जगातील सर्वांत मोठा हिमखंड एका दुर्गम ब्रिटिश बेटावर आदळण्याच्या मार्गावर आहे; ज्यामुळे पेंग्विन आणि सील यांना संभाव्य धोका निर्माण झाला आहे. ‘A23a’ नावाचा हिमखंड अंटार्क्टिकापासून उत्तरेकडे दक्षिण जॉर्जियाच्या दिशेने सरकत आहे. हा दक्षिण अटलांटिक महासागरात स्थित ब्रिटिश ओव्हरसीज प्रदेश आहे. ‘A23a’ ला १९८० पासून अनेकदा सर्वांत मोठ्या हिमखंडाचा दर्जा देण्यात आला आहे. २०१७ मध्ये ‘A68’ आणि २०२१ मध्ये ‘A76’ सारख्या हिमखंडांना हा दर्जा देण्यात आला होता. हा हिमखंड दक्षिण जॉर्जिया बेटावर धडकणार का? याचे परिणाम किती विध्वंसक? जाणून घेऊ.
हिमखंड दक्षिण जॉर्जिया बेटावर धडकणार का?
जगभरात शास्त्रज्ञ आणि मच्छीमार भव्य-दिव्य अशा हिमखंड ‘A23a’च्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपग्रह प्रतिमांचे बारकाईने निरीक्षण करीत आहेत. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणविषयक भौतिक समुद्री शास्त्रज्ञ अँड्र्यू मेइजर्स यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, “सध्या तो प्रवाहात आहे आणि थेट बेटाच्या दिशेने जात नाही. परंतु, त्याच्या प्रवाहांबद्दलचा आमचा समज असे सूचित करतो की, हा हिमखंड लवकरच पुन्हा बेटाकडे जाण्याची शक्यता आहे.” सी. कॅप्टन सायमन वॉलेस दक्षिण जॉर्जिया सरकारच्या जहाज फॅरोसमधून ‘बीबीसी’शी बोलताना म्हणाले, “हिमखंड हे नैसर्गिकरीत्या धोकादायक आहेत. जर हिमखंडाविषयीचा अंदाज चुकला, तर आम्हाला विलक्षण आनंद होईल.” यूएस नॅशनल आइस सेंटरने या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या मोजमापांनी पुष्टी केल्यानुसार, हा हिमखंड जगातील सर्वांत मोठा हिमखंड आहे.
हेही वाचा : आई-वडिलांचा घटस्फोट मुलांसाठी ठरतोय जीवघेणा? कारण काय? नवीन संशोधन काय सांगते?
ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणाने नोंदवले की, ‘A23a’ दक्षिण जॉर्जियामध्ये पोहोचल्यावर तुटून वितळेल. परंतु, मेइजर्सने सांगितले की, उपग्रह प्रतिमेनुसार हा हिमखंड अजूनही अखंड आहे. याचाच अर्थ असा की, पूर्वीच्या ‘मेगाबर्ग’सारखा तो अजून लहान तुकड्यांमध्ये विघटित झालेला नाही. हिमखंड कोणत्या दिशेने जातो, त्यावर भविष्यातील गोष्टी अवलंबून आहेत. हिमखंड दक्षिण अटलांटिकमध्ये जातो की, महाद्वीपीय शेल्फवर अडकून राहू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“असे झाल्यास वन्यजीव मुख्यतः सील व पेंग्विन, जे या बेटावर प्रजनन करतात त्यांच्या आहाराच्या भागात प्रवेश केल्याने गंभीरपणे अडथळा आणू शकतात,” असे मीजर्स यांनी नमूद केले. दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण सँडविच बेटांच्या सरकारचे मत्स्यपालन आणि पर्यावरण संचालक मार्क बेल्चियर यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की ते हिमखंडाच्या मार्गावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. “हिमखंड दक्षिण जॉर्जियामध्ये सामान्य असले तरी ते या प्रदेशात शिपिंग आणि मासेमारी जहाजांसाठी समस्या निर्माण करू शकतात,” असे ते पुढे म्हणाले.
हिमखंडाची टक्कर झाल्यास वन्यजीवांवर कसा परिणाम होऊ शकतो?
हिमखंड ‘A23a’ अंटार्क्टिकापासून उत्तरेकडे फिरत आहे आणि दक्षिण जॉर्जियाच्या दिशेने जात आहे. हा एक दुर्गम ब्रिटिश प्रदेश आहे, जो खडबडीत भूभाग आणि विविध वन्यजीवांसाठी ओळखला जातो. सध्या हिमखंड बेटापासून सुमारे १७३ मैल (२८० किलोमीटर) अंतरावर आहे. हा हिमखंड जमिनीवर आदळून फुटू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भूतकाळात दक्षिण जॉर्जियाजवळ ग्राउंडिंग असलेल्या विशाल हिमखंडांमुळे विनाशकारी परिणाम घडले होते. याच्या परिणामस्वरूपी असंख्य पक्षी आणि सील बर्फाळ खाडी आणि समुद्रकिनाऱ्यांवरील खाद्य भागात प्रवेश करू शकत नसल्यामुळे मरत होते.
