणपणे ९,५६७ वर्षे जुनी आहेत. परिणामी या झाडाचा समावेश जगातल्या प्राचीन वृक्षांमध्ये करण्यात आला.

या झाडाचा शोध कोणी लावला?

प्रा. लिफ कुलमन आणि त्यांची पत्नी लिसा ओबर्स या जोडप्याने या झाडाचा शोध लावला. लिफ हे उमिया विद्यापीठात भौतिक भूगोलाचे प्राध्यापक आहेत तर लिसा ओबर्ग वृक्षतज्ज्ञ आहेत. त्यांनी मिड स्वीडन विद्यापीठातून जैव आणि पर्यावरणशास्त्रात पीएचडी केली आहे. या दाम्पत्याच्या श्वानाच्या ‘ओल्ड त्जिक्को’ च्या नावावरूनच या झाडाला हे नाव देण्यात आले. २००४ मध्ये, लीफ कुलमन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी झाडाचे वय निर्धारित करण्यासाठी कार्बन डेटिंगचा वापर केला, ज्यामुळे त्याचे प्राचीन आणि निरंतर अस्तित्व सिद्ध झाले.

हे झाड इतकी वर्षे जिवंत कसे?

वादळी वाऱ्यांसह आलेला पाऊस, पूर, त्सुनामीमध्ये भल्याभल्या वृक्षराजी मुळासकट उन्मळून पडतात. मग हे झाड हजारो वर्षे कसे टिकले असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. हे झाड क्लोन प्रक्रियेतील आहे. म्हणजे जे आता डोळ्यांना दिसते ते झाड तरुण आहे. पण त्याची मुळे हजारो वर्षांची आहेत. क्लोनिंग म्हणजे नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतीने समान जीनोम असलेले वैयक्तिक जीव निर्माण करण्याची प्रक्रिया. निसर्गात, काही जीव अलैंगिक पुनरुत्पादनाद्वारे आपल्यासारखेच दुसरे जीव तयार करू शकतात. असे पुनरुत्पादन पार्थेनोजेनेसिस म्हणून ओळखले जाते. जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, क्लोनिंग म्हणजे पेशी आणि डीएनए तुकड्यांचे क्लोन केलेले जीव तयार करण्याची प्रक्रिया. या झाडात जुन्या खोडामधूनच नवे खोड तयार होत गेल्याने हे झाड इतकी वर्षे आहे तिथे तग धरून आहे.

पर्यावरणीय इतिहासाचा जिवंत दस्तावेज

या झाडाने कित्येक पर्यावरणीय बदल पाहिले आहेत. अनेक हिमयुगे आणि तापमानवाढीचा काळ सहन केला आहे, ज्यामुळे हे झाड हजारो वर्षांच्या पृथ्वीच्या पर्यावरणीय इतिहासाचा जिवंत दस्तावेज बनले आहे. त्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी ते अर्थातच जतन केले जाईल कारण ते एक नैसर्गिक आश्चर्य आहे. याच झाडासारखा २० झाडांचा समूह संशोधकांना याच भागात आढळला आहे. ही झाडे साधारण आठ हजार वर्षांपूर्वीची म्हणजे ओल्ड त्जिक्कोपेक्षा तरुण आहेत.

जगात आणखी अशी किती झाडे?

ओल्ड त्जिक्कोसारखी इतरही काही प्राचीन झाडे जगभरात आहेत. साधारण साडेतीन ते पाच हजार वर्षे वयाची काही झाडे जगभरात आढळलेली आहेत. पण त्यापैकी खूप कमी आता जिवंत आहेत. अमेरिकेत काही जुन्या प्रजातींवर संशोधन झाले आहे. जुरुपा ओक ही झाडे कॅलिफोर्नियातील जुरुपा डोंगरावर आढळतात. पाल्मर ओक प्रजातीतील या झाडांची एक कॉलनीच आहे. १९९० मध्ये या झाडांचा शोध लागला. ही कॉलनी साधारणपणे १३ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. अमेरिकेतीलच पांडो प्रकारची झाडेही प्राचीन आहेत. ही क्वेकिंग अस्पेन प्रकारातील ही झाडे अमेरिकेतील ४० आश्चर्यांमध्ये गणली जातात. ही साधारणपणे ८० हजार वर्षे जुनी आहेत. ही देखील कॉलनीमध्ये वाढतात. एकाच ठरावीक क्षेत्रात त्यांची वाढ होते. जमिनीखाली त्यांच्या मुळांची एक विशिष्ट रचना असते. एखादे झाड मेले तर त्याजागी मुळे तसेच नवे झाड तयार करतात. पण गेल्या ३०-४० वर्षांत येथे एकही नवे झाड आलेले नाही, हेही विशेष.

Story img Loader