२०१२ साली जन्मलेल्या सुबोर्नो बारीचे नाव गेल्या अनेक वर्षांपासून वृत्त वाहिन्यांमध्ये झळकत आहे. सुबोर्नो बारी चार वर्षांचा होता तेव्हापासूनच त्याने आपल्या कामगिरीने लोकांना आश्चर्यचकीत करण्यास सुरुवात केली. सातव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भाषणे देण्यास सुरुवात केली. आता सुबोर्नो बारी पुन्हा एकदा इतिहास रचण्यास सज्ज झाला आहे. लाँग आयलँड हायस्कूलमधून सर्वात लहान वयात पदवीधर होणारा तो जगातील पहिला मुलगा असेल. त्याचे वय केवळ १२ वर्षे आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, सुबोर्नो बारी २६ जून रोजी मॅल्व्हर्न हायस्कूलमधून डिप्लोमा प्राप्त करेल. कोण आहे सुबोर्नो इसाक बारी? जाणून घेऊ या.
सुबोर्नो बारी कोण आहे?
सुबोर्नो इसाक बारी मूळ अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील लिनब्रुकचा रहिवासी आहे. सुबोर्नोने आपल्या यशाबद्दल फेसबुक पोस्टमध्ये आपल्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुबोर्नो बारी याने लिहिले, “वयाच्या १२व्या वर्षी, मी मॅल्व्हर्न हायस्कूलमध्ये १२वीत शिकत आहे. पुढच्या महिन्यात मी पदवी संपादन करेन. आज त्यासाठी आमचा सराव घेण्यात आला. मी पहिला अमेरिकन (भारतीय उपखंडातील) आहे, जो १२ वर्षांचा असताना हायस्कूलमधून पदवीधर होणार आहे.”
हेही वाचा : ‘नीट’साठी परीक्षा केंद्र कसं निवडलं जातं? परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी काय उपाययोजना केल्या जातात?
सुबोर्नो चार वर्षांचा असताना त्याने विज्ञान आणि गणितात केलेल्या कामगिरीबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याची प्रशंसा केली होती. सुबोर्नो नऊ वर्षांचा असताना, हार्वर्ड विद्यापीठाने गणिते सोडवण्याची त्याची क्षमता ओळखली आणि न्यूयॉर्क शहरातील प्रतिभावान शाळेत त्याला प्रवेश दिला.
तो स्टोनी ब्रूक विद्यापीठाचा विद्यार्थीही होता. त्याने वयाच्या सातव्या वर्षी ‘द लव्ह’ या शीर्षकासह दोन पुस्तके लिहिली आहेत. त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे त्याला इयत्ता चौथीतून इयत्ता आठवीत आणि नंतर इयत्ता नववीतून इयत्ता बारावीत प्रवेश मिळाला. तो त्याच्या वर्गातील समवयस्कांपेक्षा लहान आहे, परंतु सुबोर्नो सांगतो की, असे असूनही त्याला बहुतेक विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा पाठिंबा मिळतो. त्याला रसायनशास्त्र शिकविणारे शिक्षक पॅट्रिक नोलन सुबोर्नोचे वर्णन ‘अद्वितीय’ असे करतात.
‘ABC7’नुसार, वयाच्या ११ व्या वर्षी त्याने स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट (सॅट)मध्ये १५०० गुण मिळवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, त्यावेळी जगभर त्याच्या नावाची चर्चा होती. जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी सॅट ही परीक्षा घेतली जाते. जगातील सर्वात तरुण प्राध्यापक म्हणून ओळखल्या जाणार्या सुबोर्नो बारीला मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्राचे अतिथी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
हेही वाचा : नेट परीक्षा नेमकी असते कशासाठी? काय विचारलं जातं आणि या परीक्षेला एवढी मागणी का? जाणून घ्या…
गणित आणि भौतिकशास्त्रातील त्याच्या कामगिरीमुळे त्याला न्यूयॉर्क विद्यापीठात अभ्यास करण्यासाठी पूर्ण शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. एक चांगला प्राध्यापक होऊन लोकांना गणित आणि विज्ञान शिकवणे आणि त्यांना मदत करणे हे सुबोर्नोचे ध्येय आहे. सुबोर्नो याला वयाच्या १४ व्या वर्षी पदवी प्राप्त करायची आहे, तर वयाच्या १८ व्या वर्षी डॉक्टरेट ही पदवी प्राप्त करायची आहे.