पृथ्वीवर कधी काय होईल काही सांगता येत नाही. अनेकवेळा संशोधकांना असे काही शोध लागतात ज्यामुळे विज्ञानजगतात आश्चर्य व्यक्त केले जाते. याच शोधांच्या बळावर आज मानव प्रगतीपथावर आहे. मात्र याच पृथ्वीने आपल्या स्वत:त काही बदल करून घेतला तर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येते. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. याआधी अंटार्क्टिका समुद्राचा भाग असलेला एक महाकाय हिमखंड आपल्या जागेवरून सरकला आहे. या घटनेमुळे भविष्यात नेमके काय होणार? हा हिमखंड असाच स्वत:च्या जागेवरून सरकत राहिला तर काय परिणाम घडणार ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर या हिमखंडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० वर्षांनंतर जागेवरून सरकला हिमखंड

स्वत:च्या जागेवरून सरकलेल्या या महाकाय हिमखंडाचे नाव ‘A23a’असे आहे. गेल्या तीस वर्षांपासून तो समुद्राच्या तळात फसला होता. आता मात्र तब्बल ३० वर्षांनंतर या हिमखंडाने आपली जागा बदलली आहे. हा हिमखंड जगातील सर्वांत मोठा हिमखंड आहे. सांगायचेच झाले तर हा हिमखंड ब्रिटनमधील ग्रेटर लंडन या प्रदेशाच्या आकाराच्या दुप्पट आहे. ग्रेडर लंडन या प्रदेशाचे आकारमान ४ हजार स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हमजेच A23a हा हिमखंड आकाराने तब्बल ८ हजार स्क्वेअर किलोमीटरपेक्षाही मोठा आहे. याआधी हा हिमखंड १९८६ साली अंटार्क्टिका समुद्रकिनाऱ्यापासून विलग झाला होता. त्यानंतर तो वेडेल समुद्रात अडकला होता. आता मात्र साधारण ३० वर्षांनंतर हा हिमखंड पुन्हा एकदा आपल्या जागेवरून सरकतोय.

सर्वप्रथम १९८६ साली हीमखंड सरकला

A23a हा हिमखंड १९८६ साली अंटार्क्टिका समुद्राच्या फिल्चनर आइस शेल्फ या भागातून विलग झाला होता. या हिमखंडावर रशियाचे ‘ड्रुझनाया’ (Druzhnaya)नावाचे एक अटार्क्टिक संशोधन केंद्र होते. हिमखंड विलग झाल्यामुळे या संशोधन केंद्रातील सर्व उपकरणे नष्ट होतील, पाण्यात बुडतील अशी भीती रशियाला वाटत होती. त्यामुळे रशियाने ही उपकरणे परत मिळवण्यासाठी एक शोधमोहीम राबवली होती.

आता पुन्हा एकदा A23a जागेवरून सरकतोय

जगातील सर्वांत मोठा A23a हा हिमखंड आता आपल्या जागेवरून पुन्हा एकदा सरकत आहे. याबाबत ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेचे रिमोट सेन्सिंग तज्ज्ञ डॉ. अँड्र्यू फ्लेमिंग यांनी ‘बीबीसी’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सविस्तर माहिती दिली आहे. “A23a सोबत घडत असलेल्या घटनांबाबत मी माझ्या अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली. A23a आपल्या जागेवरून का सरकत आहे? याबाबत मी त्यांना विचारले. तसेच हिमखंड आणि समुद्रातील पाण्याच्या तापमानात होत असलेल्या बदलामुळेच हा हिमखंड सरकत आहे का? असेदेखील मी माझ्या सहकाऱ्यांना विचारले. हा हिमखंड याआधी १९८६ साली आपल्या जागेवरून सरकला आहेत. आता पुन्हा एकदा हा हिमखंड आपल्या जागेवरून सरकत आहे. २०२० साली या हिमखंडाने हालचाल केली होती,” असे अँड्र्यू फ्लेमिंग म्हणाले.

आता पुढे काय?

गेल्या काही दिवसांपासून वाहणारे वारे आणि पाण्याचा प्रवाह यामुळे हा हिमखंड आपल्या जागेवरून सरकत आहे. हा हिमखंड अशाच प्रकारे आपल्या जागेवरून सरकत राहिल्यास भविष्यात तो दक्षिण अटलांटिक महासागराच्या दिशेने जाईल. ज्यामुळे दक्षिण जॉर्जिया बेट संकटात येऊ शकतो. या बेटावर अब्जावधी सील, पेंग्विंन तसेच पक्षांचा अधिवास आहे. A23a हिमखंड दक्षिण अटलांटिक समुद्राकडे सरकल्यास या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. थोडक्यात A23a या हिमखंडामुळे भविष्यात दक्षिण जॉर्जिया बेटावरील प्राण्यांना खाद्य मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सध्यातरी शास्त्रज्ञ या हिमखंडावर नजर ठेवून आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds biggest iceberg a23a moved from its position know detail information prd
Show comments