पृथ्वीवरून अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत आणि अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, आता शास्त्रज्ञांनी केलेल्या धक्कादायक खुलाशाने जगभरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात Y गुणसूत्र (क्रोमोझोम) नामशेष होण्यासंदर्भात प्रकाश टाकण्यात आला आहे. पुरुष म्हणून लिंग (जेंडर) निश्चित करण्यासाठी Y गुणसूत्र महत्त्वाची भूमिका बजावते. हे गुणसूत्र आता नामशेष होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे जगात केवळ मुलींचाच जन्म होण्याची शक्यता वाढली असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
पीअर रिव्ह्यू जर्नल ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या २०२२ च्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. Y गुणसूत्र कसे सक्रिय होते? हे गुणसूत्र नामशेष का होत आहे? Y गुणसूत्र नामशेष झाल्यास पुरुष प्रजाती कायमची नष्ट होणार का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : पॅरासिटामॉलसह १५६ धोकादायक औषधांवर केंद्र सरकारची बंदी; ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे म्हणजे काय?
Y गुणसूत्र काय आहे?
मानवासह बहुतेक सस्तन प्राण्यांमधील माद्यांमध्ये XX गुणसूत्रे असतात; तर पुरुषांमध्ये एक X व एक Y गुणसूत्र असते. Y गुणसूत्रात सर्वांत महत्त्वाचे असे SRY जनुक असते. हे जनुक अर्भकामधील पुरुषी वैशिष्ट्यांच्या विकासास चालना देते. गर्भधारणेच्या सुमारे १२ आठवड्यांनंतर SRY जनुक इतर जनुकांमध्ये बदलते. त्यामुळे पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरॉन तयार होतात, ज्याने बाळाचा पुरुष म्हणून विकास होतो. SRY जनुकाचा शोध १९९० मध्ये लागला होता आणि SRY जनुक SOX9 जनुकाला उत्तेजित करीत असल्याचे आढळून आले होते. SOX9 जनुकदेखील लिंग निर्धारित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. SOX9 लैंगिक गुणसूत्रांवर राहत नाही; परंतु ते SRY जनुकाद्वारे सक्रिय होते. त्यामुळे ते पुरुषी शरीराच्या विकासासाठी आवश्यक ठरते.
Y गुणसूत्र नाहीसे होण्याचे कारण काय?
मानव आणि प्लॅटिपस वेगळे झाल्यापासून १६६ दशलक्ष वर्षांमध्ये Y गुणसूत्राच्या सक्रिय जनुकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. ही संख्या ९०० वरून ५५ पर्यंत खाली घसरली आहे. दर दशलक्ष वर्षांमध्ये सुमारे पाच जनुके नष्ट होत आहेत. हा कल असाच सुरू राहिल्यास, Y गुणसूत्र पुढील ११ दशलक्ष वर्षांत पूर्णपणे नाहीसे होऊ शकते. X गुणसूत्रामध्ये बहुविध कार्यांसह अंदाजे ९०० जनुके असतात; तर Y गुणसूत्रामध्ये अंदाजे ५५ जनुके असतात आणि त्यापैकी फक्त २७ जनुके पुरुषी शरीराच्या विकासात योगदान देतात. बहुतेक Y गुणसूत्रे पुनरावृत्ती ‘जंक डीएनए’पासून तयार झालेली असतात. “अशा अस्थिर रचनेमुळे अनेक पिढ्यांमध्ये Y गुणसूत्र पूर्णपणे नाहीसे होण्याचा धोका वाढला आहे,” असे ‘द वीक’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
अगदी सुरुवातीला ‘प्रोटो-Y’ गुणसूत्र मुळात X गुणसूत्राच्या आकारासारखेच होते आणि त्यात सर्व समान जनुके होती. परंतु, महिलांकडे XX अशी दोन समान गुणसूत्रे आहेत; तर पुरुषांकडे एक्स व Y अशी दोन वेगवेगळी गुणसूत्रे आहेत. त्यामुळे त्यांच्यात आनुवंशिक पुनर्संयोजन शक्य नाही. आनुवंशिक पुनर्संयोजन म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये होणारा जनुकांचा फेरबदल आहे; जो हानिकारक जनुक उत्परिवर्तन दूर करण्यास मदत करतो, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. Y गुणसूत्रे झपाट्याने नष्ट होत आहेत. मादीमध्ये दोन पूर्णपणे सामान्य X प्रकारची गुणसूत्रे आहेत; परंतु पुरुषांमध्ये एक X व एक Y गुणसूत्र आहे, असे संशोधनाच्या अहवालात म्हटले आहे.
