Yavatmal farmer Keshav Shinde turns crorepati: १०० वर्षे टिकलेलं झाड आणि त्यासाठी लढणारा शेतकरी, ही गोष्ट सिद्ध करते की, अन्याय कितीही मोठा असला तरी सत्यासाठी केलेला संघर्ष थांबत नाही. केशव शिंदे यांनी दाखवलेला धीर, जिद्द आणि विश्वास हा आजच्या काळातही सामान्य माणसाच्या हक्कासाठी उठवलेला आवाज आहे. या लढ्याने दाखवून दिलं की, हक्कासाठी संघर्ष केला, तर न्याय नक्कीच मिळतो.

शेतकऱ्यांची व्यथा सांगावी तेवढी थोडीच. सरकारी प्रकल्प येतात…जमिनी जातात…अनेक वर्षांपासून घाम गाळून सुपीक केलेली जमीन काही क्षणातच एखाद्या प्रकल्पाचा भाग होते. असं अजिबातच नाही की, सरकारकडून मोबदला मिळत नाही. भू संपादन कायद्यातील अनेक किचकट तरतुदींचा आधार घेऊन हा मोबदला ठरवला जातो. परंतु, हा मोबदला त्या जमिनीचा असतो. त्या जमिनीवर असलेल्या झाडांचा मोबदला दिला जातोच असे नाही, अशी तक्रार प्रकल्पबाधित शेतकरी गेली अनेक वर्ष करत आलेले आहेत. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील खरशी गावातील शेतकरी केशव शिंदे यांच्या बाबतीत घडली.

१०० वर्ष जुनं झाडं

शिंदे यांची २.२९ हेक्टर जमीन वर्धा-यवतमाळ- पुसद- नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. जमिनीबरोबर विहिरीसाठीही मोबदला देण्यात आला. परंतु, या जमिनीवर उभ्या असलेल्या झाडांसाठी मात्र मोबदला नाकारण्यात आला होता. ही तक्रार केवळ शिंदे यांची नाही तर आंबा, चिंच, जांभूळ, कडुलिंब, वड, पिंपळ अशा झाडांची योग्य किंमत ठरवली जात नाही, अशी तक्रार प्रकल्पबाधित शेतकरी करत असतात. परंतु, शिंदे यांच्या जमिनीवर उभ्या असलेल्या झाडांच्या गोतावळ्यात एक १०० वर्ष जुनं झाडं होतं. हे झाड १०० वर्ष जुनं इतकीच याची महती नाही. तर या झाडाचा आयुर्वेद, पर्यावरणपूरक असा महिमाही आहे.

१०० वर्ष जुनं झाड नेमकं कसलं?

हे झाड रक्तचंदनाचे आहे. रक्तचंदन म्हटल्यावर अनेकांना कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन आठवला असेल. यावरूनच या झाडाचे मोल समजते. तस्करीत वीरप्पन आहे म्हणून या झाडाला मोल नाही… तर या झाडाच्या लाकडाची तस्करी करावी इतके हे झाड मौल्यवान आहे. असे झाड मुळापासून उखडून टाकावे म्हणजे भारीच नुकसान असे म्हटले तरी खोटे ठरू नये. म्हणूनच, या झाडाचे औषधी-पर्यावरणीय गुणधर्म, जागतिक बाजारपेठेतील किंमत शून्य समजली गेल्यामुळे शिंदे कुटुंबाने २०१४ पासून प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार सुरु ठेवला. परंतु, आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही पदरी निराशाच पडल्याने या कुटुंबाने न्यायालयाची मदत घेण्याचे ठरवले. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी शिंदे कुटुंबाने झाडाच्या मोबल्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