दक्षिण जॉर्जिया हे किंग पेंग्विन आणि लाखो हत्ती व फर सीलच्या महत्त्वाच्या वसाहतींचे घर आहे; ज्यामुळे हा एक महत्त्वाचा वन्यजीव अधिवास ठरतो. “दक्षिण जॉर्जिया हे हिमनगाच्या भागात वसले आहे. त्यामुळे मत्स्यपालन आणि वन्यजीव या दोघांवरही परिणाम अपेक्षित आहेत आणि दोघांमध्येही परिस्थितीशी जुळवून घेण्याची मोठी क्षमता आहे,” असे दक्षिण जॉर्जिया सरकारला सल्ला देणारे सागरी पर्यावरणशास्त्रज्ञ मार्क बेल्चियर यांनी ‘बीबीसी’ला सांगितले. ‘A23a’ ची निर्मिती हवामान बदलाशी जोडलेली नाही. कारण- ते दशकांपूर्वी वाहून गेले होते. वाढत्या महासागर आणि हवेच्या तापमानामुळे अंटार्क्टिका अधिकाधिक अस्थिर होत असल्याने, त्याच्या बर्फाचे मोठे भाग वारंवार तुटण्याची शक्यता वाढत आहे.
हिमखंड वितळण्याचा महासागरांवर कसा परिणाम होऊ शकतो?
जसजसे हिमखंड वितळतात तसतसे ते समुद्राच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल करून आसपासच्या पाण्यात विविध घटक सोडतात. ‘बीबीसी’च्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया खोल महासागरातील कार्बनच्या संचयनाचा विस्तार करू शकते; ज्यामुळे हवामानातील बदल घडवून आणणारे काही कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन होऊ शकते. परंतु, ‘A23a’ च्या पुढील हालचालींबद्दल कोणीही खात्री बाळगू शकत नाही.
ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षण हिमनदीशास्त्रज्ञ ऑलिव्हर मार्श यांनी नमूद केले की, एवढा मोठा हिमखंड गतीने पाहणे दुर्मीळ आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ त्याच्या मार्गावर बारकाईने लक्ष ठेवतील. दक्षिण जॉर्जिया बेटाजवळ ‘A23a’ ग्राऊंड होण्याची शक्यता आधीपासूनच होती. त्यामुळे या प्रदेशाच्या परिसंस्थेची चिंता वाढली. कारण- लाखो सील, पेंग्विन आणि समुद्री पक्षी या बेटावर प्रजनन करतात आणि अन्नासाठी आसपासच्या पाण्यावर अवलंबून असतात, असे वृत्त रॉयटर्सने दिले. जर A23a या क्षेत्रात स्वतःला ग्राऊंड केले, तर त्यामुळे त्याच्या खाद्य मार्गात व्यत्यय येऊ शकतो.तसेच स्थानिक पर्यावरणासाठी त्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो.
A23a – जगातील सर्वांत मोठा हिमखंड
A23a सुमारे ४,००० चौरस किलोमीटर व्यापलेला एक प्रचंड हिमखंड आहे. A23a हा हिमखंड १९८६ साली अंटार्क्टिका समुद्राच्या फिल्चनर आइस शेल्फ या भागातून विलग झाला होता. या हिमखंडावर रशियाचे ‘ड्रुझनाया’ (Druzhnaya) नावाचे एक अटार्क्टिक संशोधन केंद्र होते. हिमखंड विलग झाल्यामुळे या संशोधन केंद्रातील सर्व उपकरणे नष्ट होतील, पाण्यात बुडतील अशी भीती रशियाला वाटत होती. त्यामुळे रशियाने ही उपकरणे परत मिळविण्यासाठी एक शोधमोहीम राबवली होती.
हेही वाचा : ‘FIIT-JEE’ची शिकवणी केंद्रे अचानक बंद; हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम अन् पालकांचे लाखोंचे नुकसान, प्रकरण काय?
A68a – पूर्वी जगातील सर्वांत मोठा हिमखंड
A23a पूर्वी जगातील सर्वांत मोठ्या हिमखंडाचे शीर्षक A68a होते, जे लंडनच्या आकाराच्या तिप्पट होते आणि त्याचे वजन अंदाजे एक ट्रिलियन टन होते. ते दक्षिण जॉर्जिया बेटाच्या मार्गावर होते; ज्यामुळे समुद्रातील तळ आणि सागरी परिसंस्था उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, दी इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार, A68a पूर्णपणे वितळण्यापूर्वी बेटापासून सुमारे १०० मैलांवर थांबले.