जेनेटिक्समधील तज्ज्ञ प्राध्यापक जेनी ग्रेव्हज स्पष्ट करतात की, Y गुणसूत्राचा आकार कमी होणे ही नवीन घटना नाही. त्यांनी नमूद केले की, प्लॅटिपसमध्ये, XY गुणसूत्राची जोडी समान सदस्यांसह सामान्य गुणसूत्रांसारखी दिसते. “यावरून असे लक्षात येते की, सस्तन प्राण्यांमध्ये X व Y या गुणसूत्रांची सामान्य जोडी फार पूर्वी नव्हती,” असे ग्रेव्ह्स यांनी नमूद केले. युरोप आणि जपान या देशांतील उंदरांच्या दोन प्रजातींमध्ये Y गुणसूत्र आधीच नष्ट झाले होते. या प्रजातींमध्ये X गुणसूत्र नर आणि मादी दोघांमध्ये आहेत; परंतु Y गुणसूत्र आणि SRY जनुक नाहीसे झाले आहे. होक्काइडो विद्यापीठातील असातो कुरोइवा यांच्या नेतृत्वाखालील एका संशोधन पथकाने केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, एका उंदरांच्या प्रजातीमध्ये Y गुणसूत्रातील बहुतेक जनुके इतर गुणसूत्रांमध्ये स्थलांतरित केली गेली होती; परंतु यात SRY जनुक नव्हते.
पुरुषांचे अस्तित्त्व धोक्यात येण्याची शक्यता आहे का?
Y गुणसूत्रांचे आकुंचन लाखो वर्षांपासून सुरू असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. Y गुणसूत्रांमध्ये कमी जनुके असतात आणि त्यामुळे ते वेगाने आकुंचन पावण्याची शक्यता सर्वाधिक असते. Y गुणसूत्रांचे नष्ट होणे मानवी पुनरुत्पादनात बदल करू शकते. जगाच्या विविध भागांमध्ये बहुविध लिंग-निर्धारित प्रणाली विकसित होण्याच्या संभाव्यतेवर जेनी ग्रेव्हज यांनी प्रकाश टाकला आहे. याचा अर्थ असाही होतो की, Y गुणसूत्र नष्ट झाल्यामुळे मानवी पुनरुत्पादनात मूलभूत बदल होऊ शकतात आणि महत्त्वपूर्ण उत्क्रांती होऊ शकते.
हेही वाचा : सुनिता विल्यम्सना पृथ्वीवर परत आणणारे ‘स्पेसेक्स क्रू ड्रॅगन’ काय आहे?
काही सरडे व साप या केवळ मादी प्रजाती आहेत आणि ते पार्थेनोजेनेसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या जनुकांमधून अंडी तयार करू शकतात. परंतु, मानवामध्ये असे घडू शकत नाही. कारण- मानवामध्ये कमीत कमी ३० महत्त्वपूर्ण जनुके असतात, जे फक्त पुरुषांच्या शुक्राणूद्वारेच शरीरात प्रवेश करतात आणि सक्रिय होतात, असे ‘द कॉन्व्हर्सेशन’च्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पुनरुत्पादन करण्यासाठी मानवाला शुक्राणू आणि पुरुषांची आवश्यकता असते. त्यामुळे Y गुणसूत्र नामशेष होण्याचा अर्थ मानवी वंशाचा नाश, असा होऊ शकतो. परंतु, काही तज्ज्ञांचे मानणे आहे की, Y गुणसूत्र पूर्णपणे नाहीसे होणार नाही. शास्त्रज्ञ Y गुणसूत्र नष्ट होण्याचा आणि नवीन लिंग-निर्धारित प्रणालीच्या उत्क्रांतीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचा शोध घेत आहेत.