रक्तचंदनाच्या झाडाचं महत्त्व

रक्तचंदन ही फॅबेसी कुलातील एक मौल्यवान वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Pterocarpus santalinus असे आहे. हा वृक्ष मुख्यतः दक्षिण भारताच्या पूर्व घाटांमध्ये आढळतो, तसेच श्रीलंका ते फिलिपीन्सदरम्यानच्या अनेक देशांमध्येही त्याचा प्रसार आहे. रक्तचंदनाचे लाकूड गडद लाल रंगाचे असते आणि याच वैशिष्ट्यामुळे हे झाड अत्यंत मौल्यवान मानले जाते. हा वृक्ष साधारणतः ८ मीटर उंचीपर्यंत वाढतो. कमी सुपीकतेच्या जमिनीतही तो सहज वाढतो आणि तीन वर्षांत जवळपास ५ मीटरपर्यंत उंची गाठतो. रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर प्राचीन काळापासून विविध कारणांसाठी केला जात आहे. हे लाकूड रंगाने गडद, कठीण आणि चविला तुरट असते. विशेष म्हणजे वाळवीपासून हे लाकूड सहज सुरक्षित राहते. या लाकडाचा लेप सांधेदुखी, सूज आणि त्वचाविकारांवर उपयोगी ठरतो. रक्तचंदनाच्या पानांचा रस कृमिनाशक आणि जंतूनाशक गुणधर्म असलेला आहे, त्यामुळे जखमा स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग होतो. रक्तचंदनापासून सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते, ज्याचा वापर औषधांना रंग देण्यासाठी तसेच लाकूड, रेशीम व चामडे रंगवण्याच्या कामासाठी होतो. खोडाच्या मध्यभागी असलेल्या लाकडापासून बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवमूर्ती, बुद्धिबळाच्या सोंगट्या आणि विविध फर्निचर वस्तू तयार केल्या जातात. अत्यंत मौल्यवान असल्यामुळे रक्तचंदनाची मोठ्या प्रमाणावर तोड केली गेली आहे. त्यामुळे हा वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर असून, त्याच्या तस्करीला आळा घालण्यासाठी रक्तचंदनाच्या तोडीवर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे (संदर्भ: मराठी विश्वकोश) .

न्यायालयाकडून गांभीर्याने दखल

शिंदे कुटुंबाने दाखल केलेल्या याचिकेची दखल न्यायालयाकडून गांभीर्याने घेण्यात आली. परिणामी, न्यायालयाने २०२५ मध्ये मध्य रेल्वेला १ कोटी रुपयांचा अंतरिम मोबदला जमा करण्याचे आदेश दिले. त्यापैकी ५० लाख रुपये तात्काळ शिंदे कुटुंबाला देण्याची परवानगी न्यायालयाने दिली. विशेष म्हणजे हा निकाल एका वर्षाच्या आतच देण्यात आल्यामुळे सर्वत्र याची चर्चा आहे. १०० वर्षांपेक्षा जुने असलेले शिंदे यांच्या शेतातील हे झाड कशाचे आहे. याची कल्पना कोणालाच नव्हती. आंध्रप्रदेश मधून आलेल्या एका रेल्वे अधिकाऱ्याने हे झाड नेमकं कशाचं आहे हे ओळखलं. या झाडाचं मूल्य नेमकं कसं आणि किती ठरवावं हा प्रश्न निर्माण झाला. त्याच प्रश्नापासून या लढ्याची सुरुवात झाली.

एकुणातच, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केवळ एका झाडासाठी १ कोटी रुपयांचा मोबदला मिळवल्याने तो चर्चेत आला आहे. केशव शिंदे, यांची जमीन काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या जमिनीवर असलेल्या १०० वर्षे जुन्या रक्तचंदनाच्या झाडाच्या योग्य किंमतीसाठी सातत्याने लढा दिला. अनेक प्रयत्नांनंतरही या ऐतिहासिक झाडाचा मोबदला ठरवताना विचार करण्यात आलेला नव्हता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या झाडाचे ऐतिहासिक आणि व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन भारतीय रेल्वेला शिंदे यांना योग्य मोबदला देण्याचे आदेश दिले. या ऐतिहासिक निकालामुळे केवळ शेतकऱ्याच्या आयुष्यात मोठा बदल घडून आलेला नाही, तर जमीन संपादन प्रकरणांमध्ये नैसर्गिक संपत्तीच्या मूल्यांकनाला मान्यता देणारा एक नवा पायंडा पडला आहे. शतकभर जुने हे एकमेव झाड आता आशा आणि न्यायाचे प्रतीक ठरले आहे.